गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. रक्तरंजित संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली असली तरी, त्यावरुन विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी टि्वट करुन सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय?

राष्ट्रहीत सर्वोच्च असून त्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे.

– तणाव निर्माण होण्याआधीची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्यावर का भर देण्यात आला नाही?

– आपल्या हद्दीत २० निशस्त्र जवानांची हत्या करणाऱ्या चीनला ते योग्य आहेत हे ठरवण्याची संधी का दिली?

– गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय?

हे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत. गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील संघर्ष असलेल्या क्षेत्रात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

आणखी वाचा- “जर चिनी सैन्याने घुसखोरी केलीच नाही, तर आता माघारी का जात आहेत?”; ओवेसींचा सवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेण्याचे मान्य करण्यात आले. डोभाल व वँग हे सीमाप्रश्नी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत त्यांच्यात ही चर्चा झाली.

आणखी वाचा- आम्ही तुमच्या पाठिशी: चीनविरोधी संघर्षात अमेरिकी लष्कराची भारताला साथ

भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले आठ आठवडे पेच सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांनी सैन्य तातडीने माघारी घेण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली.