मध्य प्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांना एका गंभीर चुकीबद्दल मंगळवारी माफी मागावी लागली. एका अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक केल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली.

मध्यप्रदेशातल्या देवास जिल्ह्यातल्या सुंदरेल गावात एका ७ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. यासंदर्भात आलेल्या एका तक्रारीला ट्विटरच्या माध्यमांतून उत्तर देताना सिंह यांनी सोमवारी संध्याकाळी पीडित मुलीचे नाव जाहीर केले होते. तसेच या प्रकरणी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच आरोपीला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या माध्यमातून दिली होती.

बलात्कार पीडित कोणत्याही महिलेचे नाव उघड करायचे नसते, असा संकेत असताना सिंह यांनी ते केल्याने त्यांना मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्यांनी ट्विट केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर सिंह यांना या प्रकरणी माफी मागावी लागली.

गृहमंत्रालयाच्या सोशल मीडिया सेलच्या एका कर्मचाऱ्याकडून ही चूक झाल्याचे माफी मागताना ट्विटवरुन सिंह यांनी सांगितले. मात्र, याची गंभीर दखल घेत या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. तसेच अनवधानाने झालेल्या या गंभीर चुकीबद्दल खेद व्यक्त करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

५ नोव्हेंबर रोजी एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह बलात्कार करुन अर्धनग्न अवस्थेत एका शेतात आढळून आला होता. ही मुलगी ४ नोव्हेंबर संध्याकाळी आपल्या घरुन शेतात वडिलांसाठी चहा घेऊन गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नव्हती.