औरंगाबाद : निवडणूक लढविली नाही तर पक्षाचे अस्तित्व कसे राहील, असा सवाल अध्यक्षांसमोर उपस्थित करत ओवेसींना सुनावल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादची जागा एमआयएमने मागून घेतली. या जागेवर आता आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हैदराबाद येथील बैठकीत अ‍ॅड. असुद्दोदीन ओवेसी यांनी जाहीर केला. सोमवारी रात्री घेतलेल्या या निर्णयानंतर आज विमानतळावरून उमेदवार इम्तियाज जलील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवार असल्याने मुस्लिम आणि दलित मतांचे एकत्रीकरण होईल आणि अधिक मते मिळतील, असा एमआयएमचा दावा आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला जेवढी मते मिळतील, तेवढे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा लाभ युतीच्या उमेदवाराला होईल, असे गणित सांगितले जात आहे. आमदार जलील यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे सांगितले. प्रचारासाठी ओवेसी यांच्या औरंगाबाद येथे सभाही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.