रॉबर्ट चँडलर हा ब्रिटिश कवी खरं तर अनुवादक म्हणूनच जास्त गाजलेला. रशियन साहित्य हा त्याच्या अनुवादाचा प्रांत. पेंग्विन प्रकाशनासाठी चँडलरने संपादित केलेले रशियन लघुकथांचे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते. २००५ साली आलेल्या या पुस्तकात  गेल्या दोन शतकांतील महत्त्वाच्या रशियन लघुकथा वाचायला मिळतात. रशियन साहित्यिकांपैकी अलेक्झांडर पुष्किन आणि आंद्रे प्लाटोनोव्ह या अनुक्रमे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील रशियन कवी-नाटककारांच्या साहित्याचा अभ्यासक-अनुवादक अशी त्याची प्रामुख्याने ओळख. यातील आधुनिक रशियन साहित्याचा अध्वर्यू म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या पुष्किनच्या साहित्याचे अनुवाद तर चँडलरने केले आहेतच, शिवाय पुष्किनचे चरित्रही त्याने लिहिले आहे. बातमी त्या चरित्रपुस्तकाचीच आहे.

‘अ शॉर्ट लाइफ ऑफ पुष्किन’ हे पुष्किनचे चँडलरकृत चरित्र पेंग्विनकडूनच नुकतेच प्रकाशित झाले आहे. केवळ ११२ पृष्ठांचे हे छोटेखानी पुस्तक. त्यातून चँडलरने पुष्किनच्या साहित्याचा आढावा घेतला आहेच, शिवाय त्याचा समाजशील जीवनप्रवासही अधोरेखित केला आहे. केवळ ३८ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या पुष्किनने आधी नवअभिजातवादी व रोमँटिक वळणाचे साहित्य प्रसवले खरे, परंतु आयुष्याच्या शेवटास तो वास्तववादाकडे वळला होता. त्याचे हे वळण कसे झाले  व त्यामागील कारणांचा वेध चँडलरने या चरित्रातून घेतला आहे. सामाजिक सुधारणांकडे असलेला पुष्किनचा ओढा त्याच्या राजकीय कार्यकर्तेपणातून दिसून येतो. एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ग्रीकांनी ऑटोमन साम्राज्याविरुद्ध दिलेल्या लढय़ाचा पुष्किनवर बराच प्रभाव पडला होता. त्या प्रभावातूनच तो राजकीय चळवळीत गुंतला होता. त्याबद्दलही हे चरित्र माहिती देते. एकूणच ‘रशियाचा शेक्सपीअर’ म्हणून ओळख असलेल्या पुष्किनचे हे चरित्र रशियन साहित्याच्या वाचकांसाठी पर्वणीच आहे.