डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

पिण्याच्या पाण्याचं महत्त्व आणि ते शुद्ध करण्याच्या प्रक्रियांमधला फरक आपण मागील लेखात पाहिलाच; पण पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्तही जगात ‘पाणीच पाणी चहूकडे..’ असल्यानं आपलं सगळं जीवन पाण्याला केंद्रस्थानी ठेवूनच निर्माण झालं आहे.  सध्या पावसात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यापासून अश्रूंपर्यंत पाण्याची वेगवेगळ्या संदर्भातली ही ओळख..

१९९० च्या जुलैमधील एक आठवण आहे. रात्रभर धो-धो पाऊस कोसळत होता. सकाळी वर्तमानपत्र हातात घेतलं, तर त्यावर नेहमीचा ‘लाडका’ मथळा- ‘मुंबापुरीला पावसानं झोडपलं’ होताच. जागोजागी पाणी साठलेलं असल्यानं बस, रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचे हाल  मी वर्षांनुर्वष पाहिले, वाचले आणि काही वेळा अनुभवलेलेदेखील होते. अनेक जण सकाळी घरून कार्यालयासाठी निघतात खरे; पण तुंबलेल्या पाण्यामुळे तिथे पोहोचण्याऐवजी थेट संध्याकाळी दमूनभागून कसेबसे घरी पोहोचतात असाही अनुभव कित्येकांना येतो. त्यामुळे तो अनुभव घेणं नको वाटत होतं. मी शक्कल लढवली.

लग्नानंतर आम्ही नवी मुंबईत वाशीला राहात होतो. तिथे तेव्हा फोन नव्हते. मोबाइल आणि इंटरनेट तर अजिबातच नव्हतं. तेव्हा मी माटुंग्याला ‘यूडीसीटीत’ (आताचं ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई’) पीएच.डी. करत होते. तिथे भरपूर पाणी साठत असे; परंतु त्या काळात वाशीच्या खाडय़ा भराव टाकून बुजवल्या नव्हत्या, त्यामुळे नवी मुंबईमध्ये रस्त्यावर पावसाचं पाणी साठत नसे आणि ‘सिडको’च्या बसगाडय़ा सुरळीत चालत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी निघावं का? माटुंग्यात पाणी साचलं असेल का? आपण यूडीसीटीत पोहोचू का? आदी प्रश्नांची उत्तरं घरात बसून मिळणं कठीण असे. त्यामुळे त्या दिवशीच्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी मी शक्कल लढवली. पंचांग काढलं आणि अरबी समुद्राला मुंबईला भरती कधी आहे याची वेळ पाहिली. दुपारी १२ ते २ मध्ये. आमचं घर ‘रो-हाऊस’ पद्धतीचं. त्याच्या तळमजल्यावर भारतीय पद्धतीचं स्वच्छतागृह होतं. त्या शौचकुपाच्या भांडय़ात पाण्याची पातळी वाढलेली दिसली. लगेच ठरवलं, की आज दांडी मारायची. दुसऱ्या दिवशी कळलं, की माझा निर्णय अगदी योग्य ठरला होता. माटुंग्याला अतिवृष्टी झाल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला होता आणि सर्व काही ठप्प झालं होतं.

मी हा अंदाज कसा केला? मुंबईचं पावसाचं पाणी गटारामधून समुद्राला जाऊन मिळतं. पाणी नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, तसंच वरच्या पातळीकडून खाली वाहतं. त्यामुळे जर बाहेरील पाण्याची पातळी वाढली, तर ज्या गटारातून घरातलं सांडपाणी बाहेर जातं, त्यातूनच ते उलट घरात येऊ शकतं. (जेव्हा पंप वापरतात तेव्हा बाहेरून ऊर्जा पुरवून पाणी उंचावर चढवावं लागतं.) भरती आणि ओहोटीच्या वेळेला समुद्रातल्या पाण्याची पातळी अनुक्रमे १ मीटर (म्हणजे ३ फूट) वाढते आणि कमी होते.

