सुनिता कुलकर्णी

बॉलिवूड सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला आणि टाळेबंदीच्या काळात अचानक जनमानसाचा हिरो झालेला सोनू सूद पुन्हा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेला आहे. झालं असं की सोनू सूदने टाळेबंदीच्या काळात फक्त आपापल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्यांनाच नाही तर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. साहजिकच त्याच्याकडे मदत मागण्यासाठी त्याच्या ट्विटर आकाऊंटवर लोकांची रीघ लागलेली असते.

ऑक्टोबर महिन्यातच ट्विटर जॉईन केलेल्या, जिचे फक्त तीनच फॉलोअर्स आहेत आणि जी फक्त ३१ लोकांना फॉलो करते अशा एका महिलेने सोनू सूदला तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आवाहन केलं की माझ्या मुलाला फुफ्फुसाचा आजार असून तो पूर्ण क्षमतेने श्वसन करू शकत नाही. कधी कधी त्याची ऑक्सिजनची पातळी ३० टक्के खालावते. डॉक्टरांनी लवकरात लवकर त्याची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल असं सांगितलं आहे. तुम्ही कृपया आम्हाला मदत करा.

सोनू सूदने त्या ट्विटवर तत्परतेने उत्तर दिलं आहे की उद्याच तुमच्या मुलाला मुंबईतल्या एसआरसीसी रुग्णालयात दाखल केलं जाईल आणि याच आठवड्यात त्याच्यावरची शस्त्रक्रियाही होऊन जाईल. एखाद्याला मदत हवी आहे, एखाद्याला त्याला मदत करायची आहे… वरवर पाहता हे सगळं बरोबर आहे. पण ट्विटरीयन्सनी सोनूला प्रश्न विचारले आहेत की ज्या व्यक्तीने नुकतंच ट्विटर अकाऊंट उघडलं आहे, जिने फक्त एकच ट्विट केलं आहे, जिचे फक्त तीनच फॉलोअर आहेत, जिने आवाहन करताना सोनू सूदला टॅग केलेलं नाही, जिने ती कुठे असते, मुलगा कुठे असतो हे सांगितलेलं नाही, जिने मोबाइल नंबर, इमेल असं काहीही दिलेलं नाही, तिच्या ट्वीटला लगेचच उत्तर देऊन सोनू सूद संबंधित मुलाला कुठल्या रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया आठवड्याभरातच लगेचच होऊन जाईल हे कसं काय बुवा सांगून टाकू शकतो ? आणि संबंधित महिलेच्या ट्विटला इतर कुणाचीही नाही तर पहिली प्रतिक्रिया सोनू सूदचीच कशी काय बुवा असू शकते ? कुठल्या तरी अप्रसिद्ध महिलेने असं मदत मागणारं ट्विट केलं आहे हे त्यालाच पहिल्यांदा कसं काय बुवा कळलं ?

म्हणूनच ट्विटरियन्स प्रश्न विचारताहेत…
– सोनू सूद अंतर्ज्ञानी आहे का?
– तो स्वतच शस्त्रक्रिया करणार आहे का ?
– त्याच्याकडे सुपर पॉवर आहे का?
– हा सगळा प्रसिद्धीचा स्टंट आहे का?
– टाळेबंदीच्या काळात लोकांना मदत करून त्यांचा विश्वास मिळवणाऱ्या सोनू सूदचा स्वत:वर भरवसा नाही का?