scorecardresearch

जिंकेन म्हणतो एकदा..

अहमदनगरच्या ‘सावली’ या संस्थेतील निराधार मुलांसाठी शेती, आरोग्य आणि सामाजिक जाणिवेविषयी उपक्रम राबविणाऱ्या निखिलेश बागडे यांच्या कार्याविषयी..

प्रकाशाचे कवडसे– शैलजा तिवले
अहमदनगरच्या ‘सावली’ या संस्थेतील निराधार मुलांसाठी शेती, आरोग्य आणि सामाजिक जाणिवेविषयी उपक्रम राबविणाऱ्या
निखिलेश बागडे यांच्या कार्याविषयी..

टनचे नियम का लक्षात ठेवायचे, अणू-रेणूची रचना का समजून घ्यायची, वर्गमूळ, इंटिग्रेशन-डेरिव्हेशन याचा काय उपयोग, टुंड्रा देशात काय पिकते, हे मला काय करायचे’ शाळा-कॉलेजात असताना (न समजणारा अभ्यास करताना)  हे प्रश्न जवळपास आपल्या सगळ्यांनाच पडत असतील किंवा पडले असतील. काहींना कालांतराने त्यांची उत्तरे मिळालीही असतील. काहींना मिळाली नसतील तर काहींनी अशा प्रकारचे प्रश्न पडणे थोपवले असेल. असे प्रश्न का बरे पडतात, याचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपले शिकणे आणि जगणे हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आयुष्याची पहिली २५ वर्षे आपण फक्त शिकतो आणि त्यानंतरचे आयुष्य फक्त जगत राहायचे, असे आपली शिक्षणपद्धती शिकवते.
याच शिक्षणपद्धतीत निखिलेश बागडेही शिकला. निखिलेश दहावीत जेमतेम गुण मिळवल्यानंतर अकरावीत इतरांसारखाच विज्ञान शाखेकडे वळला. गणिताची आवड असलेल्या निखिलेशला अकरावीत गणितात ९८ गुण होते, मात्र जीवशास्त्रात २ गुण! त्याच वेळी त्याला आयटीआयची संधी मिळाली व त्याने अकरावी अध्र्यात सोडून तिथे प्रवेश घेतला. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरीची संधी होती, पण आपण पुढे शिकले पाहिजे या जिद्दीने त्याने बारावीची परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला (या वेळी जीवशास्त्राऐवजी त्याने भूशास्त्र घेतले.). त्यानंतर त्याने पुण्यातल्या पीआयसीटी कॉलेजातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पूर्ण केले. इंजिनीअरिंग करताना आणि केल्यावरही तो फारसा समाधानी नव्हता. त्याबाबत निखिलेश म्हणाला, ‘काय करायला नको, हे मला कळायला लागले होते, पण काय करायला पाहिजे, हे मात्र उगमत नव्हते.’ आयबीएमच्या इंटरव्ह्य़ूत त्याला ‘तुम्हाला पुढे काय करावेसे वाटते?’ असा प्रश्न विचारला होता. यावर निखिलेशचे उत्तर होते, ‘आता जर्नालिझम करावंसं वाटतंय.’ अशी खरी उत्तरे देऊनही त्याची सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या कॉग्नीझंट या नामांकित कंपनीत निवड झाली. कोडिंग, अल्गेरिदम त्याला आवडायचे, पण आपल्या कामाचा खऱ्या अर्थाने उपयोग काय हेच  समजत नव्हते. त्यामुळे कामात समाधान मिळत नव्हते. ट्रेकिंगची पॅशन, नाटक-कविता अशा लिखाणकामाची आवड असणाऱ्या, निसर्गात रमणाऱ्या निखिलेशला या जगात आपले काहीतरी हरवले आहे, असेच वाटायचे. त्याच्याच कवितेच्या भाषेत सांगायचे तर,
”रेी३ँ्रल्लॠ ्र२ ्रे२२्रल्लॠ, ’ीऋ३ ुीँ्रल्ल
िछ्रऋी ्र२ ल्ली ६ं८, ्र३ीि२ल्ल’३ १ी६्रल्ल
िछ३ ऋ ०४ी२३्रल्ल२, ूल्लऋ४२ी ि्रेल्ल
िहँी१ी ्र२ ३ँी ंल्ल२६ी१, छी३ ेी ऋ्रल्ल.ि.”
दरम्यानच्या काळात तो अहमदनगर येथील निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या ‘सावली’या संस्थेतील मुलांसाठी तो काम करायचा. त्यांच्यासोबत काही खेळ, उपक्रम घ्यायचा. हे काम करताना आपण समाजातल्या वरवरच्या समस्यांवर काम करत आहोत. मूळ प्रश्न शोधून त्यावर काम करण्याची गरज आहे, हे निखिलेशला हळूहळू जाणवायला लागले. एकदम कामात न उतरता समाजाची रचना, गरज समजून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करावे यासाठी त्याने मुंबईच्या आयआयटीतला ‘सितारा’ (उळअफअ- उील्ल३ी१ो१ ळीूँल्ल’ॠ८ अ’३ी१ल्लं३्र५ीो१ फ४१ं’ अ१ीं२) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. याच वेळी तो ‘निर्माण’ युवा चळवळीत सहभागी झाला.
