25 October 2020

News Flash

मृदंग-उपेक्षितांचे अंतरंग..

जो मानसन्मान समाजात कलाकाराला मिळतो, त्यातला एक अंशसुद्धा या मृदंग-कारागिरांच्या वाटय़ाला येत नाही

‘सेबास्टियन अ‍ॅण्ड सन्स’ लेखक : टी. एम. कृष्णा प्रकाशक : कॉन्टेक्स्ट पब्लिकेशन पृष्ठे : ३६६, किंमत : ७९९ रुपये

अशोक राजवाडे

मृदंगाच्या तांत्रिक बाजूबरोबरच मृदंगाची निर्मिती करणाऱ्या माणसांचे जगणे, त्यांची सुख-दु:खे, आशा-निराशा, राग-लोभ, चुरस या साऱ्याचा गुंता उकलून मृदंग बनवणाऱ्या कारागिरांच्या उपेक्षित विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचा हा साक्षेपी परिचय..

टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी पद्धतीने शास्त्रीय गायन करतात. पण त्यांची एवढी ओळख पुरेशी नाही. अशी व्यक्ती मृदंगाच्या विविध पैलूंचा सांगोपांग अभ्यास करून साडेतीनशे पानी पुस्तक लिहिते ही घटना दुर्मीळ आहे. आपल्या संगीत परंपरेचा इतिहास शोधला तर असे काम केलेल्या काही व्यक्ती असतीलसुद्धा. पण ते वाद्याच्या तांत्रिक अंगाने जाणारे असण्याची शक्यता अधिक. कृष्णा यांनी लिहिलेल्या ‘सेबास्टियन अ‍ॅण्ड सन्स’ या पुस्तकामध्ये हे सगळे आहेच. मृदंग या वाद्याचा संदर्भग्रंथ म्हणून त्याकडे बघता येईल. पण कृष्णा इथेच थांबत नाहीत. आपला हात धरून ते या मृदंग बनवणाऱ्या कारागिरांच्या दुनियेत नेतात आणि या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ उलगडून दाखवतात.

समाजातल्या त्रासदायक मुद्दय़ांबद्दल कृष्णा आपली मते मांडत असतात. जातिव्यवस्थेच्या विषयावर त्यांनी यापूर्वी लिहिले आहे. त्यांच्या विविध मतांमुळे हिंदुत्वाचे पहारेकरी त्यांच्यावर तुटून पडताना दिसतात. या पुस्तकात वाद्याचा अभ्यास करताना त्यांच्यातला कार्यकर्ता जागा असल्याच्या खुणा सर्वत्र दिसतात.

पुस्तकात सतराव्या शतकातला मृदंगाचा इतिहास थोडक्यात दिला आहे. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी (ऊर्फ एकोजी) यांनी तंजावरमध्ये सत्ता काबीज केली. त्यानंतरच्या काळात मराठय़ांच्या संस्कृतीचा तंजावरवर प्रभाव होता. तिथल्या कीर्तनकारांबरोबर मराठा कुळांतले मृदंगवादक असत. त्यांपैकी नारायणस्वामी अप्पा हे तंजावर शैलीतले आद्य मृदंगवादक मानले जातात. याखेरीज पुदुकोत्ताई नावाची एक शैली तमिळनाडूत अस्तित्वात होती. हे असले तरी त्या काळी मृदंग बनवणारे कोण होते, ते कुठून आले होते, याचा इतिहास धडपणे कळत नाही.

पालघाट मणी अय्यर (१९१२-१९८१) हे दक्षिणेकडचे महत्त्वाचे दिग्गज मृदंगवादक होते. त्यांचे मूळ गाव पालघाट (राज्य : केरळ). त्या काळात तंजावरमध्ये मृदंग बनवणाऱ्याकडे जे कौशल्य होते तसे पालघाटमध्ये त्यांना मिळेना. म्हणून १९५४ मध्ये त्यांनी तंजावरला स्थलांतर केले. त्यांच्या घरी अनेक वाद्यांचे काम नेहमी असे. त्यामळे त्यांच्या घरी मृदंग कारागिरांना काम करण्यासाठी एक वेगळी खोली होती. पण त्यापलीकडे मणी अय्यरांच्या घरात कारागिरांनी प्रवेश करायचा नाही असा एक अलिखित संकेत होता. याचे विविध अनुभव या कारागिरांपैकी काहींनी कृष्णांजवळ बोलताना सांगितले.

