छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे ‘डीआरजी’ चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला तर एक जवान शहीद झाला.

दंतेवाडातील कतेकल्याण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जंगलात ही चकमक झाली. नक्षलविरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे.

या अगोदर छत्तीसगडमधील कवर्धा येथील सुरतिया गावाजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जुगनी या नक्षलवादी महिलेचा खात्मा झाला होता. घटनास्थळावरून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. याशिवाय पोलिसांना चकमक झालेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मोठ्याप्रमाणावर साहित्य देखील जप्त करण्यात यश आले होते.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर दंतेवाडा जिल्ह्यात दोन आणि बीजापुरमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत, तर काहीजण आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले आहे.