डाव्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या काही नामवंत कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माओवादाशी कनेक्शन असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी पाच राज्यांमध्ये छापेमारीची कारवाई करुन काही जणांना अटक केली आहे. राहुल गांधी यांनी या अटक सत्रावरुन केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले आहे. न्यू इंडियामध्ये फक्त एका स्वयंसेवी संस्थेला स्थान आहे ती म्हणजे आरएसएस असे राहुल यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्याच्याशी संबंधित या अटका आहेत

भारतात फक्त एका स्वयंसेवी संस्थेला स्थान आहे ती म्हणजे आरएसएस. बाकीच्या सर्व संस्था बंद करा. सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका आणि जे विरोध करतील त्यांना गोळया घाला. न्यू इंडियामध्ये तुमचे स्वागत आहे असे उपरोधिक टि्वट करुन राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या टि्वटमध्ये #BhimaKoregaon हा हॅशटॅगही टाकला आहे. राहुल यांच्याआधी काँग्रेस प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी या छापेमारीचा आणि अटेकचा निषेध केला. सबळ पुराव्याअभावी मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक करु नये असे रेड्डी म्हणाले होते.

पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. नवलखाना दिल्लीतून अटक करण्यात आली व साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा तांबा महाराष्ट्र पोलिसांकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कादगपत्रं जप्त केली आहेत.

मानवाधिकार कार्यकर्त्या व वकिल सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली व महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांची मुलगी अनू हिलाबी पोलिलांनी ताब्यात घेतले आहे.
अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली असून परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.