निश्चलनीकरणानंतर संशयास्पद १८ लाख खात्यांची तपासणी पूर्ण

रावसाहेब दानवे यांच्याकडून निश्चलनीकरणाचे समर्थन

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. (संग्रहीत छायाचित्र)

रावसाहेब दानवे यांच्याकडून निश्चलनीकरणाचे समर्थन

निश्चलनीकरणाच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात येणारे आंदोलन हे राजकीय द्वेषापोटी केले जात असल्याची टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. वर्षभरातील देशभरातील आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती त्यांनी दिली. बँकांमधील १८ लाख खाती संशयास्पद आढळून आली असून, त्याचा तपास पूर्ण झला आहे. तर वेगवेगळय़ा खात्यांमध्ये २ लाख ८९ हजार कोटींचा रोखीने भरणा केल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. देशभरातील ८०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचेही दानवे यांनी सांगितले.

औरंगाबादेत बुधवारी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार दानवे यांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयाला वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपकडून काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात पक्षाचे नेते पत्रकार बैठका घेऊन देशभरातील डिजिटल व्यवहार, बँकांमधील संशयास्पद खाती, अर्थव्यवस्थेतील बदल, काळे धन, करदाते, राजकीय परिस्थिती, शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट आदींबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. आंदोलन करणाऱ्या विरोधकांकडूनही एक व दोन रुपयांच्या नोटा, ५० पैशाचे नाणे बंद करण्यात आले. त्यामुळे गरिबांना मोठा फटका बसला. तर मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करून काळे धन लपवणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहारात ५८ टक्के वाढ झाल्याचे दानवे यांनी सांगितले. ५० लाख करदात्यांची भर पडली आहे. आयकराचा परतावा भरणाऱ्यांच्या संख्येत २४.७ टक्के वाढ झाली आहे. यापूर्वीच्या तुलनेत ९ टक्के अधिक आयकर भरणारे झाले आहेत. मोदी सरकारला काळा पैसा शोधण्यात यश आल्याचा दावाही खासदार दानवे यांनी केला. २९.२१३ कोटींचे लपवलेले उत्पन्न उघडकीस आले आहे. ४ लाख ७३ हजार ००३ संशयास्पद व्यवहार शोधले आहेत. दोन लाख दहा हजार बनावट कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली असून तीन लाखांहून अधिक कंपन्यांच्या व्यवहाराची तपासणी केली आहे. शेअर बाजारातील ४५० कंपन्यांची नोंदणी रद्द आणि सापडत नसलेल्या ८०० कंपन्यांची नोंदणी रद्द केल्याचेही दानवे यांनी सांगितले. देशातील काळय़ा पैशाबाबत बोलताना दानवे म्हणाले, पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यासाठी काळा पैसा पुरवण्यात आला होता, असे स्पष्ट झाले आहे. व्यापारी वर्गात असंतोष काही प्रमाणात होता. मात्र आता नाही, असाही दावा दानवे यांनी केला. शिवसेनेने पाठिंबा काढला तर काय, यावर बोलताना दानवे यांनी सरकार स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे सांगितले. शरद पवार व उद्धव ठाकरे भेटीच्या वृत्तावर बोलताना दानवे यांनी राज्यातील कुठलाही नेता कोणालाही भेटू शकतो, त्यात गैर काही नाही, असे सांगितले. या वेळी आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तणवाणी आदी उपस्थित होते.

जालन्यातील काळय़ा पैशावर मौन

जालन्यातील दोन स्टील कंपन्यांवर नाशिक व औरंगाबादच्या प्राप्तिकर विभागाने दोन दिवसांपूर्वी छापे घातल्यानंतर दोन्ही कंपन्यांकडे मिळून ६० कोटी रुपयाचे काळे धन सापडल्याची चर्चा सुरू आहे. जालन्यात काळे धन आहे का, या प्रश्नावर खासदार दानवे यांनी हसून मौन बाळगले. त्यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. दरम्यान, जालन्यातील कारवाईबाबत प्राप्तिकर विभागाकडून १३२ (करचुकवेगिरी) कलमान्वये कारवाई केली असून, नावे जाहीर करता येत नसल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक, जळगाव बँकेत पैसा कुठून आला?

राज्य सरकार काही जिल्हा बँकांचे विलीनीकरण करून घेणार असल्याच्या वावडय़ा उठवल्या गेल्या. त्याबाबत विचारले असता दानवे म्हणाले, काही सहकारी बँकांमध्ये बराच पैसा जमा झाला आहे. उदाहरण म्हणून नाशिक व जळगाव बँकांचे देता येईल. या दोन बँकांमध्ये अचानक बराच पैसा आला असून तो कोठून आला, असा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raosaheb danve comment on currency demonetisation