संपूर्ण पृथ्वी पाण्यानं वेढलेली आणि पाण्यानं जोडलेली आहे. सगळ्या समुद्रातलं एकूण पाणी तेवढंच असल्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये भरती येते, तेव्हा त्याच्या कर्ण रेषेत- म्हणजे पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि पश्चिमेला आफ्रिकेत मोरोक्को इथं ओहोटी असते. चंद्र पृथ्वीच्या ज्या प्रदेशाजवळ असतो तिथे त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती येते आणि त्यापासून काटकोनातील भागातील पाणी मध्ये ओढलं जातं- तिथे ओहोटी असते. पाणी हिंदकळत असल्यामुळे बरोबर दुसऱ्या टोकाला- म्हणजे भूगोलातील विरुद्ध जागीसुद्धा भरती असते. म्हणजे मुंबई आणि मेक्सिकोमध्ये भरती किंवा ओहोटी एकदम येते. दिवसातून २ वेळा, सुमारे १२ तासांच्या अंतरानं भरती आणि ओहोटीचा हा खेळ चालतो; परंतु चंद्र पृथ्वीभोवती फिरायला साडेबारा तास घेत असल्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या बघायला मिळते आणि त्यानुसार हे भरती-ओहोटीचं गणित काही तासांनी बदलतं. तसंच अमावस्येला भरतीचं प्रमाण सर्वात अधिक असतं आणि वर्षभरातदेखील ऋतुमानाप्रमाणे त्यात बदल होतो.

पाऊस किती पडला हे इंच किंवा आता मिलिमीटरमध्ये मोजतात, तर हिमवर्षांव फुटात मोजून सांगतात. जर तापमान शून्याखाली असेल तर १ इंच पाऊस न पडता १ फूट हिमवर्षांव होतो. हवेच्या तुलनेनं पाण्यामध्ये ५ पट अधिक वेगानं आवाज प्रवास करतो. या तत्त्वावर आधारित ‘सोनार’ यंत्राच्या मदतीनं खोल समुद्रातल्या गोष्टींचा अभ्यास, पाणबुडय़ांचा शोध इत्यादी संशोधन चालतं. आंघोळीच्या मोठय़ा टबमध्ये बसल्यावर जर आपले कान पाण्यात बुडलेले असतील आणि पाण्यात चमचा आपटून लहानसा आवाज केला, तर तो कानात ऐकू न येता एकदम डोक्यात शिरतो. याचं कारण आपल्या मेंदूमध्येदेखील पाण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. आर्किमिडीजनं लावलेला शोध आणि तरंगशक्ती (‘बॉयन्सी’) म्हणजे काय हे बहुतेकांनी ऐकलं असेल, पण समजलं असेलच असे नाही. गर्भावस्थेत पाण्यात तरंगणारं बाळ मोठेपणी आपण पाण्यात बुडू म्हणून का घाबरतं? जन्मानंतर पहिला श्वास घेतला, की फुप्फुसांचा फुगा हवेनं भरतो आणि त्याआधीचे ९ महिने पाण्यात बुडलेल्या अवस्थेत असलेल्या मानवी शरीराची घनता पाण्यापेक्षा किंचित कमी होते. म्हणजेच शरीर जरासं हलकं होतं. पोहायला येत नसलं, तरीही संथ पाण्यावर उताणं शरीर शिथिल सोडून, सर्व शरीर पाण्याखाली, फक्त थोडा चेहरा आणि नाक पाण्याबाहेर, असं पडून राहिलो तर तत्त्वत: आपण कधीच बुडून मरणार नाही; पण घाबरून डोकं वर काढलं, तर मात्र शरीराच्या आकारमानापेक्षा कमी पाणी बाजूला सारल्यामुळे शरीर पाण्यात बुडू लागतं. अशा वेळी नाकातोंडात आणि फुप्फुसांत पाणी जाऊन प्राणवायू न मिळाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

