भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून राफेल प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत केली.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख पार पडली. यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गाव, गरीब, किसान यांचा विकास करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस सरकारवर आरोप करीत आहे, पण रिलायन्सबरोबर राफेल विमान बनविणाऱ्या कंपनीचा करार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाच झाला होता. या कंपनीने रिलायन्सप्रमाणेच सुट्या भागांसाठी २२ कंपन्यांशी करार केला आहे. या करारांशी भाजपा सरकारचा काहीही संबंध नाही. मोदी सरकारने यशस्वी वाटाघाटी केल्यामुळे सुसज्ज लढाऊ विमाने चाळीस टक्के स्वस्त दरात मिळाली आहेत. या विषयातील सर्व माहिती घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोप खोडून काढावेत व जनतेला संभ्रमित करण्याचे विरोधकांचे प्रयत्न खोडून काढावेत, असा सल्लाही यावेळी गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला.

दानवे म्हणाले, भाजपाला देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे. विरोधकांच्या प्रचाराला जनतेने दाद दिलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी आता लोकांना संभ्रमात टाकायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ते खोटेनाटे आरोप करीत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित न होता विकासाच्या अजेंड्यावर ठाम रहायला हवे.