सध्या देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते.
केरळमध्ये आठ वर्षाच्या मुलाने आपल्या पाच मैत्रिणींना अटक करण्याची मागणी केल्याची अजब घटना समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पाच मुलींपैकी एक त्याची मोठी बहीण आहे. सगळ्या मुली आपल्याला वारंवार चिडवत असून सोबत खेळत नाहीत अशी तक्रार मुलाने पोलिसांकडे केली आहे. आठ वर्षाचा मुलगा अटकेची मागणी करत असल्याने काही वेळासाठी पोलीसही चक्रावले. (सविस्तर वृत्त)
करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. (सविस्तर वृत्त)
वसई विरार शहरात बुधवारी २६ नवीन रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २६५ एवढी झाली आहे. मागील २४ तासात शहरात २६ नव्या रुग्णाची भर पडली. बुधवारी ४ रुग्ण करोना मुक्त झाले असून एकूण करोना मुक्त संख्या १३१ एवढी झाली आहे. यातील १४ रुग्ण हे नालासोपारा शहरातील, ७ विरार शहरातील आणि ५ रुग्ण हे वसईतील आहेत. यात २ परिचारिका, ३ वॉर्डबॉय, १ रुग्णालय कर्मचारी आणि १४ रुग्ण हे करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील आहेत
राज्यभरात १४९५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. मागील २४ तासात ५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात ९७५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज राज्यात ४२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या १५ हजार ७४७ इतकी झाली आहे. तर मुंबईत करोनाची लागण होऊन ५९६ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून बुधवारी ५४ नवे रुग्ण वाढले आहेत. यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या ९१० झाली आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाबाधितांचे नवे रुग्ण कमी आढळत असल्याने रुग्णांची संख्या सातत्याने कमी होण्यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५ करोना बाधित आढळले असून एकूण संख्या १७९ वर पोहचली आहे. तर ५ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची आकडेवारी ११६ झाली आहे. दरम्यान आज आढळलेले करोना बाधित हे चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघी, रहाटणी या परिसरातील रहिवाशी असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड च्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर डिस्चार्ज झालेले व्यक्ती हे पिंपळे गुरव, मोशी आणि इतर ठिकाणचे आहेत. तसेच राहाटणी परिसरातील काही भाग मध्यरात्री पासून सील करण्यात येणार आहे.
पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे शहरात दिवसभरात 87 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 2 हजार 824 इतकी संख्या झाली आहे. तसेच आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 163 मृतांची संख्या झाली. 14 दिवसानंतर 168 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 163 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नवी मुंबईत आज ५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर शहरातील करोनाबाधित संख्या ९१० वर पोहचली आहे.
मालेगावात आत्तापर्यंत २५० करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मालेगावातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर राज्यातील रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगाव येथे दौरा केला आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी भारत अभियानांतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पॅकेजचा जो पहिला टप्पा घोषित केला, त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे पॅकेज अभूतपूर्व आहे आणि केवळ रोजगार वाचविणारे नाही, तर नवीन रोजगारनिर्मिती करणारे पॅकेज ठरेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (सविस्तर वृत्त)
आपण करोनासोबत जगण्याचं 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिकलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने पाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. बाहेर वावरताना मास्क लावलाच पाहिजे. एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. तसंच सॅनेटायझरचा वापर हा ऑफिसमध्ये किंवा घरात प्रवेश करण्याआधी आणि बाहेर पडताना केला पाहिजे असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली असून ती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. करोनामुळे महाराष्ट्राची दिवसागणिक खालावणारी परिस्थिती पाहता हे उशिरा सुचणारे शहाणपण जनतेला परवडणारे नाही असं त्यांनी म्हटलं आहे. (सविस्तर वृत्त)
परप्रांतीय मजूर गेल्याने स्थानिक तरुणांकडे संधी असून त्यांनी ती सोडू नये असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांनीही स्थानिक तरुणांना नोकरी दिली पाहिजे असा सल्ला दिला आहे. लॉकडानमुळे अनेक स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर अनेक ठिकाणी कामगारांची गरज भासणार आहे. स्थानिक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी ती सोडू नये असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबादमध्य ते बोलत होते. (सविस्तर वृत्त)
सोलापुरात बुधवारी एकाच दिवशी ३१ नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.यामुळे करोनाबाधित एकूण रूग्णसंख्या ३०८ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही २१ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, एकीकडे करोनाबाधित रूग्ण वाढत असलेतरी दुसरीकडे रूग्णालयात यशस्वी उपचार करून घरी परतणा-या रूग्णांची संख्याही ८४ इतकी झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.
लॉकडाउनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जाहीर झालेल्या २० लाख कोटी रुपयांच्या मेगा पॅकेजची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी दिली. वाचा सविस्तर बातमी.
रेरा अंतर्गत सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा सल्ला राज्य सरकारांना आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येईल असे केंद्र सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले. वाचा सविस्तर बातमी.
करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने केंद्र तसंच राज्य सरकारं वारंवार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं जाऊ नये अशी सूचना करत आहे. परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं हे. जैन साधू प्रमाणसागर यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. (सविस्तर वृत्त)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायी चालणाऱ्या मजुरांची क्रूर थट्टा केली आहे अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. सध्याच्या घडीला लाखो गरीब मजूर रस्त्यावर आहेत. हे मजूर भुकेलेले आहेत. अनेकजण त्यांच्या घरी जाण्यासाठी शेकडो किमी. चालत आहेत. अशा लोकांसाठी अर्थमंत्र्यांनी काहीही तरतूद केलेली नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
शहरात आज दुसरा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. बिनबा गेट परिसरात एक बाधित मुलगी आढळली असून कृष्ण नगर पाठोपाठ हा परिसरही सील करण्यात आलेला आहे. तसेच रेड झोनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तर शहरात उद्यापासून १७ मे पर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यामुळे लघु-मध्यम उद्योग, शेतकरी तसंच मजुरांना दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण मोदींनी जाहीर केलेल्या या मोठ्या घोषणेत आनंदी होण्याइतकं काही नाही अशी प्रतिक्रिया छत्तीसगड येथून लखनऊला निघालेल्या स्थलांतरित मजुराने दिली आहे. लक्ष्मी साहू या रोजंदारीवर काम करत असून लॉकडाउनमुळे त्यांचाही संघर्ष सुरु आहे. सायकवरुन त्यांनी आपल्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला असून ५०० किमीचा टप्पा गाठायचा आहे. (सविस्तर वृत्त)
महापालिका आयुक्तांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आढावा बैठक सुरू असताना त्यांचा तपासणी अहवाल आला. हा अहवाल समजताच आयुक्त बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसमवेत, कृषीमंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. मालेगाव पालिकेतील आणखी एक अधिकारी बाधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.
MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज देशासाठी जाहीर केलं. त्याचे तपशील निर्मला सीतारामन पत्रकार परिषदेत सांगत आहेत. हे सांगत असतानाच त्यांनी MSME क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे.
पीएफचा २५०० कोटी रुपयांचा भार सरकार उचलणार. जून ते ऑगस्ट पर्यंतची पीएफची १२ टक्के रक्कम सरकार भरणार.
उद्योगाच्या फायद्यासाठी उद्योगाच्या व्याख्येत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. १० कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी लघु उद्योग मानला जाईल. २०० कोटीपर्यंतचे सरकारी टेंडर स्थानिक पातळीवरच भरता येणार.
स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज देण्यात येईल. त्यासाठी कुठल्याही गॅरटीची आवश्यकता नाही. ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होईल. एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली. (सविस्तर वृत्त)
घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. मात्र ही सेवा घेण्यासाठी त्यांना अजून एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून ही सेवा सुरु कऱण्यात येणार होती. पण आता हा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता १५ तारखेची वाट पहावी लागणार आहे. (सविस्तर वृत्त)
देशातील गरीब उपाशी राहू नये, त्याला त्रास होऊ नये यासाठी १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मोठया निर्णयासाठी मोदी ओळखले जातात. कच्छचा भूकंप असो किंवा पीपीई किट्स हाच विचार भारताला आत्मनिर्भर बनवतो असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
लोकल ब्रॅण्डसना ग्लोबल बनवण्याचं लक्ष्य आहे. तीन महिन्यात गरीबांना, शेतकऱ्यांना मदत केली. अनेक लोकांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होत आहे.
