देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून आता ओडिशामध्ये एका पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील हजारो नागरिकांना ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचे आदेश दिले आहेत.

हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. करोनाची लागण झालेला पोस्टमन १० मार्च रोजी दिल्लीहून परतला होता. संबंधित पोस्टमन बीजीबी नगर सब-पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असल्याची माहिती भुवनेश्वरचे महानगरपालिका आयुक्त पी.सी. चौधरी यांनी दिली. “संबंधित पोस्टमनने लॉकडाउनच्या दहा दिवसांमध्ये गौतम नगर, सत्र न्यायालय यांसारख्या दररोज वकील किंवा पोलिसांची गर्दी असलेल्या भागांमध्ये पत्रांचं वाटप केलं आहे. त्यामुळे त्या पोस्टमनशी संपर्कात आलेल्या संबंधित परिसरातील नागरिकांनी स्वतःला क्वारंटाइन करावे, त्यांनी घराबाहेर पडू नये. तसेच शक्य असल्यास १०४ क्रमांकावर संपर्क साधून स्वतःची नोंदणीही करावी”, असं आवाहन पी.सी. चौधरी यांनी केलं आहे.

दुसरीकडे, पुरी जिल्हा प्रशासनाने शनिवारी भुवनेश्वरपासून जवळच असलेले पोस्टमनचे गाव सील केले आहे.