जो मानसन्मान समाजात कलाकाराला मिळतो, त्यातला एक अंशसुद्धा या मृदंग-कारागिरांच्या वाटय़ाला येत नाही. ते सदैव उपेक्षित आणि पडद्यामागे असतात. त्यांच्या ठळक कामगिरीतून कर्नाटक संगीताचा इतिहास किंवा पुराणकथा साकार झाल्या आहेत असे आपल्याला दिसत नाही, अशी तक्रार कृष्णा यांनी या पुस्तकाद्वारे केली आहे आणि अशा उपेक्षित कारागिरांना प्रकाशात आणले आहे. हे करताना त्यांनी या माणसांचे जगणे, त्यांची सुखदु:खे, आशा-निराशा, राग-लोभ, चुरस हे सगळे समोर आणले आहे. या कामाला जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा हे इतके गुंतागुंतीचे असेल असे वाटले नव्हते, अशी कबुली कृष्णांनी दिली आहे. विशेष म्हणजे, मृदंगाच्या तांत्रिक बाजूबरोबरच मृदंगाची निर्मिती करणाऱ्या माणसांचे जग आणि त्यातला गुंता कृष्णा यांनी या पुस्तकाद्वारे वाचकासमोर ठेवला आहे.

मृदंगाच्या निर्मितीमध्ये मुख्यत्वे नुकत्याच मारलेल्या पशूचे कातडे वापरले जाते. इथूनच आपल्याकडची जातिव्यवस्था त्यात प्रवेश करते. त्यात पुन्हा गायीचे कातडे या कामासाठी सर्वात योग्य मानले जाते. त्यामुळे मृदंगनिर्मितीच्या व्यवसायात बहुतांशी दलित किंवा धर्मातर केलेल्या ख्रिश्चन व्यक्ती आढळतात. सवर्ण हे काम करायला सहजासहजी तयार नसतात. पण मृदंगवादक मात्र बहुसंख्येने उच्चवर्णीय. या तफावतीमुळे एक विभाजन स्वाभाविकपणे तयार झालेले दिसते. यात कलाकारांना धन, कीर्ती सगळे मिळते. मृदंग बनवणाऱ्या माणसाच्या हाताला त्यामानाने काहीच लागत नाही.

मृदंग बनवणारे कारागीर आणि मृदंगवादक यांचे बदलत गेलेले संबंध हा कृष्णा यांच्या पुस्तकातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळी एकीकडे वादक त्या कारागिरावर अवलंबून असे; त्याचे कौशल्य त्याला हवे असायचे; त्यामुळे त्याला दुखवून चालण्यासारखे नव्हते; तर दुसरीकडे जातिव्यवस्थेमुळे त्यांच्यात एक अलंघ्य अशी अलिखित सीमारेषा आखलेली होती. काळानुसार हे संबंध बदलत गेले. आजच्या जमान्यातले कलाकार आणि मृदंग-निर्मिती करणारे कारागीर यांच्यातले संबंध हे कंत्राटदार आणि कामगार यांच्यासारखे आहेत. आणखी एक फरक ठळकपणे दिसतो. पूर्वीच्या पिढीत कारागिराला वादकाच्या जागेत जाऊन काम करायला लागायचे. कारागिराजवळ स्वत:ची जागा क्वचितच असायची. नव्या पिढीतल्या कारागिरांनी स्वत:च्या जागा थाटायला सुरुवात केली. अशी जागा घेणे हे पैशाच्या दृष्टीने आव्हान असते. पण वादकाला ‘आपल्या जागेत’ यावे लागते; आपण ‘वादकांच्या जागेत’ जाऊन काम करत नाही, हा आत्मसन्मानाचा भाव आजच्या कारागिरांच्या पिढीमध्ये आहे.