पंतप्रधानांनी देशांसमोर आत्मनिर्भर भारताचं व्हिजन मांडलं. प्रदीर्घ चर्चेनंतर पॅकेजचा निर्णय घेण्यात आला. पॅकेजच्या माध्यमातून भारताचा आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न. वेगवेगळया पातळयांवर, विविध मंत्रालयांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशात आज पीपीई, व्हेंटिलेटरची निर्मिती होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा दिला आहे. मात्र या नाऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टीका केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान हे दुसरं तिसरं काहीही नसून मेक इन इंडियाचं नवं नाव आहे अशी टीका थरुर यांनी केली आहे.
मुंबई: करोनाच्या आजारात मुंबईत हजारो रुग्णांची परवड होत असताना बहुतेक खासगी पंचतारांकित रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या एपिडेमिक अॅक्ट १८९७ चे काटेकोर पालन झाले पाहिजे तसेच रुग्णालयांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी पंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष रुग्णावरील उपचारासाठी येणारा खर्च तपासण्याचे आदेश आपण दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
"मुंबईत करोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा नाहीत. रुग्णसंख्या वाढत असून महापालिका खाटा वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खूप जास्त खाटांची गरज असून मोठ्या खासगी व ट्रस्ट रुग्णालयांनी आता तरी सामाजिक दायित्व मानून जास्तीतजास्त खाटा सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत", असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लॉकडाउनमुळे महाराष्ट्राच्या वाहतूक क्षेत्रासमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो लोकांचे रोजगार संकटात आहेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, खासगी बसेस आणि जड वाहनांच्या लहान-मोठ्या कंपन्या, ही वाहनं चालवणारे ड्रायव्हर्स, क्लिनर्स असे लाखो लोक या वाहतूक व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर बातमी.
देशात येत्या १७ मे रोजी तिसरा लॉकडाउन संपून चौथ्या लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जनतेला निर्बंधांमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी.
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 525 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 122 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 74 हजार 281 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 47 हजार 480 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 24 हजार 386 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 415 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
सेवाग्राम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने अतिरिक्त सोय म्हणून सावंगीच्या विनोबा भावे रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त वाचा
मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकट्या मुंबईत सुमारे १५ हजार करोनाबाधितांची कालपर्यंत नोंद झाली आहे. ही परिस्थिती गंभीर असून करोना रुग्णांच्या उपचारासाठी आता खासगी व महापालिका रुग्णालयांतील ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या पाहिजे अशी भूमिका मुंबईतील करोना रुग्णांसाठी नेमलेल्या 'विशेष कृती दला'ने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे मांडली आहे.
मुंबईत सुमारे साठ लाख लोक झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहात असून करोना चाचणी पासून ते उपचार करण्याबाबतचे नवे निकष, स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचा निर्णय तसेच घरपोच मद्य देण्यापासून ते लॉकडाउनची प्रभावी अमलबजावणी करण्यात पुरेसे यश न येणे याचा विचार करता आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
औरंगाबादेत आज आणखी 24 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 677 वर पोहचली आहे. तर आज दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत औरंगाबादेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 17 वर पोहचली आहे.
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये काम करणारा एक 20 वर्षीय मजूर बिहारच्या सारण येथे आपल्या घरी परतण्यासाठी निघालाय. तब्बल 1,000 किलोमीटरचा प्रवास तो करतोय. आग्रापर्यंतचा 200 किलोमीटरचा प्रवास त्याने पायी केला. तिथून पुढे 350 किलोमीटर, लखनऊपर्यंत त्याला एका ट्रक ड्रायव्हरने सोडलं. पण, त्यासाठी त्या ट्रक चालकाने ओम प्रकाशकडे भाडं आकारलं, आणि आता ट्रक चालकाचं भाडं देऊन त्याच्याकडे केवळ 10 रुपये शिल्लक राहिलेत. (वाचा सविस्तर)