News Flash

नोटाबंदीचा खणखणाट!

करचुकवेगिरी आणि काळा पैसा रोखण्यासाठी नोटाबंदी हा मार्ग असूच शकत नाही.

गुजरात निवडणूक प्रचारात नोटाबंदीचा खणखणाट सुरू आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनपेक्षित निर्णयास बुधवारी एक वर्ष पूर्ण होत असतानाच, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या उंबरठय़ावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय हा देशाच्या अर्थकारणावर आघात असून नोटाबंदी ही तर संघटित लूटच आहे, अशी घणाघाती टीका केली. अर्थतज्ज्ञ सिंग यांच्या या टीकेचा प्रतिवाद करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र, ‘संघटित लूट सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच केली होती,’ असा आरोप केला आहे. लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांमधील असंतोषाला हात घालून काँग्रेसने निवडणूक प्रचारात आक्रमक भूमिका घेतल्याने गुजरात निवडणूक प्रचारात नोटाबंदीचा खणखणाट सुरू आहे.

ही तर संघटित लूट : मनमोहन सिंग

अहमदाबाद : छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अहमदाबाद येथे मंगळवारी झालेल्या मेळाव्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेला पार धुळीस मिळवणारे दोन निर्णय आहेत. नोटाबंदीवर संसदेत मी जी टीका केली त्यातून मोदी यांनी काहीच बोध घेतला नाही. नोटाबंदीचा निर्णय लागू करण्यासाठी जी जी कारणे सांगितली गेली, जी उद्दिष्टे मांडली गेली त्यांची कधीच पूर्ती झाली नाही. नोटाबंदीचा गोंधळ संपला नसतानाच घाईघाईत ‘जीएसटी’चा निर्णय घेतला गेला.

करचुकवेगिरी आणि काळा पैसा रोखण्यासाठी नोटाबंदी हा मार्ग असूच शकत नाही. खरे करबुडवे तर सहज निसटले आहेत. उलट सर्वसामान्य माणसाला करदहशतीला सामोरे जावे लागत आहे, अशी टीकाही सिंग यांनी केली. ही करदहशत इतकी आहे की खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या प्रमाणात गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत सर्वात मोठी घसरण झाली आहे. नोटाबंदीने भरडल्या गेलेल्या सामान्य माणसाला, गरीबाला, शेतकऱ्याला आणि व्यापारी वर्गाला काही दिलासा देण्याची मागणी मी संसदेत केली होती. तिचा तर विचारही सरकारने केला नाहीच, उलट ‘जीएसटी’लादून या वर्गाची अधिकच परवड केली, असेही सिंग म्हणाले.

हा सुद्धा फसवा प्रचार?

शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याची मोदी यांची घोषणा हा निवडणुकीतला ‘जुमला’च ठरेल, असा टोलाही सिंग यांनी पत्रकार परिषदेत हाणला. ‘अच्छे दिन’ हा प्रचारापुरता ‘जुमला’ होता, अशी कबुली भाजप नेत्यांनी नंतर दिली होती.

बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा निर्थक प्रयोग आहे, असेही सिंग म्हणाले. सरकारचा प्राधान्यक्रमच चुकला आहे, बुलेट ट्रेनऐवजी सध्याच्या रेल्वेची स्थिती सुधारण्यावर आणि व्याप्ती वाढविण्यावरअधिक भर द्यावयास हवा होता, असे डॉ. सिंग म्हणाले.

यांच्याकडून प्रेरणा घ्या!

मोदी यांनी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोन गुजराती सुपुत्रांकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्लाही मनमोहन सिंग यांनी दिला. उत्तम प्रशासनात डोकं आणि हृदय या दोहोंचा समावेश आणि उत्तम समन्वय असावा लागतो. सरकारला मात्र दोन्हीचा विसर पडल्याचं शल्य आहे, असेही सिंग म्हणाले. महात्मा गांधींपासून सरकारने प्रेरणा घेतली असती तर गरीबांचे हाल वाचले असते. जीएसटी आणताना देश एकसंध करताना पटेल यांनी काय आणि कशी पावले उचलली होती, हे अभ्यासले असते तर ही वेळ आली नसती. राणाभीमदेवी थाटाच्या गर्जना आणि नाटकबाजी हे खऱ्या धडाडीला पर्याय असू शकत नाहीत, असा टोलाही सिंग यांनी हाणला.

