दिल्लीमध्ये करोना व्हायरसचा फैलाव वेगाने होतोय, अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार गौतम गंभीर यांनी देऊ केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीबाबत आभार मानले आहेत. पण, ‘आम्हाला पैशांची समस्या नाहीये, तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची (PPE) आवश्यकता आहे’, असं म्हणत पीपीई उपलब्ध करुन देण्याची विनंती केजरीवालांनी गौतम गंभीरकडे केली आहे.

“मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. मी आधी माझ्या खासदार निधीतून ५० लाख रुपये देऊ केले. पण, त्यांच्यातील अहंकारामुळे त्यांनी अद्याप ते पैसे स्वीकारलेले नाहीत. निष्पाप लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी अजून 50 लाख रुपये देऊ करत आहे.. किमान एक कोटी रुपयांनी मास्क आणि पीपीई किटच्या गरजा पूर्ण होतील”, अशा आशयाचं ट्विट करत गंभीरने एक कोटी रुपयांची मदत देऊ केली होती. त्यावर, “गौतम जी तुमच्या प्रस्ताबाबद्दल धन्यवाद….पण पैशांची समस्या नाहीये तर पीपीई किट्सची उपलब्धता ही मोठी समस्या आहे. तुम्ही तातडीने आम्हाला पीपीई किट्स उपलब्ध करुन दिल्यास आम्ही तुमचे आभारी राहू…दिल्ली सरकार त्या किट्स खरेदी करेन…धन्यवाद असे उत्तर केजरीवाल यांनी दिले आहे.


दरम्यान, लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशातील मृतांचा आकडा चार हजारांच्या वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडाही शंभरच्या पलिकडे गेला आहे. दिल्लीमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपेक्षा जास्त झाला आहे.