मृदंग-कारागिरांबरोबर कृष्णांनी केलेल्या संवादांचे तपशील पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत. ‘जेव्हा मी या कारागिरांच्या घरी जात असे, तेव्हा त्या पुरुष कारागिरांपेक्षा त्याच्या घरातल्या स्त्रिया पटकन मोकळ्या होत असत. कधी कधी त्या तोंडाने बोलल्या नाही तरी त्यांचे स्मित, कुजबुज, डोळ्यांतले भाव बरेच काही सांगून जात,’ असे निरीक्षण कृष्णा यांनी नोंदवले आहे. शारदा नावाच्या एका महिलेबरोबर त्यांचा जो संवाद झाला, त्याचे काही तपशील पुस्तकात आहेत. शारदाच्या माहेरची कहाणी पारंपरिक कुटुंबांपेक्षा वेगळी होती. तिचे आजोबा ब्राह्मण होते. विचाराने कम्युनिस्ट. अर्थातच मोठेपणी जानवे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी टाकून दिल्या होत्या. श्रीलंकेतल्या एका तमिळ महिलेबरोबर त्यांनी विवाह केला होता. सीतालक्ष्मी ही त्यांची मुलगी. तिच्यासाठी त्यांनी शोधलेला वर दलित-ख्रिश्चन होता. शारदा ही सीतालक्ष्मीची मुलगी. सीतालक्ष्मीने केलेले काम वैशिष्टय़पूर्ण होते. तिने तिरुविदाईमर्दूर नावाच्या गावात स्त्रियांची संघटना स्थापन केली होती. शारदावर साम्यवाद आणि पेरियार या दोघांचे संस्कार होते. समाजात बदल झाला आहे की नाही, यावर कृष्णा यांची शारदाबरोबर मनमोकळी चर्चा झाली. शारदाच्या मते, पूर्वीच्या काळी वादकांच्या घरातल्या पूजेच्या ठिकाणी वाद्ये ठेवलेली असत; पण ती बनवणाऱ्या कारागिरांना तिथे प्रवेश नव्हता. आता तशी परिस्थिती राहिली नाही. (मात्र एका मृदंग-कारागिराने अद्यापही मृदंग-वादकाच्या घरातल्या पूजास्थळी आपल्याला प्रवेश नसल्याचे सांगितले होते, अशी कृष्णांनी नोंद केली आहे.) शारदाच्या मते, या कारागिरांनी आपल्यातला न्यूनगंड टाकून द्यायला हवा. उच्चवर्णीय वादक आणि हे कारागीर दोघांनीही समाजात झालेला बदल सन्मानपूर्वक स्वीकारायला हवा. शारदा आणि टी. एम. कृष्णा या दोघांनीही यासाठी एकेक उदाहरण दिले आहे. त्यामुळे यातले कोणते उदाहरण प्रातिनिधिक आहे, याचा निवाडा करता येत नाही. त्यामुळे त्यातून काही निष्कर्ष काढणे अवघड आहे.

आणखी एक बदल कृष्णा यांनी पुस्तकात नोंदवला आहे. चेन्नईमध्ये त्यांना एक ब्राह्मण कारागीर भेटला. मुळातला तो ढोलकीवादक. त्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका प्रसंगामुळे तो या व्यवसायात पडला आणि तिथेच स्थिरावला. पण त्याच्या व्यवसायामुळे स्वत:चे लग्न जमून येताना त्याला बराच त्रास झाला. अखेरीस वयाच्या ३४ व्या वर्षी त्याचे लग्न झाले. त्याची कहाणी कृष्णांनी दिली आहे.