‘सितारा’मधून बाहेर पडल्यानंतर त्याने ‘बायफ’ संस्थेच्या ‘शिक्षण मित्र’ या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. हा प्रकल्प आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी मुलांचे शिक्षण त्यांच्या जगण्याशी जोडणे, तसेच आश्रमशाळांच्या विकासातून गावाचा विकास करणे, या उद्देशाने २००३ साली ‘बायफ’ने नंदुरबार जिल्ह्य़ात सुरू केला. शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यावर आश्रमशाळांमधील बहुतेक मुले ही त्यांच्या पारंपरिक शेती व्यवसायाकडे वळतात. त्यामुळे १०-१२ वर्षे घेतलेले पाठय़पुस्तकी शिक्षण त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोगात आणता येत नाही. तसेच दर्जेदार शिक्षणाच्या अभावामुळे बाहेरील स्पर्धेच्या जगात स्थानही मिळवता येत नाही, असे हे विचित्र कोडे या मुलांनाच कसे सोडवता येईल, हे आव्हान स्वीकारून २०१० साली निखिलेश नंदुरबार जिल्ह्य़ात दाखल झाला.
या प्रकल्पांतर्गत शालेय तासिकांमध्ये आणखी एका तासाची भर नक्कीच करायची नव्हती, पण मग मुलांसोबत काम कसे करणार, हा त्याच्यापुढचा मोठा प्रश्न होता. सुरुवातीच्या टप्प्यात शाळा आणि मुलांशी तोंडओळख होण्यासाठी शाळेच्या मोकळ्या तासाला, मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर मुलांसोबत काही उपक्रम, खेळ घेतले. कोणताही नवीन उपक्रम शाळेत राबवायचा झाला की, आपले काम वाढले याच मानसिकतेने शिक्षक त्याचा स्वीकार करतात. हा अनुभव निखिलेशलाही आला. उपक्रम निवडताना मुलांची शाळेची वेळ, आवड, सहभाग, शिक्षकांचा दृष्टिकोन, शाळेची भौगोलिक स्थिती या सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार त्याने केला.
हे उपक्रम मुख्यत: शेती, आरोग्य व सामाजिक जाणीव याच्याशी निगडित आहेत. शेतीअंतर्गत उपक्रमांना शाळेच्या आवारातच मुले परसबाग, फळबाग, फुलबाग, रोपवाटिका, वनऔषधी, वनझाडे यांची लागवड करतात. तसेच गांडूळ खत, कंपोस्ट खतही तयार करतात. यासाठी निसर्गाशी सुसंगत असलेल्या शेतीतंत्रज्ञानाची माहिती घेऊन उपयोगात आणतात. संसर्गजन्य व पाण्यातून पसरणाऱ्या रोगापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, हात धुण्याच्या पद्धत यांसारखे आरोग्याशी निगडित उपक्रम घेतले जातात. सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी बँक, पोलीस स्टेशन यांसारख्या सरकारी संस्थांना भेटी देतात. मुलांची जीवनकौशल्ये विकसित व्हावीत, व्यवहारज्ञान वाढावे तसेच शाळेबाहेरील जगाशी परिचय होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा, याच हेतूने या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
जसजसे उपक्रम शाळेत घडत गेले तसतसे काही शाळांतील शिक्षक स्वत:हून या उपक्रमांत सहभागी व्हायला लागले. शिक्षकांच्या सहभागाने पाठय़पुस्तक या उपक्रमांशी कसे जोडता येईल, याचा विचार केला गेला. यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. हा प्रकल्प निखिलेश, शाळेचे शिक्षक यांवर अवलंबून राहू नये यासाठी बागकाम, आरोग्यकाम, बालखजिना सारखे भित्तीपत्र इ. भाग सांभाळणाऱ्या मुलांच्या वेगवेगळ्या  समित्या करून त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवली. या समितीतल्या सदस्यांची निवड सुरुवातीला शिक्षकांनी केली. पण यात हुशार मुलांनाच संधी दिली जाते, असे लक्षात आल्यावर निखिलेशने निवडणूक पद्धत सुरू केली. त्यामुळे ज्या मुलांना कामे करण्याची इच्छा आहे, अशी अबोल मुलेही यात उत्साहाने सहभागी झाली. निखिलेश सांगतो, ‘मुलांनी शाळेत करत असलेल्या उपक्रमांशी आपला समुदाय जोडून घेणे हा प्रकल्पाचाच एक भाग  आहे. सुट्टय़ांमध्ये मुले गांडूळ खत, कंपोस्ट खत आपल्या घरी तयार करतात. पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती गावात करून दाखवतात. मुलांनी केलेल्या या छोटय़ा उपक्रमांतून गावातील लोकांना नवीन तंत्रज्ञान, पद्धती याची माहिती मिळते.’
