फायझर कंपनीने कोविड १९ लशीचा वापर पुढील महिन्यापासून करण्यासाठी परवानगी मागितली आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने तातडीच्या वापरासाठी या लशीचा वापर करण्याची परवानगी द्यावी, असे  कंपनीने म्हटले आहे.

आगामी काळ थंडीचा असून करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे लशीच्या वापरासाठी आपत्कालीन परवाना जारी करावा असे कंपनीचे म्हणणे असून मर्यादित स्वरूपात ही लस बाजारात आणण्याचा बायोएनटेक व फायझर या कंपन्यांचा विचार आहे.

फायझरची लस ९५ टक्के  प्रभावी असल्याचे अलीकडच्या चाचण्यांत स्पष्ट  झाले होते. कंपन्यांनी म्हटले आहे, की आपत्कालीन वापरासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता लशीने केली आहे.

अमेरिकेनंतर या दोन कंपन्यांनी युरोप व ब्रिटनमध्ये या लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागणारे अर्ज केले आहेत. अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले, की लस मार्गावर आहे. पण अजूनही लोकांनी मुखपट्टय़ा, सामाजिक अंतर हे नियम पाळण्याची गरज आहे.

शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने लस तयार आहे किंवा नाही, त्याचा पुरवठा कसा करता येईल याचा तज्ज्ञांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला. अमेरिकेत लोक लशीची आतुरतेने वाट बघत असून लस उपलब्ध झाल्यानंतर तिचा सुरुवातीला मर्यादित वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत ही लस अग्रक्रमाने कुणाला द्यायची यावर आणखी एका तज्ज्ञ गटाशी चर्चा सुरू आहे.

डिसेंबरमध्ये लशीचे २ कोटी ५० लाख डोस मिळण्याची शक्यता असून जानेवारीत ३ कोटी, फेब्रुवारीत ३.५ कोटी डोस मिळतील, असे राष्ट्रीय वैद्यक अकादमीने म्हटले आहे. अमेरिकेतील सरकारने फायझर—बायोएनटेक व इतर कंपन्यांशी लशीच्या पुरवठय़ाबाबत करार केले आहेत. अमेरिकेत लस मोफत दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. मॉडर्ना कंपनीची लसही तेवढीच चांगली असून त्यांनाही आपत्कालीन परवान्याची प्रतीक्षा आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या वैज्ञानिक सल्लागारांची बैठक १० डिसेंबरला होत असून त्यात कुठल्या लशी किती प्रभावी आहेत याचा ताळेबंद मांडला जाणार आहे.

ट्रम्प यांच्या मुलास करोना संसर्ग

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याला करोनाचा संसर्ग झाला आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच त्याला लागण झाली असून त्याला आता त्यांच्या कक्षातच विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्यात लक्षणे कुठलीही नाहीत पण चाचणी सकारात्मक आली आहे. सर्व वैद्यकीय शिफारशींचे तो पालन करीत आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर ४२ वर्षांंचा आहे. निवडणूक काळात डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांचा १४ वर्षांंचा मुलगा बॅरॉन याची चाचणीही सकारात्मक आली होती. अध्यक्ष ट्रम्प यांना करोनावरील उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याने ३ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत प्रचारात भाग घेतला होता. त्याची मैत्रीण किंबर्ले गिलफॉयल हिलाही करोनाचा संसर्ग जुलैत झाला होता. व्हाइट हाऊसचे प्रमुख मार्क मिडोज यांनाही या महिन्याच्या सुरुवातीला करोनाचा संसर्ग झाला होता. अमेरिकेत ११.८ दशलक्ष करोना रुग्ण असून २ लाख ५३ हजार बळी गेले आहेत. शुक्रवारी १ लाख ९२ हजार नवे रुग्ण सापडले असून रोज संख्या वाढत आहे.