News Flash

पुरुष हृदय बाई : मी गोंधळलेला पुरुष

स्त्री आणि पुरुष आपापल्या केवळ नर आणि मादी या भूमिकेत होते. पुढे माणसं समूहानं राहू लागली.

राजन खान aksharmanav@yahoo.com

आजचा पुरुष पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्या द्विधेत घुटमळतो आहे. मध्ययुगात स्त्री पुरुषाच्या मागे चालत होती, आधुनिक काळात तीपुरुषाच्या बरोबरीनं चालते आहे, आणि भविष्यात ती पुरुषाच्या पुढे चालणार आहे. या तीन काळांचा आतल्या आत संघर्ष भोगणारा म्हणजे मी आजचा पुरुष आहे. स्त्रीला समान हक्क देण्याचा आधुनिक काळाचा दबाव उघडपणे पुरु षवर्गावर निश्चित आहे. पण म्हणून या आधुनिक काळातल्या पुरु षाच्या मनातला मध्ययुगीन पारंपरिक पुरुष पूर्णपणे मेलाय, संपलाय का? ‘गोंधळलेल्या’ पुरुषाच्या मनोगताचा हा भाग पहिला.

प्रचलित समाजरचनेत किंवा सध्याच्या वातावरणात, स्त्री-पुरुष तुलनेत किंवा बोलाचालीत, अजूनही पुरुषच प्रथम क्रमांकावर आहे, अथवा स्त्रीपेक्षा त्याचीच सत्ता जास्त आहे. तोच प्रमुख आहे. वरवर पाहाता पुरुषी वर्चस्वाचा दबदबा सर्वत्रात, भवतालात आहे. पण थोडं खोल जाता, तपासून पाहाता, लक्षात येतं, की त्याचा प्रथम क्रमांक, प्रमुखपण, त्याची सत्ता यांना कधीचेच हादरे बसून गेले आहेत, आणि पुरुष म्हणून जे जे दबदब्याचं असतं त्याची पडझड झाली आहे. पुरुषपणाच्या वर्चस्वाची त्याची प्रतिमा ढासळून गेली आहे. असं जाणवतं, की पुरुष आपल्या वर्चस्वाची शेवटची लढाई लढतो आहे, असा सध्याचा काळ आहे.

अतिशय लख्ख जाणवणारी गोष्ट अशी आहे, की समाजाचा जुना काळ, जुने संस्कार आणि नवा काळ, नवे संस्कार यांच्या कोंडीत आताचा पुरुष, पुरुषाचं मन अडकलेलं आहे. सध्याच्या काळात तो दोन्ही काळांची घुसमट अनुभवतो आहे. आताच्या पुरुषाला स्वत:ला, स्वत:च्या पुरुषीपणाचं किंवा पुरुष असण्याचं करायचं काय, असा संभ्रम पडलेला आहे आणि स्त्री-पुरुष तुलनेच्या बाबतीत तर तो परिपूर्ण संभ्रमित जगतो आहे.

अगदीच काही वर्षांपूर्वीचा काळ होता, ज्यात पुरुष हा वर्चस्वाच्या प्रथम किंवा प्रमुख ठिकाणी होता आणि स्त्री-पुरुष नात्यात त्याचाच शब्द अंतिम होता. माझ्या आधीच्या आधुनिक काळातल्या पुरुष पिढय़ा वर्चस्वाचा किमान भास तरी बाळगत होत्या. माझी पिढी जन्माला येत होती न् जगण्याचे संस्कार घेत होती, त्यात पुरुषी वर्चस्वाच्या भासाचे अवशेष होतेच काही, पण माझ्याच पिढीत त्या भासालासुद्धा धक्के  बसायला सुरुवात झाली न् त्याची परिणती म्हणून माझी, त्या अवशेषाचा, शिल्लक वारा लागलेली पिढी, संभ्रमाच्या भोवऱ्यात सापडली, की आपण नेमकं कोणत्या काळातल्या पुरुषाप्रमाणे वागायचं आहे? मागच्या की चालू, आताच्या की भविष्यातल्या, अगदी आपल्याच हयातीतल्या नजीकच्या भविष्यात आणखी कोणतं तरी वेगळ्या प्रकारचं, उत्तराधुनिक पुरुषत्व असणार आहे, त्याप्रमाणे वागायचा अंगीकार आपण आताच करायचा आहे का?

