सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या कार्यात मोलाची भर घालाल. डोकं शांत ठेवून विचार करा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागणे गरजेचे ठरेल. सहकारी वर्गाची बुद्धिमत्ता उपयोगी पडेल. जोडीदाराचे काम अंतिम टप्प्यात असल्यास पूर्ण होईल. त्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागेल. मुलांच्या शैक्षणिक बाबतीत त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. दंड व खांदेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता भासते.

वृषभ व्यवहारज्ञानाचा कारक ग्रह बुध आणि भावनांचा कारक ग्रह चंद्र यांच्या केंद्र योगामुळे विचारांमध्ये निश्चितता येईल. कामाला गती मिळेल. योग्य व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात आपल्या शब्दाला किंमत मिळेल. नव्या योजना अमलात आणाल. सहकारी वर्गाकडून चांगले काम होईल.जोडीदाराची कामे वेग घेतील. मुलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कामाची संधी मिळेल. नातेवाईकांच्या मदतीला जावे लागेल. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

मिथुन बुध-हर्षल यांचा आपल्या भाग्य आणि लाभ स्थानातून बौद्धिक योग होत आहे. या लाभ योगामुळे बौद्धिक आव्हाने पेलाल. अडचणीतून पुढे जाण्यास मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह वाद वाढवू नका. सबुरीने घ्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या मदतीची  गरज भासेल. जोडीदाराला आपल्या कामकाजातून वेळ काढून कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागेल. त्याची ओढाताण समजून घ्याल. मुलांच्या समंजसपणाचे कौतुक वाटेल. उष्णतेमुळे डोळ्यांचे विकार बळावतील.

कर्क चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला शनीच्या निश्चयाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात चढउताराला सामोरे जाल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्गावर महत्त्वाची कामे सोपवाल. जोडीदाराला कष्टाचे फळ  नक्की मिळेल. एकमेकांना आधार द्याल. मुलांबरोबर मोकळा संवाद साधाल. कौटुंबिक वातावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न कराल. पचनासंबंधित तक्रारी वाढतील. योग्य आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला गरजेचा ठरेल.

सिंह चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे नवे उपक्रम राबवण्यात उत्साह वाटेल. सद्य परिस्थितीची जाण ठेवून कामे हाती घ्यावीत. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकारांचा सदुपयोग कराल. नव्या क्षेत्रात आपल्या कामाचा वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटवाल. सहकारी वर्गाच्या मदतीमुळे कामाला गती येईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या तडजोडी कराव्या लागतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या चंद्र-शुक्राच्या केंद्रयोगामुळे चंद्राच्या कुतूहलाला शुक्राच्या नावीन्याची, कलात्मकतेची जोड मिळेल. हाती घेतलेली कामे, रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. मेहनत आणि सातत्य उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात यश येईल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुलांचा आत्मविश्वास वाढवाल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना आधार द्याल. वातविकार आणि श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे तारतम्य राखून निर्णय घ्याल. बौद्धिक आणि मानसिक संतुलन साधाल. नोकरी-व्यवसायात कामाच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल.  सहकारी वर्गाच्या अडचणी समजून मदत करणे गरजेचे ठरेल. जोडीदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील कायद्यासंबंधित कामकाजात विशेष खबरदारी बाळगावी. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्यासाठी आपण प्रयत्न कराल. खांदेदु:खी आणि उत्सर्जन संस्थेसंबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या युतियोगामुळे उत्साह वाढेल.  अध्येमध्ये कामे अडखळली तरी पुन्हा नव्या जोमाने कार्यपूर्तीकडे वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात नव्या पद्धतीचे प्रशिक्षण घेऊन प्रगती कराल. सहकारी वर्गाच्या संकल्पनांवर विचारपूर्वक कार्यवाही कराल. शेजारी अथवा नातेवाईकांच्या मदतीने समाजकार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी पार पडेल. मूत्रमार्गाचा दाह, जळजळ झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

धनू चंद्र आणि नेपच्यून या दोन भावनाप्रधान ग्रहांच्या नवपंचम योगामुळे नवी स्फूर्ती मिळेल. कामाच्या स्वरूपात किंवा पद्धतीत केलेला बदल सर्वाना लाभकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या तक्रारी, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या समयसूचकतेचा लाभ होईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मुलांचे अनपेक्षित प्रश्न हळुवारपणे हाताळावेत. उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण, तसेच मुबलक पाणी प्यावे.

मकर रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. नोकरी-व्यवसायात प्रवासाचे योग येतील. कामकाजातील बारकावे भविष्यात उपयोगी पडतील. सहकारी वर्ग नव्या जोमाने कामाला लागेल. जोडीदाराच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुले त्यांच्या कार्यात वा अभ्यासात मनापासून मेहनत घेतील. कौटुंबिक तणाव कमी होईल. पचनसंस्था आणि श्वसनसंस्था यासंबंधित त्रास अंगावर न काढता वैद्यकीय तपासणी करावी.

कुंभ  चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे काही बाबतीत मानसिकदृष्टय़ा घालमेल होईल. एखादा निर्णय पक्का करताना मनाची अस्थिरता जाणवेल. नोकरी-व्यवसायात मात्र खंबीरपणे पुढे जाल. आपल्या ध्येयाकडे वाटचाल कराल. वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने कामाला गती येईल. सहकारी वर्गाकडून खुबीने कामे करून घ्याल. जोडीदाराची आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मीन रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे नवनव्या समस्यांना तोंड देताना डोके चक्रावून जाईल. धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाला योग्य प्रशिक्षण देण्याची गरज भासेल. त्यांचे सहकार्य कराल. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी होईल. शब्द जपून वापरावेत. जोडीदारासह असलेले वाद मिटवण्यासाठी मोकळेपणाने बोलणे आवश्यक! उष्णतेने तळपाय आणि डोळे यांची जळजळ होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगावी.