scorecardresearch

अदानी समुहाच्या बाजार भांडवलात सहा सत्रांत २.२ लाख कोटींची भर

भांडवली बाजारात अस्थिर वातावरण असूनही गेल्या सहा सत्रांत अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रित २.२ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली.

adani-group-1
adani-group-1

मुंबई : सरलेल्या सप्ताहातील सकारात्मक घडामोडी अदानी समुहातील कंपन्यांतील भागधारकांसाठी दिलासादायी ठरल्या आहेत. भांडवली बाजारात समुहातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सलग सहाव्या सत्रात तेजीत राहिले. भांडवली बाजारात अस्थिर वातावरण असूनही गेल्या सहा सत्रांत अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रित २.२ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली.

अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या कंपन्यांच्या समभागात बुधवारच्या सत्रात प्रत्येकी पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सोमवारच्या सत्रात अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात १७००० कोटींची भर पडली. यामुळे आता अदानी समुहाचे बाजार भांडवल ९ लाख कोटी रुपयांपुढे पोहोचले आहे.

हेही वाचा – वाधवा बंधू ‘सराईत कर्जबुडवे’ घोषित

चालू वर्षात जानेवारी महिन्यात अमेरिकी संस्था हिंडेनबर्गने अदानी समुहावर केलेल्या आरोपांमुळे समुहातील काही कंपन्यांच्या समभागांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.

तेजीची करणे काय?

१. अमेरिकी कंपनी जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समुहातील चार कंपन्यांच्या समभागांमध्ये सुमारे १५४४६ कोटी रुपयांनी खरेदी केली. अदानी समुहातील अदानी पोर्ट्स आणि एसईझेड, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसमधील सुमारे १७.२ कोटी समभाग बाजारात एकगठ्ठा व्यवहाराच्या माध्यमातून खरेदी केले. शिवाय जीक्यूजी पार्टनर्सकडून अदानी समुहामध्ये आणखी गुंतवणूक वाढवली जाण्याची शक्यता आहे.

२. संकटग्रस्त अदानी समुहाने समभाग तारण ठेवून घेतलेल्या ७३४७ कोटी रुपयांच्या (९०.११ कोटी डॉलर) कर्जाची मुदतीपूर्व परतफेड केली. यामुळे समुहातील सूचिबद्ध कंपन्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – पॅन-आधार संलग्न नसल्यास शेअर व्यवहारही अशक्य

‘एसीसी’चे नोंदणीकृत कार्यालय गुजरातला हलवणार!

अदानी समुहाने संपादित केलेली सीमेंट कंपनी ‘एसीसी’चे नोंदणीकृत कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या एसीसीचे नोंदणीकृत कार्यालय सिमेंट हाऊस, १२१, महर्षी कर्वे रोड, मुंबई येथे आहे. मात्र आता हे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थानांतरित होत आहे. यासाठी १४ डिसेंबर २०२२ रोजी टपाली मतदानाच्या माध्यमातून विशेष ठरावाला भागधारकांची मंजुरी मिळविली गेली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. बुधवारी कंपनीने ‘नमुना आयएनसी २६’ प्रमाणे जाहिरात देऊन, स्थानांतरणावर सार्वजनिकरित्या हरकती मागवल्या असून त्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली गेली आहे. त्यानंतर एसीसीचे नोंदणीकृत कार्यालय गुजरातमध्ये हलवण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा होणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 10:51 IST