सध्या निखिलेश आश्रमशाळांमधून बाहेर पडलेल्या, अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांचे सर्वेक्षण करत आहे. त्यामागील कारणे जाणून इतर पर्याय तो शोधत आहे. याचाच एक भाग म्हणजे काही मुलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वत:चे छोटेसे व्यवसाय उभारले आहेत. निखिलेश व त्याच्या सहकारी राजश्री तिखे यांनी मिळून या उपक्रमांशी निगडित काही खेळ तयार केले आहेत. यात कोणता दाखला कुठे मिळतो व त्यांचे उपयोग, रेशनव्यवस्था कशी चालते, पंचायत राज, रोपवाटिका, परसबाग, मासिकपाळीचे चक्र, किशोर वयात होणारे बदल, संतुलित आहार, जलसंजीवनी (डफर ), शोषखड्डा, हात धुण्याची पद्धत इ. विषय हाताळले आहेत. निखिलेश या प्रकल्पांतर्गत ४८ आश्रमशाळांसोबत काम करत आहे. यातील २३ शाळा या सरकारी व इतर अनुदानित आहेत. हा प्रकल्प राबविताना आत्तापर्यंत ‘बायफ’ संस्था आर्थिक मदत करत होती. ‘बायफ’चे कार्यकर्ते, शाळेचे शिक्षक मार्गदर्शन करत होते. परंतु इथून पुढे मुलेच हा प्रकल्प स्वतंत्रपणे चालविण्यास किती सक्षम आहेत, हे तपासण्यासाठी निखिलेश तीन महिन्यांचा प्रयोग करत असे. या कालावधीत शाळेतील समित्या ‘बायफ’च्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प शाळेत राबवतील. हा परीक्षेचा काळ संपल्यानंतर प्रत्येक शाळेला एक प्रतिनिधी अशा ४८ प्रतिनिधींचे सात छोटे गट केले जातील. मुलेच शाळांच्या कामाचे परीक्षण करतील, अशी या प्रयोगाची रचना आहे.
निखिलेशच्या या प्रवासात, त्याच्या या कामाला त्याच्या घरच्यांचा पाठिंबा आहे. त्याची साथीदार सीमाही त्याचं काम समजून घेऊन त्याला प्रोत्साहन देत असते. निखिलेशची स्वत:च्या आयुष्याबद्दलची स्वप्ने वेगळी आहेत. त्याला आलिशान बंगला, गाडी याहीपेक्षा मातीच्या घरातच राहायला आवडते. आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या शक्य तेवढय़ा वस्तू हाताने बनवता यायला हव्या, असे त्याला वाटते. निखिलेशच्या मते, घरच्यांचा पाठिंबा, निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीची आवड या गोष्टी त्याला अशाप्रकारचे काम सुरू करण्यास  व ते पुढे नेण्यास खूप मदत करतात.
निखिलेश अबोल असला तरी लहान मुलांमध्ये असा रमतो की त्यांच्यातला एक होऊन जातो. त्यांच्यासोबत काम करताना त्याला खूप मजा येते, अडचणीही येतात. जसे की, एखाद्या गावात पाण्याची कमतरता असेल तर शेतीशी संबंधित सगळे उपक्रम घेणे शक्य नसते, अशा वेळी पर्यायी उपक्रम राबवणे, शिक्षक किंवा मुलांचा अपुरा सहभाग, काम करताना येणाऱ्या मर्यादा, कामातील समन्वयता असे अनेक प्रश्न सोडवत निखिलेश पुढे जात आहे. चाकोरीबद्घ शिक्षणपद्धती भेदून जगण्यात थोडे शिक्षण आणि शिक्षणात थोडे जगणे आणण्यासाठी गेली दोन वर्षे धडपड करत आहे. पण थांबत मात्र नाही. कारण तो म्हणतो,
फाटका पतंग, पुन्हा चिकटवून
उडवेन म्हणतो एकदा..
माझं शिखर, माझ्या रस्त्यानं
जिंकेन म्हणतो एकदा..
संपर्क – sumsntalone@gmail.com

 

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thinks to win one

ताज्या बातम्या