Chandra Grahan Time : २०२३ मधील ऑक्टोबर महिना खगोलीय घटनांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. कारण- एकाच महिन्यात दोन आठवड्यांच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दिसणार आहे. विशेष योगायोग म्हणूनही या खगोलीय घटनेचे वर्णन केले जात आहे. १४ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण लागले होते आणि २८-२९ ऑक्टोबर रोजी या महिन्यातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे; जे भारतासह जगभरातील विविध ठिकाणी दिसणार आहे. भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल आणि कोणत्या वेळी दिसेल याबाबत जाणून घेऊ.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, अशी दोन प्रकारची ग्रहणे असतात. आपल्या सौरमालेत सूर्य हा केंद्रस्थानी असतो आणि त्याभोवती सर्व ग्रह गोलाकार वर्तुळात फिरत असतात. पृथ्वी ही स्वत:भोवती फिरत असते आणि ती सूर्याला वर्तुकाळार प्रदक्षिणा घालते; तर चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.
हेही वाचा – Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहण! जाणून घ्या तिथी, वेळ आणि सुतककाळ
सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा अनेकदा तो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो. त्यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहणादरम्यान चंद्राची मोठी सावली पृथ्वीवर पडते. ज्या ठिकाणी ही सावली पडते, त्या ठिकाणी सूर्यग्रहण स्पष्ट दिसते. या जागेवर सूर्य पूर्ण झाकला जातो किंवा अर्धा झाकला जातो.
चंद्रग्रहण
२०२३ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा चंद्र, सूर्य व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
हेही वाचा – कोजागिरी पोर्णिमेदिवशी लागणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण! या’ राशींच्या लोकांवर होऊ शकते देवीची विशेष कृपा?
कुठे-कुठे दिसणार चंद्रग्रहण
हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक भागांतून पाहता येणार आहे. तसेच संपूर्ण भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल; ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे. पण हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागावे लागेल. भारतीय वेळेनुसार ते २९ ऑक्टोबरला पहाटे १.०६ मिनिटांनी सुरू होईल आणि २.२३ मिनिटांनी समाप्त होईल.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातून पाहिले जाऊ शकते. त्यामुळे त्याचा सुतक काळ धार्मिक आधारावर वैध असेल. नवी दिल्ली येथे २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१:४४:०५ वाजता ग्रहण दिसेल.