Five Factors Behind Rise Of Sensex And Nifty: भारतीय शेअर बाजार निर्देशांक आज मजबूत पातळीवर बंद झाले असून, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्स आणि सीआरआरमध्ये १०० बेसिस पॉइंट्सची कपात केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत जोरदार तेजी पाहायला मिळाली.
आज शेअर बाजार बंद होताना, सेन्सेक्स ७४६.९५ अंकांनी किंवा ०.९२ टक्क्यांनी वाढून ८२,१८८.९९ वर पोहोचला आहे. तर, निफ्टी २५२.१५ अंकांनी किंवा १.०२ टक्क्यांनी वाढून २५,००३.०५ वर पोहोचला आहे. आज बाजारातील सुमारे २१६३ शेअर्स वधारले असून, १७१२ शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळाले. यासह बीएसई मिडकॅप निर्देशांकात ०.९ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.४ टक्के वाढ झाली आहे.
शुक्रवारी बाजारातील तेजीमागील प्रमुख घटक
१. आरबीआयकडून रेपो दर कपात:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.५ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी रेपो दर आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आर्थिक विकास दर चार वर्षांतील नीचांकी ६.५ टक्क्यांवर घसरला आहे. आरबीआयने केलेल्या या रेपो दर कपातीमुळे वैयक्तिक आणि कंपन्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे गृहनिर्माण, ऑटोमोबाईल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासारख्या क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता आहे.
२. सीआरआर कपातीमुळे बँकिंग शेअर्सना चालना
आरबीआयने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्ये १०० बेसिस पॉइंट कपात करण्याची घोषणा केली आहे, जी प्रत्येकी २५ बेसिस पॉइंटच्या चार टप्प्यात लागू केली जाईल. यामुळे कॅश रिझर्व्ह रेशो ४ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत खाली येईल. या निर्णयामुळे येत्या काही महिन्यांत बँकिंग सिस्टीममध्ये सुमारे २.५ लाख कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे. या घोषणेमुळे बँकिंग शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी झाली आहे.
३. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेत
आशियाई बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे आज गुंतवणूकदारांच्या भावनांनाही चालना मिळाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई २२५ आणि अमेरिकेतील वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्येही आज तेजी पाहायला मिळाली होती.
४. ट्रम्प-शी जिनपिंग यांच्या चर्चेमुळे व्यापारविषयक चिंता कमी झाल्या
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील फोन कॉलमुळे जगभरातील शेअर बाजारांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही नेत्यांनी चालू व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली असून, काही मुद्दे अद्यापही सुटलेले नसले तरी, दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली आहे. ट्रम्प यांनीही ही चर्चा सकारात्मक झाल्याचे स्पष्ट केले आहे.
५. कच्च्या तेलाच्या किमतीत घट
ब्रेंट क्रूडच्या किमती ०.२९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६५.१५ डॉलर्सवर आल्या आहेत. जागतिक तेलाच्या किमतीत झालेली घट भारतासाठी सामान्यतः अनुकूल आहे, कारण भारत कच्च्या तेलाच्या गरजेच्या जवळजवळ ८५ टक्के तेल आयात करतो.