गटबाजीचा मुकाबला करण्यासाठी किंवा गटबाजीवर प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यासाठी काही ठोस उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक ठरते. गटबाजीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी व कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांविषयी सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी काही ठोस उद्दिष्टे व धोरणे कंपनीला ठरवावे लागतात व त्याची दीर्घकाल अंमलबजावणी करावी लागते.
नोकरीच्या ठिकाणी गटबाजी होते म्हणजे नक्की काय होते हे आपण मागील भागात समजावून घेतले. गटबाजीचे कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसतात. कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होते. काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांविषयी किंवा त्यांच्या हेतू विषयी मनामध्ये साशंकता व संभ्रम निर्माण होताना दिसतो. परिणामी टीममध्ये संघटनात्मक काम करण्याची मनोवृत्ती कमी होताना दिसते. या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम कंपनीच्या कार्यक्षमतेवर व उत्पादकतेवर होताना दिसतो. गटबाजीचा मुकाबला करण्यासाठी किंवा गटबाजीवर प्रतिबंधनात्मक पाऊल उचलण्यासाठी काही ठोस उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक ठरते.कोणत्याही प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी आधी तो प्रश्न ओळखावा लागतो त्यानंतर तो स्वीकारावा लागतो म्हणजेच विना शर्त मान्य करावा लागतो. आपल्याकडे प्रश्न अस्तित्वात आहे हे एकदा कंपनीतील पदाधिकाऱ्यांनी मान्य केले की मगच त्याबद्दल उपाययोजना करणे शक्य होते. पुष्कळदा प्रश्न ओळखणे व प्रश्नाचा स्वीकार करणे यामध्ये पुष्कळ काळ निघून जातो ज्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे व पर्यायाने कंपनीचे सर्व स्तरांवर नुकसान होताना दिसते. गटबाजीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी व कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांविषयी सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी काही ठोस उद्दिष्टे व धोरणे कंपनीला ठरवावे लागतात व त्याची दीर्घकाल अंमलबजावणी करावी लागते.
(गटबाजीला आळा बसण्यासाठी उपायोजना व रणनीती)
१. कंपनीतील सर्व स्तरातील सहकाऱ्यांबरोबर मनमोकळा व मुक्त संवाद साधून कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांविषयी असलेले समज गैरसमज दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी कंपनीतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरते व त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य ठरते.
२. सर्व समावेशकतेला प्राधान्य. कंपन्यांमध्ये भारतातील विविध राज्यांमधून किंवा प्रांतामधून लोक येत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनोधारणा, भाषा, जीवनशैली, संस्कृती, काम करण्याची पद्धत यामध्ये विविधता दिसून येते. अशा विविध स्तरातून व वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र करून एक सर्वसमावेशक अशी टीम निर्माण करणे तसेच एकमेकांमध्ये असलेल्या विविध गुणवैशिष्ट्यांचा आदर करणे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे.
३. टीम बिल्डिंग साठी उपाययोजना. परस्परांमध्ये एकत्रितरीत्या काम करण्यासाठी संघ भावना निर्माण होणे महत्त्वाचे ठरते यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे महत्त्वाचे ठरते . कार्यशाळांमध्ये असलेल्या विविध ऍक्टिव्हिटीज मुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद साधण्यास मदत होते व त्यांना एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची सवय देखील लागते.
४. निष्पक्ष धोरणांची अंमलबजावणी. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होताना दिसतो व आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला न्याय मिळू शकेल ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होताना दिसते व कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक देते अशी मनोधारणा होण्यास नक्कीच मदत होते.
५. नेतृत्वाची जबाबदारी. प्रत्येक टीमची जबाबदारी योग्य अशा नेतृत्व गुण असलेल्या कर्मचाऱ्याकडे सोपवा. योग्य व्यक्तीकडे नेतृत्व दिल्याने कर्मचारी काम करण्यासाठी प्रोत्साहित होताना दिसतात व टीम मध्ये सकारात्मक वातावरण व परस्पर सहकार्याची भावना निर्माण होताना दिसते.
६. योग्य वेळी मदत. कंपनीमध्ये परस्परांविषयी सहकार्याची संस्कृती निर्माण करून किंवा सर्व समावेशकतेचा पायंडा पाडून देखील काही कर्मचाऱ्यांना एकमेकांशी जुळवून घेताना त्रास होत असेल किंवा एकत्र काम करणे अवघड जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांना योग्य वेळी मदत मिळणे महत्त्वाचे ठरते. कर्मचाऱ्यांचे मानसिक व भावनिक आरोग्य नीट राहावे यासाठी कंपनीमध्ये तज्ञ व प्रशिक्षित समुपदेशकाची नियुक्ती करणे महत्त्वाचे ठरते. गरज पडल्यास समुपदेशक मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला देखील वेळोवेळी घेऊ शकतो.
वरील सर्व उपाययोजना कुठल्याही कंपनीच्या व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या असून ज्यामुळे कंपनीतील गटबाजीला प्रतिबंध होण्यास नक्कीच मदत होईल, कर्मचाऱ्यांमध्ये सामंजस्य व सहकार्य निर्माण होईल, कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगले होईल व या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कंपनीची उत्पादक क्षमता वाढेल अशी मला नक्कीच खात्री वाटते.