एक निश्चित जाणवतं, माझी म्हातारी होऊ घातलेली पिढी आणि माझ्यानंतरची प्रौढत्वात प्रवेश केलेली पिढी, स्त्री-पुरुष तुलनेच्या वेळी, पुरुष म्हणून गोंधळलेली, गडबडलेली आणि काहीशी गलबललेलीही असते. समाजाच्या अभ्यासाचा विद्यार्थी म्हणून मला जास्त जाणवतं, की जुन्या काळातली पुरुष मूल्यं, सध्याच्या काळातली पुरुष मूल्यं आणि येत्या, संभाव्य काळातली पुरुष मूल्यं या तिघांच्या मध्येच कुठं तरी सध्याचा पुरुष लटकलेला आहे, आणि त्याचा स्वत:च्या पुरुष असण्याच्या बाबतीत, पुरुषी अस्तित्वाच्या बाबतीत मेंदूचा त्रिशंकू झालेला आहे.

या त्याच्या त्रिशंकू होण्याच्या बाबतीत कारणीभूत झालेला आहे तो बदलत गेलेला काळ आणि बदलत्या काळातली बदलत गेलेली स्त्री. बदलत गेलेली स्त्री म्हणताना पुरुषाच्या बरोबरीने, समानतेने जगू पाहाणारी, तसं जगण्याचा मागच्याच काळात  ‘हट्ट’ धरलेली आणि आतापर्यंत तो ‘हट्ट’ जवळजवळ पूर्ण करत आलेली स्त्री. या बदलत्या स्त्रीनं तीन काळांच्या पेचात अडकलेल्या पुरुषाच्या मेंदूची त्रेधा उडवून दिलेली आहे. किमान माझ्या पुरुष पिढीचा मेंदू या त्रेधेत आहे आणि या त्रेधेला जात, धर्म, वर्ण, वर्ग, प्रदेश असा काहीही भेद नाही. त्यातला पुरुष सर्वत्र समान आहे. कारण गेल्या काही शतकांत ‘स्त्री- पुरुष समानता’ हा शब्दोच्चार सर्वत्र संसर्गासारखा फैलावलेला आहे.  तो नसेल तर किमान स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीच्या बाजूचे कायदे, हे शब्द तरी सर्वत्र निश्चित पाझरलेले आहेत आणि त्यांनी सर्व थरांतल्या पुरुषांच्या मनावर काही ना काही परिणाम, थोडेफार का होईना, अवश्य केलेले आहेत.

आता आता कालपरवाचा काळ होता, ज्यात स्त्री ही गरीब गाय, दावणीचं जनावर, दुय्यम, दासी, गुलाम, मागास अशा प्रतिमेत जगत होती. (त्या प्रतिमेच्या मागची खरी स्त्री किती तशी होती, हा प्रश्नच आहे, पण अजूनही त्या प्रतिमेचे काही अवशेष समाजात शिल्लक आहेत.) पण गेल्या दोन-तीन शतकांत जगभर स्त्रियांच्या उत्थानाचा डंका वाजत राहिला. स्त्रीसमता, स्त्रीसन्मान, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती यांचा उद्घोष होत राहिला. स्त्रीच्या आणि पुरुषाच्या बरोबरीचं बी लावलं गेलं आणि त्याचं झाड या मागच्या शतका-दीड शतकात वाढून, त्याची पहिलीवहिली फळं येण्याचा काळ नेमका सध्याचाच गाठला गेला आणि त्यानं बरोबर सध्याच्या पुरुषाच्या जगण्यात (खरं तर स्त्रीच्यासुद्धा) संभ्रमावस्था निर्माण करून दिली. मी, माझी पिढी या संभ्रमी पुरुषत्वाची प्रतिनिधी आहे.

