करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतासह जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही तो पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टालाही आता याची काळजी वाटू लागली आहे. हा एक विषाणूच आहे पण कलियुगात आपण त्याचा सामना करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाचे न्या. अरुण मिश्रा यांनी म्हटलं आहे.

न्या. मिश्रा म्हणाले, “अशा प्रकारच्या महामारी या प्रत्येक १०० वर्षांतून येत असतात. कलियुगात अशा विषाणूंचा आपण सामना करु शकत नाही. माणसाची दुर्बलताच पहा की, तु्म्ही सर्व प्रकारची शस्त्रं बनवू शकता पण त्यानं या विषाणूशी तुम्ही लढू शकत नाही. आपल्या पातळीवरच आपल्याला या समस्येशी लढा द्यावा लागेल.”

दरम्यान, सुप्रीम कोर्टात गर्दी करणाऱ्या काही वरिष्ठ वकिलांना बुधवारी न्या. एम. आर. शाह यांनी चांगलेच खडसावले. ते म्हणाले, “बार काऊन्सिलला आमचं आग्रहाचं सांगणं आहे की, त्यांनी पुढील काही दिवस केवळ एका सहकार्यासोबतच कोर्टात यावं. पाच-सहा लोकांना घेऊन कोर्टात येणं गरजेचं नाही. हे आपल्याच फायद्यासाठी आहे.”