मृदंगाचा मधला भाग लाकडाचा एक सलग तुकडा असतो. त्यात मधे पोकळी असते. मृदंगासाठी लाकूड वापरण्यापूर्वी त्यावर काय प्रक्रिया केल्या जातात; नंतर मृदंगाचा वैशिष्टय़पूर्ण आकार कसा तयार होतो, या सगळ्याचे तपशील पुस्तकाच्या एका प्रकरणात दिले आहेत. विविध वादकांच्या मागण्यांप्रमाणे मृदंगाच्या आकारांमध्ये कसे बदल झाले, याच्या कहाण्या त्यात दिल्या आहेत.

मृदंगाच्या बांधणीत त्यासाठी दोन्ही तोंडांवर असलेले प्राण्यांच्या कातडय़ाचे तुकडे हा कारागिरीतला सर्वात महत्त्वाचा भाग. यासाठी प्राण्याला मारून त्याची कातडी वापरली जाते. मृदंगाच्या दोन्ही बाजूंना कातडय़ाचे थर असतात. गाय, म्हैस आणि बकरी यांची कत्तल करून त्यांचे कातडे जरुरीप्रमाणे मृदंगात वापरले जाते. (मृदंगासाठी या प्राण्यांतल्या नराचे कातडे सहसा वापरले जात नाही.) त्याच्यातले विविध बारकावे कृष्णा यांनी सांगितले आहेत. त्यासाठी त्यांनी खाटिकखान्याला भेट देऊन तिथे कसे काम चालते हे पाहिले; तिथल्या कारागिरांबरोबर बातचीत केली. प्राण्याचे कातडे आणून ते पाण्यात बुडवणे, सुकवणे, त्यावरचे केस काढून टाकणे अशा प्रक्रिया कराव्या लागतात. हे काम करणाऱ्या कारागिरांना जागा मिळणे मुश्कील असते; कारण कातडय़ाला येणारा वास कुणालाही नको असतो.

आपण मृदंगवादन करतो त्यात गायीला मारून तिचे कातडे वापरले जाते हे मृदंगवादक पालघाट मणी अय्यर यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्यासमोर नैतिक पेच निर्माण झाला. त्याबद्दल आपण कुणाचा तरी सल्ला घ्यावा असे त्यांना वाटले. कांची मठाच्या शंकराचार्याना विचारावे का? त्यांना असा प्रश्न विचारणे अय्यर यांना अवघड वाटले. त्या काळात चक्रवर्ती राजगोपालाचारींना महात्मा गांधीजी देशाच्या विवेकबुद्धीचे रक्षक म्हणत असत. तेव्हा अय्यर यांनी राजाजींना हा प्रश्न विचारला. ‘नदीचे कूळ आणि ऋषीचे मूळ विचारू नये’ अशा अर्थाचे उत्तर त्यावर राजाजींनी दिले. म्हणजे ते कातडे कुठून येते वगैरे अवघड प्रश्न वादकाने विचारू नयेत, असा त्याचा अर्थ होता. खाटिकखाना ते मृदंग असा पशूच्या कातडय़ाचा जो प्रवास होतो, त्याबद्दल जाणून घेण्याची तसदी किती मृदंगवादकांनी घेतली असेल हा प्रश्न पुस्तक वाचताना मनात आल्याशिवाय राहत नाही.

कृष्णा यांनी या वाद्याविषयी जे लिखाण केले आहे, ते वाचताना अनिल अवचट यांच्या लेखनशैलीची आठवण होणे स्वाभाविक आहे. एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे त्या माणसांना भेटून अनेक तपशील गोळा करायचे आणि लिखाणात ते मांडायचे असे ते करतात. मात्र, कृष्णा यांच्या मुद्दय़ांना एक भौगोलिक मर्यादा आहे. त्यांनी फक्त कर्नाटक पद्धतीला जोडलेल्या मृदंगवादनाचा आणि वाद्यनिर्मितीचा विचार केलेला दिसतो. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतल्या मृदंगनिर्मिती करणाऱ्या वेगवेगळ्या कुटुंबांचा त्यांनी विचार केला आहे. अगदी वादकांत असतात तशी ‘घराणी’ या मृदंगनिर्मिती करणाऱ्यांमध्ये आहेत. त्यांतल्या प्रत्येकाची काही वैशिष्टय़े आहेत. तंजावर, चेन्नई, बेंगळूरु, विजयवाडा अशा शैली किंवा घराणी मृदंगनिर्मिती करणाऱ्यांमध्ये आहेत. त्यांच्यातले सूक्ष्म भेद कृष्णा यांनी पुस्तकात टिपले आहेत.

