प्रदूषणाला आळा बसावा आणि रस्ते सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर उपाय योजण्यासाठी दहा वर्षांहून जुनी वाहने मोडीत काढणाऱ्या वाहनधारकांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याबाबत सरकार विचार करत आहे, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात डिझेलवर चालणाऱ्या दहा वर्षांहून जुन्या वाहनांवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने बंदी घातली आहे. या पाश्र्वभूमीवर हा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर काम सुरू असून, ते लवकरच अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल, असे गडकरी म्हणाले.
या प्रस्तावानुसार, मोटारीसारखी लहान वाहने नष्ट करण्यासाठी वाहनधारकांना ३० हजार रुपयांपर्यंत, तर ट्रकसारख्या मोठय़ा वाहनांच्या बाबतीत करसवलत लक्षात घेता ही रक्कम दीड लाख रुपयांपर्यंत असू शकेल.
योजना काय?
* जुने वाहन विकताच मालकाला प्रमाणपत्र मिळेल.
* नवे वाहन घेताना ते दाखवले की खरेदीत सवलत मिळेल.
* मोटारीसारख्या लहान वाहनांसाठी ३० हजार रुपयांपर्यंत सूट असेल.
* मोठय़ा वाहनांसाठी ही सवलत ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल.