28 February 2021

News Flash

गद्धेपंचविशी : आठवणींच्या वर्तुळांचा अंर्तबध!

१९७४ मधील माझ्या वैयक्तिक आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न.

डॉ. सुचेता भिडे- चापेकर

माणसं एखाद्या कलेत मोठी उंची गाठतात, कारण त्यांनी योग्य निर्णय योग्य वेळी घेतलेले असतात.  ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चाफेकर यांचं आयुष्य हे अशाच योग्य निर्णयांचं संचित आहे. चित्रकला आणि नृत्यकलेचा एकत्रित अभ्यास असो, त्यासाठी ‘जे.जे.’ची निवड करणं असो, की या प्रवासादरम्यानचा वाया जाणारा वेळ  कारणी लावण्यासाठी ‘अभिनयदर्पण’मधील श्लोकांचं पाठांतर करणं असो, मित्र-मैत्रिणी कॅ न्टिनमध्ये मजा करत असताना आपण मात्र वर्गात बसून नृत्याचं नोटेशन लिहिणं असो की, अमराठी मैत्रिणीकडून जाणीवपूर्वक इंग्रजी बोलणं शिकू न घेणं असो, महाकाय जहाजावरील बारमध्ये नृत्य करण्यासाठी ठामपणे नकार देऊन अभिजात कलेची अस्मिता जपणं असो, कर्नाटक संगीत शिकणं असो, की संशोधनासाठी थेट तंजावरला जाणं असो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्याचा जोडीदार निवडणं असो.. हे सगळे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या विशी ते तिशी या वयादरम्यानचे. एके क आठवण म्हणजे एक एक वर्तुळ. त्यांच्या अंर्तबधातून समोर आलेलं हे त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय पर्व..

पंचविशी हा खरं तर आपल्या वयाच्या २० ते ३० वर्षांच्या दरम्यानचा फार महत्त्वाचा, उमेदीचा काळ. त्याला वाक्प्रचारात ‘गाढव’ का ठरवून टाकलंय तेच कळत नाही! असो! माझा स्वभाव फार मागचं काही आठवत बसण्याचा नाही. पण आता वयाच्या ७३व्या वर्षी पंचविशीतले ते बिनधास्त दिवस पुन्हा आठवताना आणि त्या निमित्तानं ते जणू पुन्हा जगताना मजा वाटतेय याची कबुली दिलीच पाहिजे. या काळातल्या आठवणींची वर्तुळं एकमेकांमध्ये इतकी गुंतली आहेत की लिहिताना थोडंफार पुढेमागे झालं तर वाचक समजून घेतील अशी अपेक्षा करते.

