नांदेड : राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, लाडक्या बहीण योजनेचा बोजवारा उडाला आहे. यापासून सर्वसामान्यांचे लक्ष हटविण्यासाठी मराठी-अमराठी असे विषय समोर आणले जातात, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला.
नांदेडच्या न्यायालयात सुनावणीसाठी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या समर्थकांसह नांदेडमध्ये दाखल झाले. सकाळी ११ वाजता न्यायालयात हजेरी लावल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भाजपच्या नितेश राणे यांनी मुस्लिमांनी नमाज मराठीत अदा करावी, असे आवाहन केले होते. त्यावर बोलताना ओवैसी यांनी राणे व त्यांच्या परिवारांनी केलेल्या जुन्या ट्विटची आठवण केली. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, लाडकी बहीण योजनाही यशस्वी ठरली नाही. या सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विनाकारण मराठी-अमराठी असा वाद निर्माण केला जात आहे.
पहलगामच्या घटनेबाबत जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली असल्याचे मान्य केले. याकडे लक्ष वेधले असता ओवैसी यांनी राज्यपालांनी राजीनामा देण्याची मागणी केली. २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. धर्म विचारून झालेल्या या घटनेबाबत सुरक्षाव्यवस्थेत चूक झाली आणि ती मान्य केली असेल तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. पहलगाम येथील दुर्घटना म्हणजे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे, असा आरोप करताना ओवैसी यांनी सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेबाबत समाधान व्यक्त केले. या यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही, ही बाब दिलासा देणारी आहे.
आगामी काळात आम्ही केंद्र सरकारला याबाबत जाब विचारू. बिहारमधील मतदारसंख्येत वाढ झाल्याबाबत एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २८ जुलै रोजी त्याची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाला याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही सूचनाही दिल्या आहेत. तेलंगणा, पश्चिम बंगाल व अन्य राज्यांत केवळ प्रत्येकी एकच घटना उघड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र घुसखोरांची नावे मतदार यादीत आली, असे म्हणणे चुकीचे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आमची तयारी सुरू आहे. आज त्या संदर्भात एक बैठक पार पडली. आगामी काळात लवकरच बैठक घेतली जाईल. सर्व निवडणुका ताकदीनिशी लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान सकाळी न्या. ए. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. सन २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस स्थानकात आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना येथे बोलावण्यात आले होते. याच प्रकरणात २२ जुलै ही पुढची तारीख देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांकडून त्रास
ओवैसी यांना झेडप्लस सुरक्षा आहे. याच धर्तीवर न्यायालय, जिल्हा परिषद, विश्रामगृह या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक वरिष्ठ अधिकारी न्यायालयात हजर होते. मोठा जमावही तेथे जमला होता. न्यायालय परिसरात मोठा जमाव जमल्याने सुरक्षेच्या नावाखाली अतिरेक करताना पोलिसांनी जिल्हा परिषद कर्मचारी व या परिसरातल्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिल्याचा आरोप अनेकांनी केला.