जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा सरकारचं तडकाफडकी समर्थन काढून तेथील सरकार पाडणारी भारतीय जनता पार्टी आता बिहारमध्ये नितीश कुमारांचं सरकार पाडू शकतं. भाजपाकडून तशी योजना आखली जात आहे, असा आरोप काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि बिहार काॅंग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी केला आहे.

बिहारमध्येही भाजपा नितीश कुमार यांच्या सरकारचं समर्थन परत घेऊ शकतं, जम्मू काश्मीरमध्ये जे काही झालं त्यामुळे ही गोष्ट अजिबात नाकारता येणार नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे. पण नितीश कुमार यांची ही मागणी केंद्रातील भाजपा सरकारने अद्यापही मान्य केलेली नाही, त्यामुळे जम्मू-काश्मिरची पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ शकते असं गोहिल म्हणाले. गेल्या आठवड्यात रविवारी नवी दिल्लीमध्ये निती आयोगाची बैठक झाली होती, या बैठकीत नितीश कुमारांची मागणी अमान्य करण्यात आली होती.

वर्ष 2015 मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांच्या जनता जल युनायटेडला बहुमत मिळालं होतं. नितीश यांच्या पक्षाला कमी जागा मिळूनही लालूंनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि मुलगा तेजस्वी यादव याला उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. पण 2017 मध्ये नितीश कुमारांनी अचानक लालूंची साथ सोडली आणि भाजपासोबत जाऊन येथे एनडीएचं सरकार स्थापन केलं. दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करुन जेमतेम वर्ष होत नाही तोच दोघांमधील कुरबूर समोर यायला सुरूवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरुनही दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचं वृत्त आहे. राज्यातील 40 पैकी 25 जागा नितीश कुमारांच्या पक्षाला लढवायच्या आहेत आणि उर्वरित 15 जागा भाजपा आणि एनडीएच्या घटकपक्षांनी लढवाव्यात अशी जदयूची अपेक्षा आहे.