या सगळ्यांत स्त्रियांचे स्थान काय, असा प्रश्न कृष्णा यांना पडला नसता तरच आश्चर्य. एके काळी देवदासी मृदंगवादन करत असत. पण या क्षेत्रात जसे उच्चवर्णीय येऊ लागले तसे त्यांचे संकेत प्रभावी ठरू लागले. त्यातून स्त्रिया मागे पडल्या. पण आजही ज्या काही स्त्रिया या वादनात आहेत, त्यांची नावे आणि वैशिष्टय़े कृष्णा यांनी दिली आहेत. त्याचबरोबर मृदंगाच्या व्यवसायात आलेल्या आणि स्थिरावलेल्या महिलांचे संघर्ष कसे होते, याचे तपशीलही पुस्तकात आहेत.

पुस्तकातले शेवटचे प्रकरण आख्यायिकाविषय झालेल्या पारलांदू नावाच्या एका मृदंग-कारागिराविषयी आहे. पारलांदू हा मृदंग-कारागिरांमधला संगीतकार आहे, असे अनेकांचे त्याच्याबद्दल मत होते. प्रत्येक वादकाची वैशिष्टय़े, त्यांचे षड्ज कुठले यातले बारकावे त्याच्या डोक्यात पक्के होते. त्यासाठी वाद्यामध्ये काय करायचे, हे पारलांदूला नेमकेपणाने माहीत असे. त्यामुळे एकदा पारलांदू हातात आल्यावर मृदंगवादक त्याला सोडत नसत. पालघाट मणी अय्यर यांच्या कुणा प्रतिस्पध्र्यासाठी पारलांदूने काम केले तर मणी अय्यरांना ते आवडत नसे. पारलांदूच्या कौशल्याचे कौतुक करणाऱ्या कहाण्या खुद्द मृदंगवादकांनी कृष्णा यांना सांगितल्या होत्या. त्यामुळे तिथे शंकेला वाव नाही.

पालघाट मणी अय्यर यांनी स्वर्गाची जी कल्पना केली होती, तिच्यातसुद्धा वाद्य बनवणारा म्हणून पारलांदू असेल असे म्हणून ठेवले आहे. ‘कप्पी मृदंग’ नावाचा एक मृदंगाचा नवीन प्रकार पारलांदूच्या डोक्यातून आला असावा, असा कृष्णा यांचा कयास होता. पारलांदूजवळ त्या दर्जाची बुद्धिमत्ता होती याबद्दल एक वादकवगळता इतर सर्वाचे मत होते. त्याबद्दल मतभेद असले तरी पारलांदूच्या एकूण कौशल्याला सारे मृदंगवादक दाद देत असत, असे कृष्णा यांना आढळून आले.

मृदंगनिर्मितीतली कारागिरी आणि त्यामागचा माणूस या सगळ्यांबद्दल समग्र भान देणारे हे पुस्तक लिहिण्याचे एक महत्त्वाचे काम टी. एम. कृष्णा यांनी केले आहे. त्यासाठी भरपूर वेळ दिला आहे; विविध ठिकाणी हिंडून माहिती गोळा केली आहे. निरनिराळ्या वाद्यांबद्दल आणि त्यामागच्या माणसांबद्दल अशा तऱ्हेने कलाकारांनी लिहिणे हे काम येणाऱ्या पिढय़ांसाठी महत्त्वाचे आणि पथदर्शी ठरेल यात शंका नाही.

ashokrajwade@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:06 am

Web Title: sebastian and sons a brief history of mrdangam makers book review abn 97
Next Stories
1 पंजाब पूर्वपदाकडे?
2 बुकबातमी : थरूरत्नाकर..
3 प्रलयानंतरचा प्रश्न..
Just Now!
X