तीनच दिवसांपूर्वी एकमेकांवर कठोर शाब्दिक प्रहार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी डॉ. मनमोहन सिंग बुधवारी संसदेमध्ये एकमेकांसमोर आले आणि दोघांचीही देहबोली अवघडलेली जाणवत होती. याउलट केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, विजय गोयल आणि काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये अनौपचारिक गप्पा चालल्याचे दिसत होते.

निमित्त होते २००१ मधील संसदेवरील हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्याचे. त्या निमित्ताने मोदी आणि डॉ. सिंग अचानकपणे एकमेकांच्या समोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केले आणि स्मितहास्याचा भाव चहऱ्यावर आणून लगेचच निघूनही गेले. दोघांमधील अवघडलेपण लपून राहिले नाही.

याउलट नंतर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपवर तुफानी टीका करणारे राहुल केंद्रीय मंत्र्यांशी सहजपणे गप्पा करीत होते. त्यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री विजय गोयल आदींचा समावेश होता. निवडणुकीतील तणावाचा सर्वाच्या चेहऱ्यावर तणाव फारसा दिसला नाही.  काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्यासाठीच्या मेजवानीवरून मोदींनी सिंग यांच्यासहित काँग्रेसला लक्ष्य केले होते. ‘आदल्या दिवशी अय्यर यांच्या घरी बैठक झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला नीच म्हणून हिणवले. हा गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. गुजरातमध्ये निवडणूक चालू असताना अशी गोपनीय बैठक घेण्याचे कारण काय?’ असा सवाल मोदींनी केला होता. गुजरात निवडणुकीमध्ये पाकचा हस्तक्षेप होत असल्याचेही मोदींनी सूचित केले होते. त्यास डॉ. सिंग यांनी धारदार उत्तर दिले होते. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून राजकीय फायद्यासाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख पदाच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवीत असल्याचे ते म्हणाले होते. राजकीय कुरघोडय़ा करण्यामध्ये ऊर्जा वाया घालविण्याऐवजी आपल्या पदाला शोभेल अशा परिपक्वतेने पंतप्रधान मोदींनी वागावे आणि पदाचा मर्यादाभंग केल्याबद्दल देशवासीयांच्या माफीचीही मागणी त्यांनी मोदींकडे केली होती.