इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी संस्थेच्या शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या आठवडयात विक्रम लँडरचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये इस्रोला अपयश आलं. या अपयशाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर सिवन यांनी शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सिवन यांनी इस्रोमधील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सना मार्गदर्शन केले. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडर मार्गावरुन भरकटला आणि हार्ड लँडिंग झाले. नेमकं त्यावेळी चंद्रावर काय घडलं? कशामुळे अपयश आलं? त्याचे इस्रोकडून अंतर्गत विश्लेषण सुरु आहे.

आमच्या चेअरमननी आम्हाला मार्गदर्शन केलं. चांद्रयान-२ मोहिमेत ऑर्बिटर सायन्समध्ये आपण १०० टक्के यशस्वी ठरलो तर लँडिंग टेक्नोलॉजीमध्ये ९५ टक्के यश मिळाल्याचे त्यांनी सांगितलं. चिंता करु नका. आगामी ठरलेल्या मोहिमांकडे लक्ष द्या असा सल्ला त्यांनी वैज्ञानिकांना दिला. भविष्यात इस्रोची सूर्य, मानवी अवकाश मोहिम तसेच नासासोबत संयुक्त मोहिम आहे. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने विक्रम लँडर शोधून काढला असला तरी अजून संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. इस्रोकडून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

अशा पद्धतीने ISRO ने वाढवलं ऑर्बिटरचं आयुष्य
चांद्रयान-२ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे मोहिमेला झटका बसला आहे. पण दुसऱ्या बाजूला एक चांगली बातमी सुद्धा आहे. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरचे आयुष्य आणखी सहा वर्षांनी वाढवण्यात आले आहे. ऑर्बिटरचे आयुष्य आधी एक वर्ष असणार होते. पण आता ऑर्बिटर सात वर्ष काम करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

चंद्राभोवती फिरुन ऑर्बिटर चंद्राचा पृष्ठभाग आणि तेथील वातावरणासंबंधी महत्वपूर्ण माहिती गोळा करणार आहे. चांद्रयान-२ मधील इंधन वाचवल्यामुळे ऑर्बिटरचे आयुष्य वाढवणे इस्रोच्या वैज्ञानिकांना शक्य झाले आहे. २२ जुलैला जेव्हा श्रीहरीकोट्टा येथून चांद्रयान-२ अवकाशात झेपावले तेव्हा ऑर्बिटरमध्ये १६९७ किलो इंधन होते. आता फक्त ५०० किलो इंधन उरले आहे. या मोहिमेत रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर संशोधन करण्याचे इस्रोचे लक्ष्य होते. पण लँडर बरोबर संपर्क तुटल्यामुळे हे अजून शक्य झालेले नाही. प्रग्यान रोव्हर लँडरच्या आतमध्ये आहे.