रेश्मा भुजबळ

शिकण्यासाठी, नव्या गोष्टींचा प्रारंभ करण्यासाठी वय कधीच आड येत नाही. तुमच्यातली जिद्द आणि ती गोष्ट करण्याची मनापासूनची इच्छाच पुरेशी असते, याचेच उदाहरण म्हणजे साठीतल्या केराबाई सरगर. रेडिओवर कार्यक्रम सादर करण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पन्नाशीत पूर्ण झाले. अक्षरओळख नसतानाही केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर त्या सातत्याने वैविध्यपूर्ण गाणी गाऊन गेली दहा वर्षे अखंडपणे माणदेशी तरंग वाहिनीवर कार्यक्रम सादर करत आहेत.

‘‘मैत्रिणींनो, महिला विशेष प्रसारण सभेत आपल्याला भेटायला आलेल्या आहेत, केराबाई सरगर आणि आपण ऐकणार आहोत, एक छानसं लोकगीत.’’

माणदेशी तरंग वाहिनी ९०.४ मेगा हर्ट्झवर ही ‘अनाऊसमेंट’ होते आणि केराबाई सरगर गाऊ लागतात..

राधे चल माझ्या गावाला जाऊ

सारं गोकुळ फिरून पाहू।

गोकुळ माझं गाव

साऱ्या गावात माझं नाव।।

वासुदेव माझा पिता,

आहे देवकी माझी माता।।..

साठी नुकतीच ओलांडलेली. रापलेला सावळा वर्ण, चेहऱ्यावर आनंद पसरलेला. काठापदराचे नऊवारी लुगडे, खणाची चोळी, डोक्यावर पदर. हातात डझनापेक्षा जरा जास्तच बांगडय़ा, कपाळावर ठसठशीत कुंकू, पायात जोडवी आणि डोक्यावर घेतलेल्या पदरावर घट्ट बसवलेला हेडफोन अशा पेहरावात केराबाई मग्न होऊन गात असतात. थोडीथोडकी नव्हे तर गेली १० वर्षे केराबाई सातारा जिल्ह्य़ात असणाऱ्या म्हसवड येथील ‘माणदेशी तरंग वाहिनी’वर गाण्याचे कार्यक्रम सादर करताहेत, तेही कोणत्याही वाद्याची साथसंगत नसताना.

केराबाईंच्या गाण्याचे विषय ग्रामीण जीवनाशी नातं सागणारे असेच असतात. कधी पाळणा, कधी ओव्या, कधी अभंग, कधी लोकगीतातून त्या ग्रामीण भागातलं, खासकरून माणदेशीचं जीवनच जणू ऐकणाऱ्यांसमोर उलगडत असतात. संगीतातलं कुठलंही औपचारिक शिक्षण नाही, की अक्षरओळख नाही. शहरी भागात रेडिओ वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करणाऱ्यांपेक्षा खूपच वेगळ्या असणाऱ्या केराबाईंच्या तिथवरच्या प्रवासाची उत्सुकता कुणालाही वाटेल असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व. आपला हा प्रवास उलगताना त्या म्हणाल्या, ‘‘मी मूळची सोलापूर जिल्ह्य़ातल्या माळशिरस तालुक्यात असणाऱ्या सुळेवाडीची. तिथे माझ्या वडिलांची शेती होती. घरी आई, आजी, चुलत्या असा सगळा गोतावळा. पूर्वी जात्यावरच धान्यं दळली जायची. माझ्या आईचा, आजीचा गळा गोड होता. अगदी लहान असताना मला मांडीवर घेऊन जात्यावरची गाणी गात गात त्या पहाटे धान्य दळायच्या. ते एकून मी शांत व्हायची अशी आठवण माझी आई सांगायची. जरा मोठी झाल्यावर मी त्यांचा आवाज ऐकून जागी व्हायची आणि त्यांच्याबरोबर गाणी ऐकत, गात दळायला मदत करायची. माझ्या वडिलांची शेती होती, शेतीतली सगळी कामं आम्ही करायचो तिथंही आई आणि इतर बायका शिणवटा घालवण्यासाठी गाणी म्हणायची. तिथूनच मला गाण्याची आवड निर्माण झाली. फक्त गाणं गाण्याची नव्हे तर गाणं रचण्याचीसुद्धा. कारण आई-आजी म्हणायच्या ती गाणी कधी कधी त्यांनी पूर्वी ऐकलेली, पारंपरिक गाणी असत अन्यथा, त्यांच्या रोजच्या जगण्यातला भागच त्यांच्या गाण्यातून व्यक्त होई. तो गेय स्वरूपात कसा व्यक्त करायचा हे मी तिथे शिकले.’’