माझे वडील चित्रकार. त्यांच्याच प्रेरणेनं मी वयाच्या पाचव्याच वर्षी नृत्य शिकायला सुरुवात के ली होती. मला शाळेच्या अभ्यासातले विषय आवडायचे आणि तितकं च नृत्यही आवडायचं. चित्रकला घरातच पाहात असल्यामुळे ती आवड होतीच. मॅट्रिकला मला उत्तम गुण होते. तरीही मी ‘आर्ट स्कू ल’लाच जावं म्हणजे त्याबरोबर नृत्याचं शिक्षण सुरू राहील, असं वडिलांचं म्हणणं होतं. मलाही ते मान्य होतं. त्यामुळे माझ्या विशीची सुरुवात ‘जे. जे. स्कू ल ऑफ आर्टस्’मध्ये झाली. नृत्याचं पुढील शिक्षणही सुरू झालं. भरतनाटय़म्मधील ज्येष्ठ कलाकार आचार्य पार्वतीकु मार माझे आद्य गुरू. त्या काळात ते माझं आराध्य दैवत होतं. ते ग्रँट रोडला राहात आणि त्यांच्या घरी जाऊनच आम्ही शिकत असू. माझं घर शिवाजी पार्क ला होतं आणि महाविद्यालय ‘व्ही.टी.’ला (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस). त्यामुळे मी पश्चिम आणि मध्य रेल्वे दोन्हीचे पास काढायचे आणि शिवाजी पार्क  ते दादरची जा-ये पायी-पायी किं वा ‘डबलडेकर’ बसनं. डबलडेकर बसमध्ये वरच्या मजल्यावर जाऊन सगळ्यात पुढची सीट मिळवायची आणि मस्त वारा खात जायचं याची मला प्रचंड हौस! या सगळ्या प्रवासात खूप वेळ जाई. मग मी एक शक्कल लढवली होती. बसच्या तिकिटाच्या मागच्या बाजूस रोज ‘अभिनयदर्पण’ ग्रंथातील एक श्लोक मी लिहायचे आणि ती चिठ्ठी मनगटावरील घडय़ाळाच्या पट्टय़ात अडकवून ठेवायचे. येता-जाता या श्लोकाचं पाठांतर होई. भरतनाटय़म् शैलीच्या नृत्यशिक्षणात हे श्लोक फार महत्त्वाचे. असं करत करत या काळात माझं पूर्ण ‘अभिनयदर्पण’ पाठ झालं होतं. आजही नृत्य शिकवताना ते कामी येतं. या काळात मास्तरांचं तंजावरच्या भोसले राजांच्या मराठी नृत्यरचनांवर संशोधन सुरू होतं आणि त्यांनी मला त्याचा एक भाग करून घेतलं हे माझं भाग्य. एके क मराठी रचना तर मी शिकत होतेच, पण त्यावरच्या लिखाणातही त्यांना मदत करत होते. या सुमाराला महाविद्यालयीन शिक्षणही जोरात सुरू होतं. त्या जीवनातल्या काही गोष्टी प्रकर्षांनं आठवतात. १९६८-६९ मध्ये ज्येष्ठ रंगकर्मी

दामू कें करे आमचे विभागप्रमुख होते. दर महिन्याला विद्यार्थ्यांची काही प्रेझेंटेशन्स होत असत. ते मला म्हणाले की, तू नृत्य शिकतेस, तर चित्रकला आणि नृत्य यातल्या समांतर मुद्दय़ांवर बोल. नृत्य आणि चित्रकला यांच्या परस्परसंबंधाशी माझी ती पहिलीच ओळख. ती खोलवर रुजली. चित्रंच काय, पण सगळ्याच कलांशी नृत्याचं नातं आहे आणि नृत्य हे एक सर्वंकष माध्यम आहे ही महत्त्वाची जाणीव या काळात माझ्या मनात तयार झाली. आज पुणे विद्यापीठात ‘एम.ए.- नृत्य’ अभ्यासक्रमात ‘नृत्य व इतर कलांचा अंर्तबध’ हा मी सुचवलेला विषय मान्यताप्राप्त आहे.

माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमात झालं, पण आपल्याला संवादात्मक इंग्रजी चांगलं यायला हवं हे कळायला लागलं होतं. माझ्या आईनं मात्र त्या काळातही इंग्लिश आणि ‘सांख्य फिलॉसॉफी’ घेऊन ‘बी.ए. ऑनर्स’ के लं होतं. त्यामुळे मी पुष्कळ इंग्लिश वाचत असे, बोलण्याची सवय नव्हती. आमचा एक मराठी मुलींचा ग्रुप होता, पण सकीना काचवालाशी माझी विशेष मैत्री जमली. तिचं शिक्षण के म्ब्रिज शाळेतलं आणि इंग्लिश फारच उत्तम. मग जेवणाच्या सुट्टीत ती मला इंग्लिश उच्चारण शिकवे आणि माझ्याशी मुद्दाम इंग्लिशमधूनच बोलत असे. पुढे परदेश दौऱ्यांमध्ये नृत्याचे कार्यक्रम करताना आपण काय सादर करणार आहोत याबद्दलची प्रस्तावना इंग्लिशमध्ये करावी लागे. तेव्हा सकीनानं कॉलेजमध्ये घेतलेली अनौपचारिक शिकवणी मदतीस आली. तिच्याशी माझा संपर्क  अजूनही टिकू न आहे.

