धूर्त लोभ्याला वश होण्यात लाभ नाही, हानीच आहे. पण नि:स्वार्थ सद्गुरूला वश होण्यात हानी नाही. कारण आपल्याला वेळोवेळी अडचणीत आणणाऱ्या मोह-भ्रमाचा निरास तो करीत असतो. त्यातून आपलं जगणं अधिक समृद्धच होत असतं. संतांच्या सहवासात साधनाचा जो लाभ होतो त्यातील अखेरचे दोन लाभ आता आपण पाहू. यातला पहिला लाभ म्हणजे, ‘‘संतापासून मिळालेल्या मंत्रावर दृढ श्रद्धा ठेवून माणूस त्याचा जप करण्यात रंगून जातो आणि हळुहळु देहबुद्धी विसरतो.’’ आणि दुसरा लाभ म्हणजे, ‘‘सत्संगाच्या प्रभावाने मनातील विकार क्षीण होत जातात आणि माणसाला शरणागत होण्याची तळमळ लागते.’’ आता यातल्या पहिल्या लाभात मंत्राचा उल्लेख आहे. मंत्र म्हणजे जसं नामजप आहे त्याचप्रमाणे मंत्र म्हणजे उपासना किंवा साधनाही आहे. अर्थात सत्पुरुषानं जी साधना सांगितली आहे तिच्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्या साधनेत माणूस जसजसा रमेल तसतशी त्याची देहबुद्धी कमी होत जाईल. ‘मंत्र’ म्हणजे त्रिगुणात अडकलेलं आपलं मन त्या त्रिगुणांच्या प्रभावातून दूर करणारं साधन! अर्थात मनावर सत्, रज आणि तम या तीन गुणांचा पगडा असतो. यातील एका गुणाची प्रधानता असते, पण अन्य दोन गुणांचंही कमी-अधिक प्रमाणात मिश्रण असतंच. या तीन गुणांनी अवघं जग व्यापलं आहे आणि म्हणूनच या जगातला आपला वावर हा आपल्या विपरीत गुणांशी चाललेला समन्वय आणि संघर्ष असाच असतो. सद्गुरू वा खरा सत्पुरुष जो असतो तो असं साधन सांगतो ज्यायोगे आपल्या मनावरचा या तीन गुणांचा प्रभाव ओसरू लागतो. अन्य साधनांनी रजोगुण आणि तमोगुणाच्या अतिरेकातला वाईटपणा उमगेलही, पण सत्गुणाच्या अतिरेकातला वाईटपणा काही केल्या उमगत नाही. त्यासाठी सत्संग हेच मोठं साधन असतं. कारण अमुक केलं, त्याग केला, दुसऱ्यासाठी कष्ट केले आणि देवासाठी काहीतरी केलं त्याचाही सात्त्विक अहंकार मोठा असतो आणि तो सुटता सुटत नाही. केवळ सद्गुरूंच्या सहवासातच या सात्त्विक अहंकारातला धोका उमगू शकतो. त्या सहवासातले संस्कार तशी आंतरिक जागृती आणतात. म्हणूनच पू. बाबा सांगतात की, सत्संगाच्या प्रभावानं मनातले विकार क्षीण होतात. विकार नष्ट होणं ही मोठी कठीण गोष्ट आहे! आपल्या मनातला क्रोध नष्ट झाला, असं वाटू द्या की लगेच क्रोधाचे अनेक प्रसंग घडतील. तेव्हा विकार नष्ट होणं ही पुढची गोष्ट झाली. ते क्षीण झाले तरी खूप! विकार क्षीण झाले की प्रतिक्रिया टोकाच्या उमटण्याचे प्रकार कमी होतात. मग अशा प्रसंगात सत्पुरुषाचं वर्तन कसं होतं, त्यांची आंतरिक समता- शांतचित्त स्थिती कशी होती, याचंही सहज स्मरण होतं आणि मग आपल्या वागण्यातील अतिरेकी गोष्टींचं दु:खं वाटू लागतं. त्यातून हळूहळू आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. तर पू. बाबा बेलसरे यांनी प्रपंचात राहून साधन करणाऱ्या साधकांसाठी सांगितलेली दहा बोधमण्यांच्या माळेतल्या दुसऱ्या मण्याचा मागोवा इथं थांबवूया. हा मणी म्हणजे, ‘‘आठवडय़ातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी!’’ आता या बोधमण्यांच्या माळेतला तिसरा मणी पाहू. हा मणी म्हणजे, ‘‘स्वत:च्या आणि लोकांच्या सांसारिक चर्चा, ऑफिसमधील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा आणि फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे.’’

चैतन्य प्रेम