देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने गुरुवारी पुन्हा एकदा २० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी २७ सप्टेंबरला रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्यांदा अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली कंपनी ठरली होती.

गुरुवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.९३ टक्क्यांनी वधारून १,४९५.६० रुपयांवर बंद झाला. परिणामी कंपनीच्या बाजार भांडवलात ३७,८३७.९ कोटी रुपयांची भर पडून ते आता २०,२४,१८७ कोटींवर पोहोचले आहे. समभागाने १,६०८.९५ रुपये ही ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. तर १,११५.५५ रुपये ही त्याची ५२ आठवड्यातील नीचांकी पातळी आहे. बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्यानंतर १५,५१,२१८.९३ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह एचडीएफसी बँक, टीसीएस १२,४५,२१९.०९ कोटी रुपये, भारती एअरटेल ११,४८,५१८.०५ कोटी रुपये आणि १०,२७,८३८.७९ कोटी रुपये बाजार भांडवलासह आयसीआयसीआय बँक ही पाचव्या क्रमांकावर आहे. या वर्षी आतापर्यंत रिलायन्सच्या समभागात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला मागणी का?

रिलायन्स इंडस्ट्रीज कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि डीप टेकच्या आधारे वाढीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रवेशानंतर ही समूहाची पुढची मोठी झेप आहे, असे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले. रिलायन्सने ५जी पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. शिवाय कंपनी नवनवीन क्षेत्रात व्यावसायिक ऊर्मींना आजमावत आहे.