लॉकडाउन लागू केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व कामगारांना आहेत तिथेच थांबवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अनेक कामगारांनी घराचा रस्ता पकडला होता. अगदी ४०० ते ५०० किमी अंतर चालून काहींनी घर जवळ केले, तर काहींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्या घटना लॉकडाउनच्या कालावधीत घडल्या. अशीच एक घटना शुक्रवारी घडली आहे. भिंवडीवरून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी सायकलवरून जाणाऱ्या कामगाराचा रस्त्यातच मृत्यू झाला.

लॉकडाउनच्या काळात अनेक कामगारांनी लपूनछपून घर गाठण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही जण घरी पोहोचले, तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, घरी जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होताना दिसत नाही. भिंवडीवरून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी एक कामगार सायकलवरून निघाला होता. बारवणी जिल्ह्यातील बिजासन गावाजवळ तो सायकलवरून कोसळला. प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हा कामगार बेशुद्धावस्थेत सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती उपजिल्हाधिकारी जी. धनगर यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- कुटुंबाचा मृतदेहासोबत मुंबई ते कर्नाटकपर्यंत प्रवास, तपासणी केली असता तिघांना करोनाची लागण

७ कामगार निघाले करोना पॉझिटिव्ह

करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्रांनं देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले. त्यामुळे कामगार घरी परतू लागले आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवलं होतं. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.