‘‘माझं लग्न बालवयातच झालं आणि मी म्हसवडपासून ९ किलोमीटरवर असणाऱ्या दीडवागवाडी (सरगर गोठा) इथं आले. सासरी शेतीवाडीची, घरातली खूप कामं असायची. ती कामं करताना, लहान जीव असल्यानं थकून जायचा. पण तो कामाचा भार माझ्या मनात सुरू असलेल्या गाण्यामुळे, कमी वाटायचा.’’ सासरच्या घरी असं न म्हणता केराबाई ‘नांदायच्या घरी’ असा उल्लेख करतात. तर त्यांच्या नांदायच्या घरी शंभरहून अधिक शेळ्या मेंढय़ा होत्या. त्यांना घेऊन त्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्य़ांचा प्रवास करायच्या. त्या वेळी कधी कधी मेंढय़ाच्या मागे मागे फिरताना त्यांची गाण्याची हौस पूर्ण व्हायची. केराबाई सांगतात, ‘‘पहिली मुलगी झाली आणि मग आमचं मेंढय़ा घेऊन फिरणं बंद झालं. सासऱ्यांनी मेंढय़ा विकून बैल विकत घेतले आणि शेती करणं सुरू केलं. शेतातला माल (उत्पन्न) विकायला पुण्याला गेले असता मालकांनी (पतीने) रेडिओ आणला.’’ तिथून मग आकाशवाणीवरचे संगीताचे कार्यक्रम काम करता करता ऐकणं हा त्यांचा छंदच झाला.

त्या सांगतात, ‘‘लता मंगेशकर, आशा भोसले आणि इतर मंगेशकर बहिणींनी गायलेली गाणी तर मला आवडायचीच, शिवाय दादा कोंडके यांचीही गाणी मला आवडायची. माझं शिक्षण नसल्यानं लिहून ठेवणं हे काही मला जमायचं नाही, मात्र पुन्हा पुन्हा ती गाणी ऐकून मला पाठ व्हायची.’’ तुम्ही गाता आणि तुमच्याकडे गाणी, ओव्या रचण्याची कला आहे हे घरच्यांना केव्हा समजलं, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी रुखवत घेऊन जाण्याची परंपरा होती. तो वाजतगाजत नवऱ्यामुलाकडे आणि त्याच्या घरून नवरीमुलीच्या घरी नेला जायचा. त्या वेळी रुखवत म्हटला जायचा.

आला रुखवत

रुखवतात चिपाड

विहिनीला मारलं धिपाड

आला आला रुखवत

त्यावर ठेवली विळती

नवऱ्याची करवली

कोंबडीसंग खेळती

आला आला रुखवत

पाटलाच्या आळी

आत उघडून बघते

तर दीडच पोळी

म्हणजे यात गावातल्या मंडळींचे गुणदोष सांगितले जायचे. एकदा मी म्हटलेला रुखवत माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणीने ऐकला. त्या जवळपासच्या गावांमध्ये रुखवत म्हणायला जायच्या. त्यांनी मला त्यांच्याबरोबर रुखवत तसंच हळदीची गाणी, पाळणा म्हणायला न्यायला सुरुवात केली आणि माझं गाणं सुरू झालं.’’