‘जे.जे.’त असताना स्के चिंगवर हात बसावा म्हणून आम्ही रेल्वे स्टेशन, राणीचा बाग अशा ठिकाणी जाऊन स्के चेस काढत होतो. वेगवेगळ्या स्थितीत बसलेली, झोपलेली माणसं, घरं, झाडं, असं काहीही. या प्रतिमांचं निरीक्षण करताना डोक्यात एकीकडे नृत्याभिनयाचा सुप्त विचार चालू असे. माझ्याही नकळत शिक्षणासारखं हे सगळं आत झिरपत होतं. कॉलेजमधून मिळणारा मोकळा वेळ मी मास्तरांच्या नृत्यावरील पुस्तकाच्या लिखाणासाठी वापरायचे. जेव्हा इतर मित्रमैत्रिणी कॅ ण्टिनमध्ये असत तेव्हा मी मात्र ड्रॉइंग बोर्डवर वह्य़ापुस्तकं  ठेवून नृत्याचं ‘नोटेशन’ लिहिण्यात गुंतलेली असे. आम्हाला ‘कॅ लीग्राफी’ शिकवणारे साठे सर चक्क त्याचं कौतुक करून मला प्रोत्साहन द्यायचे.

‘जे.जे.’ची स्वप्निल वर्ष भराभर उलटली. आता मी एक नर्तकी म्हणून उभी राहू पाहात होते. करिअर, व्यवसाय, असे शब्द तेव्हा मनातही नव्हते. पण नृत्य कायम माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग असेल, हे मनात कधीच पक्कं  झालं होतं. ‘जी.डी. आर्ट’ झाल्यावर डिझायनिंगची काही स्वतंत्र कामं मी   के ली खरी, पण चित्र, साहित्य, संगीत, अभिनय या माझ्या सर्वच आवडींना वाव देणारं नृत्य हेच माझ्या पुढच्या प्रवासात मला निर्मितीस स्फू र्ती देत राहिलं. पार्वतीकु मार मास्तरांनी संरचित के लेल्या आणि मी सादर के लेल्या भरतनाटय़म्मधील रचनांच्या कार्यक्रमांना तेव्हा खूपच प्रसिद्धी मिळाली आणि मग कार्यक्रमांचा सपाटाच सुरू झाला. याच काळात माझ्यासाठी एक अद्वितीय संधी चालून आली. ‘एस.एस. फ्रान्स’ नावाच्या ‘लग्झरी लायनर’वर कार्यक्रम करत पूर्व   आफ्रिके ला जाण्यासाठी माझी निवड झाली.

हे माझं पहिलं परदेशगमन आणि तेही ‘टायटॅनिक’सारख्या महाकाय जहाजातून! ते जहाज म्हणजे तरंगता राजवाडाच होता. मोठमोठाले ‘लाऊंज’, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, अडीचशे प्रेक्षक बसू शकतील असं नाटय़गृह.. तिथे मला कार्यक्रम करायचा होता. पण प्रथम झालं ते उलटंच! जहाजाच्या डेकवर एक बार होता, तिथे कार्यक्रम करायला सांगण्यात आलं. मला रडायलाच आलं! ‘‘समुद्रात उडी मारून मुंबईला पोहत जाते,’’ असं म्हणू लागले. पण वडील बरोबर आले होते. त्यांनी माझी समजूत काढलीच, पण जहाजावरच्या लोकांनाही समजावलं, की आमचं शास्त्रीय नृत्य असं होणार नाही. त्यांनी डेकवर थिएटरसारख्या गोलाकार खुच्र्या मांडून घेतल्या, कार्यक्रम होईपर्यंत ‘नो ड्रिंक्स’ असं कबूल करून घेतलं त्यानंतरच मी नृत्य के लं. तिथल्या एक बाई रडू लागल्या, वडिलांना म्हणाल्या, ‘‘मी कॅ बरे डान्सर आहे. रोज इथे कॅ बरे करते. वुई सेल अवर बॉडीज्.. शी हॅज बॉट माय सोल!’’ मला फार बरं वाटलं. तिच्या त्या शब्दांनी अभिजात कलेविषयी माझ्या मनाला जो आत्मविश्वास दिला तो आजतागायत कायम आहे.