काँग्रेसकडूनच लूट : अरुण जेटली

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय हा तत्त्वाला बळ देणारा आणि नैतिकदृष्टय़ा पुढचे पाऊल टाकणारा होता, तर संघटित लूट ही काँग्रेसच्याच काळात सुरू होती, असा प्रतिवाद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी थेट गुजरातमध्ये जाऊन उद्योजकांच्या मेळाव्यात भाजप सरकारवर शरसंधान केल्याने जेटली यांनाच बचावासाठी उतरावे लागले.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येच टूजी घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा सामन्यांच्या आयोजनातला घोटाळा आणि कोळसा खाणघोटाळा अशी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे गाजली, याकडे जेटली यांनी पुन्हा लक्ष वेधले.

नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण झाले आहेच आणि करदात्यांचे प्रमाणही वाढले आहे, असा दावा जेटली यांनी पत्रकार परिषदेत केला. देशाची सेवा, हा आमचा दृष्टीकोन आहे तर एका कुटुंबाची सेवा, हा आधीच्या सरकारचा दृष्टीकोन होता, असेही जेटली म्हणाले.

सिंग यांच्या सरकारच्या ‘धोरण लकव्या’वर अर्थतज्ज्ञांनीही बोट ठेवले होते. सिंग हे अर्थतज्ज्ञ असूनही जागतिक आर्थिक क्षितिजावर भारत कुठेच दिसत नव्हता. आज मात्र भारताच्या धोरणांची दखल घेतली जात आहे, असेही जेटली म्हणाले.

काळ्या पैशाविरोधातली मोहीम हे तत्त्वनिष्ठ आणि नैतिक पाऊल होते आणि नैतिकदृष्टय़ा जे योग्य असते तेच राजकीयदृष्टय़ाही योग्यच असले पाहिजे, असेही  जेटली उद्गारले.

नोटाबंदी हा प्रश्नाची सोडवणूक करणारा उपाय नाही, हे खरे, पण या निर्णयाने व्यवहारातील रोकड रकमेची चलती कमी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक व्यवहार हे करयंत्रणेलाही जोखता येतील, असे झाले

आहेत. दहशतवाद्यांची आर्थिक रसद त्यामुळे रोखली जात आहे. बेहिशेबी पैसा बाळगणाऱ्या दहा लाख खातेदारांचा शोधही नव्या यंत्रणेमुळे लागला आहे, असेही जेटली यांनी अधोरेखित केले.

राजन यांच्याबाबत मौन

रघुराम राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर या नात्याने नोटाबंदीच्या निर्णयास विरोध केला होता, त्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जेटली यांनी नकार दिला. त्याबाबतचा तपशील उघड न करण्याचा अर्थमंत्री म्हणून मला अधिकार आहे, असे ते म्हणाले.

रूपानी यांचीही टीका

मनमोहन सिंग यांच्या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे ट्विटरवर सरसावले. जेटली यांच्याच टीकेची री ओढत रूपानी यांनी सिंग यांना त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत छेडले. तसेच सिंग आणि काँग्रेस ही गुजराती माणसाच्या विरोधात आहे, असाही आरोप केला.

काँग्रेस आणि भाजपचेही आंदोलन

नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस आणि विरोधी पक्ष उद्या म्हणजे बुधवारी ‘काळा दिवस’ पाळणार आहेत. भाजपही हा दिवस ‘काळापैसाविरोधी दिवस’ म्हणून पाळणार आहे. त्यामुळे देशभर रस्तोरस्ती राजकीय आरोप-प्रत्यारोपांची आंदोलने तापणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 4:23 am

Web Title: manmohan singh arun jetly view on demonetization after completing one year
टॅग : Manmohan Singh
Next Stories
1 ‘त्या’ बाद नोटांची दक्षिण आफ्रिकेत चलती!
2 दिल्लीमधील वायूप्रदूषण धोक्याच्या पातळीवर, शाळांना सुट्टी
3 पॅराडाइज पेपर्समध्ये जॉर्डनची राणी, कोलंबियाच्या अध्यक्षांचेही नाव
Just Now!
X