पावसाचं पाणी हे शुद्ध आणि पिण्यालायक असतं; परंतु हवा अशुद्ध आणि विषारी वायूयुक्त, प्रदूषित असेल तर आम्ल पर्जन्य होऊन झाडंझुडपं मरून जातात. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजे पावसाचं पाणी साठवून वापरणं. ज्या भागात मुंबईसारखा १०० इंच वा अधिक पाऊस पडत असेल तिथे मोठय़ा इमारती आणि वसतीगृहांमध्ये तर हे अवश्य करावं. गच्चीवरून पावसाचं पाणी गोळा करून मोठय़ा टाकीत साठवायचं आणि बागेसाठी किंवा फ्लशमध्ये वापरायचं. पिण्यासाठी वापरताना मात्र हे पाणी खूप काळ साठवल्यामुळे शुद्ध करावं लागतं. जमिनीमध्ये पावसाचं पाणी झिरपून किंवा भूगर्भातून विविध मार्गानं प्रवास करताना पावसाचं पाणी औषधी, गरम, खारं, जड, विषारी धातूयुक्तही होऊ शकतं. कारखान्यातून सोडलेलं रसायनयुक्त पाणी, साखर कारखान्याची मळी, मेलेली जनावरं, कुजलेले सेंद्रिय पदार्थ अशा अनेक कारणांमुळे पाणी अशुद्ध होतं. वज्रेश्वरी कुंडामधल्या गरम झऱ्यात गंधक असल्यामुळे त्यात स्नान केल्यावर त्वचारोग बरे होतात. शुद्ध गंगाजल तर जणू अमृतच समजलं जातं. प्रत्येक नदीच्या उगमस्थानी पर्वतामधून निघालेल्या स्वच्छ पाण्याला आपली अशी चव आणि गुण असतात. मानवी कृत्यामुळे (जसं की, जंगलं कापणं, पाण्यात निर्माल्य टाकणं आदी) निसर्गावर परिणाम होऊन त्याचा तोल ढळतो आहे.

पाण्याची प्रत ठरवताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यात विरघळलेला प्राणवायू (‘डिझॉल्व्हड ऑक्सिजन’). चांगल्या पाण्यात तापमानानुसार ८ ते २५ पीपीएम (मिलिग्रॅम पर लिटर) ऑक्सिजन असतो. प्रवाह खळखळ वाहताना आपोआप हवेतला प्राणवायू पाण्यात विरघळतो आणि अशा प्रकारे तो मासे, जलचर, पाणवनस्पती यांना मिळावा अशी निसर्गाची व्यवस्था आहे. ‘सीओडी’ (‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’) आणि ‘बीओडी’ (‘बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड’) हे परिमाण सांडपाण्याची वा कारखान्यातून उत्सर्जित झालेल्या द्रावणाची (‘एफ्लुएंट’ची) अशुद्धता दाखवते. प्रक्रिया करून ती अशुद्धता अगदी कमी किंवा शून्य करावी आणि मगच ते पाणी नदीत सोडावं असा कायदा आहे. अशा जैविक ‘ईटीपी’मध्ये (‘एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट’) पूर्वी ‘रिडॉक्स पोटेन्शियल’ हे परिमाण मोजत असत. आता ‘अँटिऑक्सिडंट’ अन्नपदार्थासाठी ‘ओरॅक’ (‘ऑक्सिजन रॅडिकल अब्सॉर्बिग कपॅसिटी’- ‘ओआरएसी’) अशी संकल्पना आहे. हानिकारक पदार्थाचं ‘ऑक्सिडेशन’ झालं, की हानी टळते. ‘रिडय़ूसिंग’ पदार्थ नकोत, कारण ते रक्तातील ऑक्सिजन नष्ट करतात, अशी संकल्पना आहे.  हानिकारक ‘फ्री रॅडिकल्स’ नकोत. म्हणून अँटिऑक्सिडंट पदार्थ खा आणि वाध्र्यक्य पुढे ढकला, आरोग्य राखा, असं म्हटलं जातं.

