गो तस्करांनी पोलिसांचा सेसमिरा चुकवण्यासाठी एसयूव्ही कारमधून तस्करीचा नवा मार्ग शोधून काढला आहे. बुधवारी राजस्थानातील भारतपूर पोलिसांनी एसयूव्ही कारमधून गायींच्या तस्करीचा कट उधळून लावला. एसयूव्ही कारमधून या गायींना हरयाणा येथे नेण्यात येत होते. भारतपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर दिल्लीचा आहे.

बुधवारी दुपारी अडीजच्या सुमारास भारतपूर-नादबाई रस्त्यावर एक एसयूव्ही कार पोलिसांनी उभारलेला बॅरिकोड उडवून वेगात पुढे निघून गेली. तपासणी नाक्यावर पोलिसांना पाहताच चालकाने गाडीचा वेग वाढवून बॅरिकेडस उडवून दिले. पोलिसांनी लगेच त्या एसयूव्ही कारच पाठलाग सुरु केला. त्यावेळी तस्कर आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. अखेर तस्करांनी एका टप्प्यावर गाडी तशीच रस्त्यात सोडून दिली व तिथून पळ काढला.

या गाडीमध्ये एकूण चार गायी होत्या. या अवैध तस्करीमध्ये तीन गायी जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी लगेच शोधमोहिम सुरु केली पण त्यांना आरोपी सापडले नाहीत. गुप्तचरांनी गायींच्या तस्करीची आधीच कल्पना दिल्यामुळे पोलीस यंत्रणा सर्तक होती. गायींना एसयूव्हीमध्ये अक्षरक्ष कोंबण्यात आले होते. त्यामुळे तीन गायी जखमी झाल्या असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. अज्ञात आरोपींविरोधात आम्ही गुन्हा दाखल करुन कार ताब्यात घेतली आहे असे पोलिसांनी सांगितले.