आदिम काळात, ज्याला आपण अविकसित, आदिवासीपूर्व काळ म्हणतो, त्यात स्त्री आणि पुरुष या अगदी स्वतंत्र भूमिका होत्या. दोघांची एकमेकांवर अजिबात मालकी नव्हती. स्त्री आणि पुरुष आपापल्या केवळ नर आणि मादी या भूमिकेत होते. पुढे माणसं समूहानं राहू लागली. कुटुंब, नातेसंबंध, समाजरचना यांची सुरुवात झाली. समाजरचनेचे नियम सुरू झाले. त्या नियमांमध्येही हा प्रथम, ती दुय्यम असं काही नव्हतं. पण पुढं टोळ्यांची मारामाऱ्या, लूटमार, स्थावराची मालकी, सत्ता असे माणसांचे चाळे सुरू झाले आणि त्या प्रक्रियेत स्त्रीकडे नाजूक वस्तू, संपत्ती, लुटण्याची गोष्ट, बलात्काराची बाब, दुय्यमत्व, वंशाचा कारखाना असे मुद्दे सोपवले गेले. आणखी पुढं धर्म जन्माला आले आणि त्यांनी स्त्रीचं दुय्यमत्व, संपत्तित्व अधिक ठळक, अधिक अधोरेखित आणि स्पष्ट लिखित केलं. धर्माने अखिल मानवजातीला एकमेकांपासून तोडणारे कोंडवाडे तयार केले. त्या कोंडवाडय़ांमध्ये स्त्रियांसाठी पुन्हा अंतर्गत स्वतंत्र कोंडवाडे सुरू झाले. त्यांच्या चाव्या पुरुषांकडं सोपवल्या गेल्या. त्या गोष्टींचा हजारो वर्षांचा सराव पुरुषांना आणि स्त्रियांनासुद्धा होत राहिला. या सगळ्या काळात ‘स्त्रियांनासुद्धा पुरुषांप्रमाणे माणूस म्हणून जगू द्या’ अशी एक मागणी होत राहिली, पण ती अगदीच अधूनमधून आणि क्षीण राहिली.

स्त्रिया दुय्यम असतात आणि पुरुषांच्या बांधील असतात असं मानणारा धर्म, जाती, टोळ्या, वर्ण, व्यापार यांचा मानवी महासागर एका बाजूला आणि त्यांना माणूस म्हणून जगू द्या, सन्मान द्या, असं बोलणारा अंशमात्र आवाज दुसऱ्या बाजूला, असं त्याचं स्वरूप राहिलं.

जग शेतीकेंद्री राहिलं तोवर स्त्रीसन्मानाच्या गोष्टी अगदीच कमकुवत आणि क्षणिक राहिल्या. (शेतीला आणि स्त्रीला एकाच वेळी ‘उपजाऊ क्षेत्र’ म्हणणं असाच तेव्हा रिवाज राहिला आणि कु णाला त्याचा त्या वेळी आक्षेपही नव्हता) पण माणसांना शेतीशिवाय जगवू शकणारी यांत्रिक,  औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि हळूहळू, गेल्या चार-पाचशे वर्षांत, स्त्रीचं ‘क्षेत्र’पासून ‘माणूस’ इथपर्यंत रूपांतर सुरू झालं. या औद्योगिक क्रांतीनं व्यापार, वसाहतवाद, साम्राज्यवाद, स्थलांतर, ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य यांना नवा, आधुनिक जोर आला. त्यातून राष्ट्र, कायदे यांच्या नव्या रचना सुरू झाल्या. या उलथापालथीत स्त्रीकडे पाहाण्याचासुद्धा

(बहुश: पुरुषांकडूनच) नवा दृष्टिकोन आकाराला येऊ लागला.

