बी. गोपकुमार

शर्यत धावण्याचीच पण तरी ‘स्प्रिंट’ आणि ‘मॅरेथॉन’ या दोन प्रकारात खूप मोठे अंतर आहे. मॅरेथॉन ही तुलनेने लांब पल्ल्याची शर्यत आणि धावपटूंची दीर्घकालीन मानसिकता महत्त्वाची. मॅरेथॉनच्या धावपटूंना ऊर्जा वाचविण्याचे आणि दमसास नियमनाचे खास प्रशिक्षण आणि सराव आवश्यक ठरतो. तरच ते अंतिम रेषा यशस्वीपणे पार करू शकतात. मॅरेथॉन पूर्ण करणे हे वैयक्तिक आव्हान मानले जाते आणि प्रत्येक धावपटू हे आव्हान पेलण्याचे उद्दिष्ट आपल्या स्वत:च्या गतीने पार पाडत असतो. आर्थिक नियोजन करणे हेदेखील मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यापेक्षा वेगळे नाही. आर्थिक नियोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या नवीन गुंतवणूकदाराने एखाद्या मॅरेथॉन धावपटूच्या पुस्तकातून एक-दोन पानांचे धडे घ्यायला हवेत.

हे धडे कोणते असावेत, याची काही उदाहरणे पुढीलप्रकारे :

१. ध्येय निश्चित करा : आर्थिक उद्दिष्टे ठरवून घ्या.

मॅरेथॉन पूर्ण करण्याचे अंतिम ध्येय बाळगणारे धावपटू लांबचा पल्ला धावून पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण घेत असताना, ते लहान-लहान उद्दिष्टांवर काम करतात. दिवसातून पाच किमी धावणे, आठवडय़ातून तीन दिवस वजनाचे व्यायाम करणे असा सराव करीत आपापल्या प्रेरणा ते बाळगतात. गुंतवणूकदारांसाठीही आर्थिक सुरक्षितता हे त्याच्या गुंतवणुकीचे प्रधान ध्येय असायला हवे; परंतु तेथपर्यंतच्या मार्गातही इतर काही उद्दिष्टे असतात. जसे, घरखरेदी, मुलांचे शिक्षण, मुलांचे विवाह आदी. ही मध्यावधी उद्दिष्टे तुम्हाला अंतिम मार्गावर स्थिर राहण्यास मदत करतात. यामुळे प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य प्रमाणात भांडवल गुंतविणे सोपे होते.

२. ऊर्जेचे जतन : भांडवल संरक्षण आणि वाढ

मॅरेथॉनचा धावपटू कमी अंतराचा टप्पा धावण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत नाहीत, तर लांबचा पल्ला गाठण्यासाठी व अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी आपली शक्ती व त्राण ते जपून वापरतात. त्याचप्रमाणे, एक गुंतवणूकदार म्हणून जोखमीच्या, अल्प-मुदतीच्या परताव्याचा मागे लागणे टाळले पाहिजे. या जोखमींमुळे भांडवली नुकसान होऊ शकते. त्याऐवजी, संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठी गुंतवणुकीत विविध मालमत्ता वर्गाचे वैविध्यपूर्ण मिश्रण आणले जायला हवे. गुंतवणुकीत वैविध्य आणल्याने, कोणताही एखादा मालमत्ता वर्ग किंवा साधन यांच्यात घसरण झाल्यास पोर्टफोलिओला मोठा फटका बसत नाही.

३. कालावधी : अंतिम ध्येय

मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ ठरविणे आणि ती गाठण्याचा सराव खूप उपयोगी ठरतो. त्या अनुषंगाने, प्रत्येक धावपटू आपला गेल्या खेपेची वेळ आणि फिटनेसचा स्तर यांच्या आधारावर आताचे ध्येय साधण्यासाठी स्वत:चा वेग ठरवतो. त्याचप्रमाणे, विवेकपूर्ण आर्थिक नियोजनासाठी, गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक उद्दिष्टांवर आधारित विशिष्ट कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. एकदा हा कालावधी निश्चित केला की आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलावर आवश्यक परतावा किती यायला हवा, याच्या दराची तुम्ही पुन्हा गणना करू शकता. यामध्ये परताव्याचा दर किंवा गुंतवणुकीची आवश्यकता खूप जास्त असल्याचे दिसून आल्यास, तुम्हाला तुमच्या अपेक्षा पुन्हा बदलाव्या लागतील किंवा ध्येय गाठण्यासाठी वेगळ्या धोरणाचा अवलंब करावा लागेल.

४. संथ आणि स्थिर : चक्रवाढीची शक्ती

मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी वेगवान धावपटू असण्याची गरज नाही; स्थिर गतीने धावणे तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सातत्य या संकल्पनेचा वापर करू शकतात. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’सारखी साधने दीर्घ कालावधीसाठी मर्यादित निधी गुंतवण्याची एक शिस्त बिंबवतात. तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल आणि तुमच्याकडे मर्यादित प्रमाणात संसाधने असतील, तर मासिक किंवा त्रमासिक ‘एसआयपी’चा तुम्हाला विशेष उपयोग होईल. या धोरणातून तुम्हाला चक्रवाढ पद्धतीचे (कम्पाउंडिंग) सामर्थ्य मिळते. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी या चक्रवाढीच्या सामर्थ्यांला ‘जगातील आठवे आश्चर्य’ म्हटले, ते काही उगाच नव्हे!

५. स्वत:शीच स्पर्धा : स्वत:साठी उपयुक्त आराखडा बनवा

एक व्यक्ती म्हणून तुमची परिस्थिती, जोखीम पेलण्याची तुमची कुवत आणि आर्थिक उद्दिष्टे या बाबी इतर गुंतवणूकदारांपेक्षा भिन्न असणार आहेत. त्यामुळेच, इतर गुंतवणूकदार त्यांची उद्दिष्टे गाठण्यासाठी जी आर्थिक साधने वापरतात, ती तुमच्यासाठी योग्य ठरत नसतील, तर तुम्ही त्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर! ज्याप्रमाणे तुम्ही आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाता, त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत तुम्ही घेणे योग्य असते. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्यासाठी काम करणारा एखादा आराखडा बनवू शकता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन धोरणाला चिकटून राहू शकता.

निष्कर्ष :

मॅरेथॉनमध्ये धावपटूंपुढे काही आव्हाने निश्चितच असतात. ती पार पाडणे कठीण वाटू शकते. एकदा का थकवा जाणवू लागला, की पराभव स्वीकारण्याचा मोह होऊ लागतो; परंतु, हार मानली नाही, तर शेवटच्या रेषेवर तुमची वाट पाहत असलेल्या उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा आनंद तुम्ही लुटू शकता. आर्थिक नियोजनही यापेक्षा वेगळे नसते. चढ-उतार आले, तरी विचलित न होता स्थिर राहिल्यास, प्राप्त होणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेमुळे तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना मिळणारा खरा आनंद तुम्ही उपभोगू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* लेखक अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी