01 October 2020

News Flash

करिअर कथा : अभिनयाचा ‘किरण’

सुशिक्षित-मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या किरण करमरकर यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला.

किरण करमरकर

सुशिक्षित-मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या किरण करमरकर यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा ते पाच अशी चाकोरीतील नोकरी न करता अभिनयाच्या क्षेत्रातच काही तरी करायचे ठरविले होते. त्या दृष्टीने प्रयत्न, संघर्ष सुरू झाला. दूरदर्शनवरील मराठी मालिकांमधून सुरुवात केलेल्या किरण यांना पुढे हिंदीत मोठे यश आणि प्रसिद्धी मिळाली.

सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील किरण करमरकर यांना अभिनयाचा वारसा वडील दिनेश करमरकर यांच्याकडून मिळाला. ‘प्रीतिसंगम’, ‘गरुडझेप’, ‘मृत्युंजय’ आणि अन्य अनेक नाटकांतून त्यांनी अभिनय केला. नाटकाच्या तालमी, दौरे, कलाकारांचे घरी जाणे-येणे आदींमुळे अभिनय क्षेत्राविषयीची आवड किरण यांना लहानपणीच निर्माण झाली. किरण यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण दादरच्या छबिलदास शाळेत तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी विद्यालय-मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. शाळेत सहावी-सातवीत असताना विलास जोशी सर यांच्यामुळे एकांकिका स्पर्धातून सहभाग नोंदविला होता. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मित्रांच्या मदतीने ‘आलेख’ नावाची संस्था सुरू केली. नायर रुग्णालयात रॅगिंग या विषयावर पथनाटय़ आणि पुलंच्या ‘एका रविवारची कहाणी’ यातील काही भाग सादर केला होता. त्याचेही कौतुक झाले होते. आपल्याला अभिनय आवडतोय याची जाणीव आणि आत्मविश्वास त्याच वेळी किरण यांना मिळाला.

महाविद्यालयात तृतीय वर्षांला असताना दूरदर्शनवर अरविंद औंधे लिखित ‘नीरक्षीर’ हे नाटक प्रसारित झाले होते. विक्रम गोखले यांची त्या नाटकात मुख्य भूमिका होती. ते नाटक पाहून प्रभावित झालेल्या किरण यांनी विक्रम गोखले यांना सविस्तर पत्र लिहिले. ते पत्र वाचून गोखले यांनी किरण यांना भेटायला बोलावले. अभिनय क्षेत्रातच यायचे असल्याचे किरण यांनी त्यांना सांगितले. या परिचयातून किरण यांना पुढे ‘दिनमान’ ही पहिली मराठी मालिका मिळाली. डिसेंबर १९९० च्या सुमारास मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ही मालिका प्रसारित झाली.

त्यानंतर काम मिळविण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला. पुढे ‘हसत खेळत’ ही मालिका, ‘देवाचिये द्वारी’ ही टेलिफिल्म त्यांनी केली. सुरुवातीच्या काळात ‘निष्पाप’, ‘यज्ञ’ हे मराठी चित्रपट केले. १९९३ च्या सुमारास हातात काहीच काम नव्हते. नुसते घरी बसून राहणेही पटत नसल्याने त्यांनी त्या काळात पाच महिने नोकरीही केली. १९९४ ते १९९६ या काळात सुमारे शंभर जाहिरातींमध्येही त्यांनी काम केले. १९९६ मध्ये ‘दामिनी’ या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्याआधी ‘नाटय़संपदा’ संस्थेच्या ‘किमयागार’ नाटकात त्यांनी भूमिका केली. ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या  काही प्रयोगांतही काम केले.

एकता कपूर यांच्या ‘घर एक मंदिर’ या हिंदी मालिकेच्या निमित्ताने किरण यांचा हिंदी मालिका क्षेत्रात प्रवेश झाला. पुढे एकता कपूर यांचीच ‘कहानी घर घर की’ ही मालिका त्यांना मिळाली आणि ग्लॅमर, प्रसिद्धी म्हणजे काय याचा अनुभव त्यांनी घेतला. मराठीच नव्हे तर अन्य भाषक लोकांमध्येही ओळख निर्माण झाली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही किरण करमरकर हे नाव माहिती झाले. यानंतर हिंदीतील त्यांची घोडदौड सुरू झाली.  ‘कहेना है मुझको’, ‘थोडी सी जमीन थोडा सा आसमान’, ‘जिंदगी कहें स्माइल प्लीज’, उतरन, बदलते रिश्तों की दास्तान, पुकार, तमन्ना, ‘ढाई किलो प्रेम’ या हिंदी मालिका तर ‘राजनीती’, ‘चक्रव्यूह’, ‘जय गंगाजल’ हे हिंदी चित्रपट केले. ‘बस इतनासा ख्बाव’, ‘कच्चे लम्हे’, ‘हमसफर’ यासह सहा हिंदी नाटकांतून तर ‘आरोही’, भातुकली, ‘फॅमिली कट्टा’, ‘कान्हा’, ‘ए रेनी डे’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आम्ही दोघी’ या मराठी चित्रपटांतून त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. अलीकडेच ‘झी युवा’ वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘रुद्रम’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले होते.

सुरुवातीच्या काळात काही मराठी नाटके केली पण नंतर हिंदी मालिकांमध्ये व्यग्र झाल्याने मराठी व्यावसायिक नाटकासाठी वेळ देता आला नाही. त्यामुळे मराठी नाटकात काम करता आले नसल्याची खंत किरण यांनी व्यक्त केली. आज मी जो कोणी आहे त्याचे सर्व श्रेय ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना आहे. त्यांचा अभिनय पाहून, त्यांच्या मार्गदर्शनातून माझ्यातील कलाकार घडत गेला, असेही किरण यांनी आवर्जून सांगितले.

कोणतेही क्षेत्र करिअर म्हणून निवडायचे ठरविले तरी संघर्ष हा करावाच लागतो. अभिनयाच्या क्षेत्रात आज संधी खूप निर्माण झाली असली तरी स्पर्धाही तेवढीच वाढलेली आहे. एखादी मालिका, वेब सीरिज केली म्हणजे मोठे कलाकार झालो या भ्रमात कधीही राहू नका.

केवळ सुंदर दिसून चालत नाही तर अभिनयही यावा लागतो. आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती जास्त काम मिळाले, त्याच्याकडे किती महागडी गाडी आहे, यश, पैसा किती अधिक आहे याचा हेवा कधीही करू नका. तर दुसऱ्याला मिळालेल्या चांगल्या भूमिका आणि अभिनय याचा हेवा करा, असे किरण म्हणाले. मेहनत, जिद्द  आणि शिकण्याची तयारी कायम ठेवा. तुमचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करा, असा मित्रत्वाचा सल्लाही किरण यांनी या  क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला दिला.

shekhar.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2018 2:00 am

Web Title: kiran karmarkar career in acting
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञानाची तयारी
2 संशोधन संस्थायण : आकाशाशी जडले नाते!
3 एमपीएससी मंत्र : इतिहास प्रश्नांचे स्वरूप आणि विश्लेषण
Just Now!
X