दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी करोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी केलेलं ट्वीट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झालं आहे. आपल्या ट्वीटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक” असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर लागलीच सिंगापूर आरोग्य विभागाकडून आणि सिंगापूर दूतावासाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीच यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले (सिंगापूरसोबतचे) द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मत देशाचं मत नाही”, अशा खरमरीत शब्दांत जयशंकर यांनी केजरीवाल यांचं वक्तव्य खोडून काढलं आहे.

जयशंकर यांचं खरमरीत ट्वीट!

सिंगापूरनं केजरीवाल यांच्या ट्वीटवर आक्षेप घेताच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “करोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सिंगापूर आणि भारत यांच्यात अतिशय चांगले संबंध आहेत. सिंगापूरकडून केल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आणि इतर मदतीसाठी आम्ही आभारी आहोत. भारताच्या मदतीसाठी लष्करी विमान पाठवण्याच्या त्यांच्या कृतीतून हेच संबंध अधोरेखित होतात. मात्र, ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले (सिंगापूरसोबतचे) द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मत देशाचं मत नाही”, असं जयशंकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

नेमकं झालं तरी काय?

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी १८ मे रोजी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात हा विषाणू तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, की सिंगापूरसोबतची हवाई प्रवासी सेवा तत्काळ रद्द करण्यात यावी. लहान मुलांसाठी लसींच्या पर्यायांवर प्राधान्यक्रमाने काम करण्यात यावं”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे करोनाच्या सिंगापूर स्ट्रेनची नव्यानच चर्चा सुरू झाली होती. पण हे ट्वीट चर्चेत येऊ लागताच सिंगापूरकडून खुलासा करण्यात आला.

 

सिंगापूर दूतावासाकडून नाराजी

केजरीवाल यांच्या ट्वीटवर सिंगापूर दूतावासाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली. “सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या मुलांसहित अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोविड विषाणूंचा संसर्ग झाला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झालं आहे. या विषाणूची निर्मिती भारतातच झालेली आहे”, असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.

 

त्यापाठोपाठ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या नाराजीसंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. “सिंगापूर सरकारने आपल्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंगापूर स्ट्रेनबद्दलच्या विधानावर कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारतीय उच्चायुक्तांनी त्यांना हे स्पष्ट केलं आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोविड स्ट्रेन किंवा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बोलण्याची क्षमता नाही”, असं ट्वीट त्यांनी केलं.

 

हा सगळा प्रकार झाल्यानंतर लागलीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात केंद्र सरकारची अधिकृत भूमिका जाहीर केली. याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेचं लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नाचक्की झाली होती. आता पुन्हा या ‘सिंगापूर स्ट्रेन’ प्रकरणामुळे त्यांच्यावर टीका सहन करण्याची वेळ ओढवली आहे.