काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये चर्चा रंगली ती काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कवासी लकमा यांची. आयुष्यात एकदाही शाळेत न गेलेले ६५ वर्षीय लकमा थेट मंत्री झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सामान्यपणे कोणत्याही शपथविधीदरम्यान मंत्र्यांना शपथ देणारे राज्यपाल सुरुवातीला एकच शब्द उच्चारतात आणि नंतर शपथ घेणाऱ्या मंत्र्याने पूर्ण शपथ घेणे अपेक्षित असते. मात्र मंगळवारी लकमांना शपथ देणाऱ्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना एक एक वाक्य वाचावे लागेल. कवासी लकमा यांना लिहिता वाचाता येत नसल्याने राज्यपालांनी वाक्य पूर्ण केल्यानंतर लकमा वाक्य म्हणत होते. राज्यपालांनी म्हटलेलं एक एक वाक्य त्यांच्या मागून उच्चारत लकमांनी आपली शपथ पूर्ण केली.

कोण आहेत लकमा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातल्या नागारास या गावामध्ये १९५३ साली लाकमा यांचा जन्म झाला. सुकमामधील हा भाग अतिशय दुर्गम आणि मागासलेला आहे. त्यामुळेच गरीबीमुळे दैनंदिन जगण्याच्या धडपडीमुळे येथील अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. शिक्षणाचा अभाव असलेल्या भागातच बालपण गेल्याने लकमा कधी शाळेत गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांना लिहीता वाचता येत नाही. मात्र शिक्षणाचा अभाव असतानाही आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर लकमांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले. ते मागील अनेक दशकांपासून समाजकार्य करत आहेत. बस्तर जिल्ह्यातील कोंटा मतदारसंघातून ते मागील २० वर्षांपासून आमदार म्हणून निवडूण येत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी विधानसभेत काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या नक्षली हल्ल्यांमधून ते थोडक्यात बचावले आहेत.

आपल्याला लिहिता वाचता येत नाही याबद्दल बोलताना लकमा म्हणतात, ‘मला लिहिता वाचता येत नसलं तरी देवाने अशी बुद्धी दिली की निर्णय घेताना कुठलीही अडचण येत नाही. म्हणूनच गरिबांसाठी काम करताना मला कोणतीही अडचण येणार नाही. तसंच आपल्या लोकशाहीमध्ये मंत्री होण्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही.’ आदिवासी आणि दूर्गम भागातील कामाचा अनुभव असल्याने लकमा जगभरात होणाऱ्या अनेक परिषदांमध्ये सहभागी आले आहेत.