या काळात वडील सर्वार्थानं माझे पालक होते. मी खूप रियाज करत होते, खूप ताकदीनं नृत्य करीत होते, प्रेक्षकांची वाहवा मिळवत होते, पण हे सारं आणखी पुढे जायला हवं याची वडिलांना जाण होती. ते हाडाचे कलाकार. एक दिवस ते मला म्हणाले, ‘‘आजवर तू गुरूंच्या पंखाखाली मोठी होत होतीस. आता तुझं तुला उडायला शिकलं पाहिजे. कलेत शिकणं कधीच संपत नाही. तुझ्यात काय कमी आहे तेही तू शोधायला हवंस.’’ मी जे करत होते त्याच्या पुढे पाहायला त्यांच्यामुळे शिकले. लहानपणापासून ते मला अनेक नावाजलेल्या भरतनाटय़म् नृत्यांगनांचे कार्यक्रम पाहायला नेत असत. सुप्रसिद्ध अभिनयसम्राज्ञी बालसरस्वती यांचे अनेक कार्यक्रम मी आस्वादले आणि एक दिवस असा साक्षात्कार झाला, की मला कर्नाटक संगीत शिकलं पाहिजे. संगीताचा कान मला होता, पण संगीत हा नृत्याचा आत्मा आहे. नृत्य म्हणजे दृश्य संगीत. मनानं ध्यास घेतला की गुरू भेटतातच असा माझा अनुभव आहे. तशा मला थैलांबाळकृष्णन् भेटल्या आणि माझं रीतसर कर्नाटक संगीत शिक्षण सुरू झालं. ते शिक्षण पुढच्या संपूर्ण नृत्यप्रवासाचा पाया ठरलं.

मग मी मुंबईतून बाहेर पडले आणि थेट तंजावर गाठलं. मास्तरांकडून शहाजीराजे भोसले (सतराव्या शतकातील तंजावरचे दुसरे मराठी राजे) यांचं नाव संगीत रचनाकार म्हणून ऐकलं होतं. माझ्या गुरूंचं संशोधन आणि रचनाकार म्हणून असलेलं काम हे राजे सरफोजी (१८व्या शतकातील) यांच्या रचनांबद्दलचं होतं. या रचना मी नृत्यात सादर करत असे. त्या रचनांच्या एक शतकभर आधी भरतनाटय़म् रचनांचे घाट कसे असतील आणि आजच्या रचनाघाटांची सुरुवात कु ठून झाली असेल, ही जिज्ञासा मला १९७१ मध्ये प्रथम तंजावरला घेऊन गेली. अर्थातच मधला मुक्काम कायम मद्रासला (चेन्नई) असेच. तेव्हाही प्रथम विशीतली कन्या इतकी दूर जाणार म्हणून वडील बरोबर आले होते. नंतरच्या वाऱ्या मात्र मी एकटीनं के ल्या. तंजावर सरस्वती महाल ग्रंथालयातील शहाजींच्या साहित्यसंपदेत मी अक्षरश: बुडून गेले. काय घेऊ आणि किती घेऊ असं होत होतं! नृत्यासाठीच्या इतक्या सुंदर साहित्य-संगीत रचना समोर येत होत्या. मराठीभाषक पं. भीमराव, तेलुगू

पं. विश्वनाथन् यांच्यासारखे सुहृद विद्वान भेटले आणि या रचनांचा सर्वागीण अभ्यास करून काहींची सादरीकरणासाठी मी निवडही करू शकले.

