प्रवीण देशपांडे

आर्थिक वर्ष २०१९-२० चा (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) अग्रिम कराचा पहिला हफ्ता भरण्याची वेळ नजीक येऊन ठेपली आहे. हा हफ्ता भरण्याची शेवटची तारीख १५ जून २०१९ ही आहे.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे :

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) आकारला जातो अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणतांना उत्पन्नावरील उद्गम कर वजा केल्यानंतर देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो.

कराचा पहिला हफ्ता कोणी भरायचा नाही :

१) निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही  अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.

२) करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल म्हणजेच कलम ४४एडी किंवा ४४ एडीएनुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमांतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांना १००% देय कर १५ मार्चपूर्वी भरावा लागेल. १५ जून पूर्वी त्यांना अग्रिम कर भरावा लागत नाही.

कर कसा गणावा आणि किती भरावा :

करदात्याने २०१९-२० या आर्थिक वर्षांत अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन त्या उत्पन्नातून प्राप्तीकर कायद्याप्रमाणे मिळणारी वजावट (गृहकर्ज, कलम ८० क वगैरे) विचारात घेऊन उर्वरित उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी.

या रकमेतून उद्गम कर वजा करावा आणि  बाकी कर हा अग्रिम कराच्या रूपाने भरावा. अग्रिम कराचा पहिला हफ्ता या एकूण अंदाजित कराच्या (उद्गम कर वजा जाता) १५% इतका १५ जूनपूर्वी भरावा. करदात्याला नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त काही उत्पन्न अग्रिम कराचा हा हफ्ता भरल्यानंतर मिळाले असेल (उदा. भांडवली नफा, करपात्र भेट वगैरे) तर असे उत्पन्न अग्रिम कराचा पुढील हफ्ता भरताना विचारात घ्यावे.

अग्रिम कर कसा भरावा :

अग्रिम कर ऑनलाईन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो. यासाठी २८० क्रमांकाचे चलन वापरून अग्रिम कर भरता येतो.

अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास :

अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.

अग्रिम कर जास्त भरल्यास : अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल

pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.