News Flash

JNU Protest : देशभक्तांना रोखण्याची तिची हिंमत कशी झाली -जावेद अख्तर

आयेषी घोषवर गुन्हा दाखल झाला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे मंगळवारीही पडसाद उमटले आहेत. मुंबईसह देशातील अनेक शहरात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, या प्रकरणात जेएनयूतील विद्यार्थी समितीची अध्यक्षा आयेषी घोष हिच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी यावर संतप्त होत उपरोधिक टीका केली आहे. “आयेषी घोष हिच्यावर दाखल झालेला गुन्हा समजण्यासारखा आहे. जेएनयूमध्ये घुसणाऱ्या देशभक्तांना रोखण्याची तिची हिंमत कशी झाली,” असं अख्तर यांनी म्हटलं आहे.

जेएनयूतील शिक्षक संघटनेच्या शांतता सभेवेळी लाठ्याकाठ्यांसह आलेल्या तरुणांच्या टोळक्यानं हल्ला केला. यात जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जबर मारहाण करत वसतिगृहासह साहित्याची नासधूस केली. हल्ल्यामध्ये जेएनयूतील विद्यार्थी संसदेची अध्यक्षा आयेषी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी आयेषी घोष हिच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्याबरोबरच सर्व्हर रूममधील साहित्याची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयेषी घोषसह इतर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना उपरोधिक टोमणाही मारला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी ट्विट केलं आहे. “जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संसदेची अध्यक्षाविरोधात दाखल झालेला गुन्हा पटण्यासारखाच आहे. तिच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करणाऱ्या देशभक्तांना रोखण्याची तिची हिंमत कशी झाली. हे देशद्रोही आमच्या गुंडांना नीट लाठ्याही मारू देत नाही. ते सारखे मध्ये येतात. मला माहिती आहे, त्यांना स्वतःला त्रास करून घ्यायला आवडतं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटमधून कुणावर निशाणा?

जावेद अख्तर यांनी केलेलं ट्विट उपरोधिक आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यावरच जावेद अख्तर यांनी भूमिका मांडली आहे. बाहेर आलेल्या गुंडांनी तोडफोड केलेली असताना जेएनयूतील विद्यार्थ्यांवरच गुन्हा दाखल झाल्यानंतर अख्तर यांनी पोलिसांना आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. त्यांच्या रोख केंद्र सरकार आणि अभाविपकडे असल्याचं ट्विटमधून दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 1:46 pm

Web Title: how dare she stop a nationalist javed akhtar reaction over jnu row bmh 90
टॅग : JNU Issue,JNU Row
Next Stories
1 अवंतीपोरा सेक्टरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा
2 VIDEO: …म्हणून मी ‘FREE काश्मीर’ चं पोस्टर घेऊन उभी होते, तरुणीचं स्पष्टीकरण
3 नाना पाटेकर यांचा आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला, म्हणाले…
Just Now!
X