मनानं एखादी गोष्ट ठरवावी आणि मार्गदर्शक भेटावे, असं पुन्हा घडलं आणि गुरू किटप्पा भेटले. पार्वतीकु मार मास्तर महाराष्ट्रीय आणि स्वयंभू भरतनाटय़म् गुरू होते, तर किटप्पा सर हे अठराव्या शतकातील संगीतकार तंजावर बंधूंच्या परंपरेतील आणि त्यांच्याच कु टुंबातील. आता भरतनाटय़म्ची एक वेगळी सांगीतिक बाजू आणि वेगळा आवाका मला समजला. किटप्पा गुरुजींचं शिष्यत्व लाभणं हे माझं भाग्यच. त्यांनी मी संशोधिलेल्या राजे शहाजींच्या मराठी आणि हिंदी रचना संगीतबद्ध करून दिल्या, त्यातील ताल-लयीचा भाग नृत्यात संरचितही करून दिला. त्यांच्या आणि चेन्नईतील इतर संगीतकारांच्या साथीनं १९७४ मध्ये मद्रासच्या सुप्रसिद्ध म्युझिक अ‍ॅकॅ डमी संस्थेत झालेला तंजावर शहाजींच्या रचनांचा कार्यक्रम हा माझ्या पंचविशीतला एक मानबिंदू. त्यानंतरही पुढचं एक तप माझं किट्टपांजवळील शिक्षण, ते जिथे-जिथे असतील तिथे- म्हणजे तंजावर, बंगळूरु, मुंबई, सगळीकडे त्यांच्या मागे जाऊन चालूच राहिलं.

१९७४ मधील माझ्या वैयक्तिक आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न. त्यामुळे मी ‘भिडे’ची ‘चापेकर’ झाले आणि अनिल नावाचं एक समृद्ध व्यक्तिमत्त्व पती म्हणून माझ्या आयुष्यात आलं. बदलापूरचे प्रसिद्ध साहित्यिक, विद्वान ना. गो. चापेकर यांच्या घरानं मला माझ्या नृत्याची समृद्धी वाढवण्यासाठी खूप काही दिलं. वयाची पंचविशी गाठेपर्यंत माझ्या लग्नाचा विषय घरात झालाच नव्हता. माझा भाऊ पुण्याच्या ‘सीओईपी’ महाविद्यालयात बोटिंगच्या ग्रुपमध्ये होता. या ग्रुपमधल्याच एका मुलाची निवड मी मनोमन कशी के ली हे मला कळलंच नाही! मी मुंबईकरची पुणेकर होणार म्हणून प्रथमत: वडील थोडे नाराजच होते, कारण तेव्हा पुण्यात नृत्याची बीजं फारशी रुजलेली नव्हती. पण माझ्याकडेही पंचविशीतला जिद्दीपणा होता. मी वडिलांना म्हटलं, ‘‘आतापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर होतात. पण आता माझं मला पुढे जाता यायलाच हवं, नाही का?’’

सासरच्यांच्या साथीनं संसार सांभाळत मी ती जिद्द पुढेही राखली. यापुढच्या काळात हिंदुस्थानी संगीत आणि भरतनाटय़म्ची देहबोली यांचा समन्वय करून मी निर्मिलेल्या ‘नृत्यगंगा’ शैलीची पाळंमुळं पंचविशीच्याच काळात रुजली.

या दृष्टीनंही ‘गद्धेपंचविशी’नं माझ्यापुढे वेगवेगळी आव्हानं रचली, संस्कार के ले आणि पुढील मार्गक्रमणासाठी मला उद्युक्त के लं. त्यामुळे ते खरोखरच संस्मरणीय पर्व होतं.

wchaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 1:01 am

Web Title: article on indian classical dancer sucheta bhide chapekar zws 70
Next Stories
1 न्याययंत्रणेलाही परीक्षेला बसवायला हवं ?
2 ‘‘विज्ञानवारीत स्त्री सहभाग वाढावा’’
3 स्मृती आख्यान : नवसमृद्धीमुळे विस्मरण?
Just Now!
X