रेडिओवरची गाणी ऐकताना केराबाई नेहमी ऐकायच्या की, हा कार्यक्रम पुणे, मुंबई किंवा सांगली.. रेडिओ केंद्रावरून सादर केला जात आहे. त्यांना वाटायचं आपणही पुण्याला जावं आणि कार्यक्रम सादर करावा. पण शिक्षण नाही, त्यामुळे कुठे, कसे गेल्यावर कार्यक्रम सादर करता येतो याची माहिती नाही आणि हे स्वप्न उराशी बाळगूनच त्यांनी पन्नाशी गाठली. कदाचित ही खंत होती म्हणूनच त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी कष्ट उपसले. माण तालुका कायम दुष्काळग्रस्त. त्यामुळे आपल्या शेतीबरोबरच दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं, रोजगार हमी योजनेची कामं करायची, बाजारात शेतीतलं उत्पन्न विकायचं असे सगळ्या प्रकारचे कष्ट त्यांनी केले. मुलांनाही त्यांची गाण्याची आवड माहीत होती, त्यांना रेडिओवर गायचंय हेही माहीत होतं. एकदा मोठा मुलगा म्हसवडला गेला असता त्याने ‘माणदेशी तरंग वाहिनी’ची जाहिरात पाहिली आणि केराबाईंना तो माणदेशी तरंग वाहिनीच्या कार्यालयात घेऊन गेला. तिथे त्यांना गाण्याची संधी देण्यात आली आणि १९९८ पासून गेली दहा वर्षे त्या गाण्याचे कार्यक्रम सादर करताहेत. तिथे गेल्यावर त्यांना तिथल्या ‘इन्स्ट्रमेंट’ची भीती अशी वाटली नाही, त्या सांगतात, ‘‘रेडिओवर गायला मिळणार हा आनंदच एवढा होता की त्यात भीतीला जागाच नव्हती.’’

केराबाई सादर करत असलेली काही गाणी त्यांनीच रचलेली असतात, तर काही पाळणे, ओव्या त्यांनी पाठ केलेल्या आहेत.

‘‘मला अक्षरओळख नसली तरी पूर्वी माझे मालक पोथ्या वाचायचे. पुराणात सांगितलेल्या प्रसंगांवर मी गाणी रचायची. मदत ते करत असतात. माझ्या मालकांनीही मला कधी अडवले नाही.’’

आता आठवडय़ातून चार-पाच वेळा त्यांचे कार्यक्रम होत असतात. ‘माणदेशी फाऊंडेशन’च्या संस्थापक चेतना सिन्हा या माणदेशातल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी केराबाईंच्या गुणांना हेरून त्यांना आतापर्यंत दिल्ली, मुंबई, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणी नेऊन त्यांचे कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ ‘रेडिओ मिर्ची’, ‘रेडिओ नशा’सारख्या वाहिन्यांना पडली आणि त्यांना तिथेही कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं. असं असलं तरी केराबाई केवळ गाण्यांमध्येच अडकून पडल्या आहेत असं नाही. आजही त्या नियमित शेतात कामाला जातात, शेतात काम करता करता गुणगुणत असतात. कधी त्यांची माहिती घेऊन कोणी आलंच त्यांच्याशी बोलायला तर त्याला आपल्या अस्सल माणदेशी भाषेत आपली चित्तरकथा ऐकवून न लाजता एखादी ओवी, गाणं म्हणून दाखवतात..

..‘‘सुंदर माझं जातं गं, फिरतं बहुत..

ओवी गाऊ कौतुकात, गाऊ या संविधान..

पहिली माझी ओवी ग भीमाच्या लेखणीला।

इद्रोहाचं इचार रुजवून शानं केलं लोकांना।।’’..

chaturang@expressindia.com