बिपीन देशपांडे

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी, त्यातून निर्माण झालेला वेतन, रोजगाराचा प्रश्न आणि भविष्याविषयी मनात एक प्रकारची निर्माण झालेली अनिश्चिता, यातील ताणतणावामुळे अनेक जण मरणाला कवटाळत आहेत. औरंगाबाद शहर व परिसरात मागील २० दिवसांत १८ जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यात प्रामुख्याने तरुणवर्ग अधिक आहे.

सिडको एन-७ मधील प्रतीक्षा काळे ही २५ वर्षीय तरुणी शिक्षिका म्हणून एका खासगी शाळेत अध्यापनाचे काम करत होती. घरी काही विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होती. मात्र, शाळा सुरू नसल्याने वेतनही बंद झाले होते. शिवाय वडिलांनी खासगी सावकारांचे घेतलेल्या पैशांचे व्याजही देणे शक्य होत नव्हते. सावकारांचा तगादाही वाढला. या तणावाच्या परिस्थितीत प्रतीक्षाने १८ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या बहिणीने सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक गायकवाड व अंबादास संतोष सिरसाट या खासगी सावकारीशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सतीश खंडाळकर या माथाडी कामगाराने कंपनीने वेतन कपात केल्याच्या ताणातूनच १२ जून रोजी आत्महत्या केली. खंडाळकर हे एका बिअरच्या कंपनीत काम करायचे. याप्रकरणी कंपनी प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माथाडी कामगार संघटनेचे नेते सुभाष लोमटे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली आहे.

किरण पारखे, सुरजित ठाकूर, करण बोरसे, अण्णासाहेब कोलते, या कामगारांनीही आत्महत्येसारखा मार्ग निवडला. किरण गाडगे या भाजीविक्रेत्यानेही गळफास लावून घेतला. समाधान राठोड या एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने, विवेक पानखडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने, तेजस जाधव या राज्यस्तरीय पातळीवर बास्केटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या तरुण खेळाडूनेही मरणाला कवटाळले. बजाजनगरातील आंचल तायडे या तरुणीने गळफास लावून घेतला. मुकुंदवाडीतील मोहन सरोदे, पडेगाव शिवारातील शेख मोहसीन, टाकळी माळी येथील गणेश बुरकूल, सिडकोतीलच विशाखा चव्हाणसह पाचोड येथील संपत म्हस्के (वय २७) या तरुणाने आत्महत्या केली. संपत मुंबईहून गावी आलेला होता. त्याचे घरातच विलगीकरण करण्यात आले होते.  करोनामुळे भविष्य अनिश्चित झाले असून आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वाद, यातून निर्माण झालेल्या ताणतणावातूनच मरणाला जवळ केले जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.

आजही तणावाखाली असलेल्या अनेक तरुणांचे फोन येतात. भविष्याची चिंता आणि अनिश्चितता. यातून हतबलतेची भावना वाढीस लागते. जगून काही उपयोग नाही, असा एक गैरसमज करून घेतला जातो. त्यातून टोकाचा निर्णय घेतला जातो. थोडे दिवस शांत राहून वाट पाहिली. नवीन पर्यायांचा शोध घेत राहिलात आणि जवळच्या व्यक्तीसोबत मोकळेपणाने बोललात तर ताण कमी होण्यास मदत होते.

– डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ.