जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात ढगफुटी होऊन त्यात चार ठार आणि किमान ३० ते ४०  लोक बेपत्ता झाले आहेत. जम्मू प्रदेशातील किश्तवार जिल्ह्यातील होन्जार गावात बुधवारी पहाटे ढगफुटी झाल्यानंतर या दुर्घटनेत चार मृतदेह सापडले आणि कित्येक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. सद्यस्थितीत बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवार जिल्ह्यातील दाछिन परिसरातील होन्जार गावात ढगफुटी झाली. त्यानंतर ३० ते ४० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आमच्याकडे अद्याप अचूक माहिती नाही तसेत येथे मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी नाही.

किश्तवाड जिल्हा पोलिस प्रमुख एसएसपी शफकत भट यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा गावात ३० ते ४० लोक होते. किश्तवाड़ शहर जम्मूपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे आणि दाछिन हे किश्तवार जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ परिसरात आहे.

दरम्यान, किश्तवाडमधील ढगफुटीमुळे झालेल्या घटनेमुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जम्मूमध्ये मुसळधार पाऊस सुरुच

गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जुलैच्या अखेरीस जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने किश्तवार अधिकाऱ्यांनी पाण्याच्या साठ्यांजवळ आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात जिल्हा प्रशासनाने सांगितले की, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून त्यामुळे नद्या व नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकेल आणि त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होईल.