आदिम काळानंतर मध्यंतरी हजारो वर्ष गेल्यावर माणसांना स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, तिची तिला किंमत असते, याचा पुन्हा एकदा शोध लागला. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती, पुरुषांची बरोबरी असे नवे विचार मांडले जाऊ लागले. राष्ट्रांचे नवे, आधुनिक कायदे स्त्रियांचा सहानुभूतीनं विचार करू लागले. औद्योगिक काळातल्या कायद्यांनी टोळ्या, धर्म यांचे स्त्रियांच्या बाबतीतले नियम, पारंपरिक संहिता मोडीत काढायला सुरुवात केली. सोबतच वैचारिक बैठकांमध्ये पण विविध माध्यमांतून स्त्रीस्वातंत्र्याचा उद्घोष, प्रचार होत राहिला. समाजावर हे कायदे, हा प्रचार यांचा धाक बसत गेला.

आज तर स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसन्मान यांची महती सर्वदूर आहे. पृथ्वीचा असा एकही कोपरा राहिला नाही न् असा एकही मानवी समूह राहिला नाही, जिथं या गोष्टी पोहोचल्या नाहीत. मुळात गेल्या चार-पाचशे वर्षांत जागतिक सामाजिक सुधारणांचा हा सर्वात प्रथमचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्याचा प्रचार, प्रसार भरमसाट झालेला आहे.

पण इथंच एक तिढा आहे. मी पुरुष म्हणून तीन काळांच्या सापटीत अडकलो आहे. माझ्या अंगात मागच्या दोन काळांचे संस्कार आणि सवयी मौजूद आहेत आणि येता भविष्यकाळही माझ्या संस्कार, सवयींना स्पर्शतो आहे. स्त्रीला दुय्यम मानायचा पारंपरिक शेतीचा संस्कार, मग स्त्रीला सन्मान द्यायचा औद्योगिक संस्कार आणि स्त्री आता पुरुषाच्याही पुढं कुठं तरी निघून जाईल असं म्हटलं जाण्याचा भविष्यकालीन स्पर्श.. एक दृश्य दिसतं मला. मध्ययुगात स्त्री पुरुषाच्या मागं चालत होती, आधुनिक काळात ती पुरुषाच्या बरोबरीनं चालते आहे, आणि भविष्यात ती पुरुषाच्या पुढं चालते आहे. या तीन काळांचा आतल्या आत संघर्ष भोगणारा म्हणजे मी आजचा पुरुष आहे. (आणि हाच संघर्ष स्त्रीसुद्धा आतल्या आत अनुभवते आहे, असं भोवती दिसतं आहे.)

स्त्री-पुरुष नात्यातले पारंपरिक, स्वत:ला प्रथम आणि स्त्रीला दुय्यम मानणारे नियम अंगात मुरलेला पुरुष आणि जगभर उठाव घेतलेले आधुनिक, स्त्री-पुरुषांना बरोबरीचं मानणारे नियम, यांच्या सरमिसळीत आणि गोंधळात आजचा पुरुष अडकलेला आहे, असं मला वाटतं. स्त्रीच्या बाबतीत किंवा स्त्रीच्या तुलनेत आजच्या पुरुषाचं अस्तित्व एकाच वेळी पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन डगरींवर उभं आहे.

(या लेखाचा भाग दुसरा १२ जूनच्या अंकात)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 1:03 am

Web Title: purush hriday bai confused man of today generation part one zws 70
Next Stories
1 जोतिबांचे लेक  : संस्कारक्षम मनाचं घडणं
2 गद्धेपंचविशी : ‘योगभ्रष्ट’ची दहा वर्ष!
3 मूल्यमापन व्हायलाच हवे..
Just Now!
X