कूपनलिकेच्या पाण्यासाठी ‘सस्पेंडेड’ आणि ‘टोटल डिझॉल्व्हड सॉलिड्स’ (‘एसएस’ आणि ‘टीडीएस’) मोजतात. तसंच ‘आर्सेनिक’सारखी विषारी द्रव्यं नाहीत ना, हेही पाहावं लागतं. झिंक, मॅग्नेशियम, तांबे असे अनेक धातूंचे परमाणू थोडय़ा प्रमाणात चांगले, पण अधिक असल्यास ते पाणी पिण्यालायक राहात नाही. रात्री तांब्याच्या भांडय़ात (मराठी शब्द ‘तांब्या’ त्यावरूनच आला असावा.) पाणी ठेवून सकाळी पिण्यासाठी वापरलं तर चांगलं हे खरं आहे.  तांबे धातूच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी शुद्ध होतं. अशुद्ध पाणी पिऊन कॉलरा (पटकी), टायफॉइड (विषमज्वर) असे रोग होतात, तर साठलेल्या पाण्यावर डास निर्माण होऊन हिवताप आणि डेंग्यू रोगाचा धोका उद्भवतो. अति पाणी पिऊन आणि पचण्यास जड पाणी पिऊन पोट बिघडतं.

‘हेवी वॉटर’ हा आणखी एक प्रकार आहे. तो मात्र अगदी वेगळा रासायनिक घटक. हे पाणी म्हणजे हायड्रोजनचं एक जड स्वरूप असलेल्या ‘डय़ुटेरियम’चं ऑक्साइड (साधं पाणी हे जसं ‘एचटूओ’ असतं, तसं हे ‘डीटूओ’). त्याचा उपयोग अणुशक्ती बनवताना होतो.

‘डिस्टिल्ड वॉटर’ हाही एक प्रकार आहे. त्यात कोणतेही क्षार अथवा विरघळलेला प्राणवायू नसल्यामुळे त्याला विद्युत प्रवाहक शक्ती जवळजवळ शून्य असते. हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, बॅटरीमध्ये वापरतात. डोंगरात नदीवर धरण बांधून पाणी साठवता येतं आणि पाणी उंचावरून खाली पडताना मिळणाऱ्या ऊर्जेवर ‘वॉटर टर्बाइन’ चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवून वीज निर्माण केली जाते.

कु णाला जर विचारलं, की सर्वात मौल्यवान पाणी कोणतं? तर त्याचं उत्तर बहुतांशी अश्रू हेच असेल. अश्रुपिंड या छोटय़ाशा ग्रंथी डोळ्याच्या आत पापणीच्या वरच्या बाजूला असतात आणि सतत हा स्राव पाझरत असतो. आनंद अथवा दु:ख व्यक्त करण्याबरोबरच, नेत्रपटल ओले ठेवणं, कचरा किंवा धूळ गेलीच तर डोळ्याबाहेर काढणं, असं काम अश्रू करतात. याबरोबर आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ‘लायसोझाईम’सारखी जंतूरोधक प्रथिनं आणि चक्क प्रतिकारशक्तीच्या फौजेतील काही शिपाई- ‘आयजीजी’ (‘इम्यूनोग्लोब्यूलिन ए’) आणि ‘आयजीए’ (‘इम्यूनोग्लोब्यूलिन बी’) नावाच्या ‘अँटिबॉडी’ (प्रतिपिंड) या अश्रूंमध्ये असतात. डोळ्यांवाटे रोगजंतू शरीरात प्रवेश करू नयेत म्हणून ही सगळी सुरक्षा व्यवस्था.

या ‘करोना’काळात लक्षात असू द्या, प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी डोळ्यांचं आरोग्य म्हणजेच अश्रूंचंही, महत्त्वाचं आहे. शेवटी सगळं जीवन पाण्याशी निगडित आहे

हेच खरं!