नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावर देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलनी गुरुवारी औपचारिक आरोपपत्र ठेवले. यामुळे देशाची आधीच खिळखिळ्या झालेल्या राजकीय व्यवस्थेत आणखीनच विस्कळीतपणा आला आहे.

अ‍ॅटर्नी जनरल अविचाइ मांदेलब्लिट यांनी नेतान्याहू यांच्यावर तीन वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि लाच स्वीकारणे असे आरोप ठेवले आहेत. इस्रायलच्या एखाद्या विद्यमान पंतप्रधानांवर गुन्ह्य़ाचे आरोप ठेवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मांदेलब्लिट हे याबाबत औपचारिक निवेदन जारी करतील, असे सांगण्यात आले.

नेत्यान्याहू यांनी एका वृत्तपत्राच्या प्रकाशकाचा फायदा करून देण्यासाठी त्यांच्या अब्जाधीश मित्रांकडून हजारो डॉलर किमतीच्या शँपेन आणि सिगार स्वीकारल्याचा, तसेच लोकप्रिय वृत्त संकेतस्थळावर अनुकूल प्रसिद्धी मिळण्याच्या मोबदल्यात टेलिकॉम क्षेत्रातील एका बडय़ा व्यावसायिकाला मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.