छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये मुसळधार पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. संततधार पावसामुळे नदी नाले वाहू लागले असून, परिसरातील धरणंही भरली आहेत. एका ओव्हर फ्लो झालेल्या धरणात अडकलेल्या माणसाची भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे आणि धरणाच्या पाण्यात झालेल्या वाढीमुळे बिलासपूरच्या खुटाघाट या धरणात ही व्यक्ती अडकली होती. भारतीय हवाई दलाच्या MI 17 चॉपर या हेलिकॉप्टरच्या मदतीने या व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. तब्बल १६ तास त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कसरत सुरू होती.

बिलासपूरच्या खुटाघाट धरणामध्ये मुसळधार पावसाने धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एका ओव्हर फ्लो झालेल्या धरणात एक जण अडकून पडला होता. धरणात असलेल्या एका झुडपाच्या मदतीने बराच वेळ ही व्यक्ती तिथे थांबली. व्हिडिओमध्ये माणूस एका झुडूपात अडकलेला दिसत आहे. खुटाघाट धरणात अडकून पडलेल्या एका व्यक्तीची भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सुटका केली. भारतीय हवाई दलाला या रेस्क्यु ऑपरेशनसाठी विनंती करण्यात आली होती, अशी माहिती बिलासपूर क्षेत्राचे महानिरीक्षक दीपांशु काबरा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सुकमा जिल्ह्यात व आसपासच्या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.