भापोळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या ‘मारक शक्ती’च्या वादग्रस्त विधानाला भाजपाने अप्रत्यक्ष पाठिंबाच दिल्याचे चित्र आहे. कारण, साध्वींनी केलेल्या या विधानावर देशभरातून मोठी टीका झाल्यानंतर भाजपाने त्यांना नोटीस पाठवल्याची चर्चा होती. मात्र, अशा प्रकारे कसलीही नोटीस साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवण्यात आलेली नसल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री भाजपा नेते बाबुलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधकांनी ‘मारक शक्ती’चा प्रयोग केल्यानेच भाजपाच्या नेत्यांचे मृत्यू होत असल्याचा अजब दावा त्यांनी केला होता, त्यांच्या या विधानावर देशभरातून टीका झाली होती. मात्र, या प्रकरणानंतर साध्वींना भाजपाकडून नोटीस पाठवण्यात आली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, माध्यमांमधील हे वृत्त खोटे असल्याचे मध्य प्रदेश भाजपाचे माध्यम प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या साध्वींना भाजपा वैतागला असून त्यांना पक्षामध्ये एकटे पाडण्यात आले आहे. तसेच त्यांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासही भाजपाकडून मनाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष राकेश सिंह यांनी साध्वी प्रज्ञा यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते.

साध्वी प्रज्ञा यांनी श्रद्धांजली सभेत म्हटले होते की, “एकदा एका महाराजांनी मला सांगितले होते की, आम्ही सध्या वाईट काळातून जात आहोत यामागे विरोधकांचा हात आहे. विरोधक भाजपाच्याविरोधात मारक शक्तीचा प्रयोग करीत आहेत. महाराजांनी सांगितलेली ही बाब मी विसरुन गेले होते. मात्र, आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकामागून एक निधन होत असल्याचे पाहता मला महाराजांच्या त्या वक्तव्यावर विचार करण्यास भाग पाडले आहे की, खरचं ते खरे होते?”