News Flash

बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी जितन राम मांझी यांची निवड

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जितन राम मांझी यांची निवड करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

| May 19, 2014 01:39 am

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जितन राम मांझी यांची निवड करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. मांझी आणि मावळते मुख्यमंत्री यांनी सोमवारी संध्याकाळी बिहारच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. जितन राम मांझी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री होते.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नितीशकुमार मागे घेणार नसल्याचे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सोमवारी सकाळी स्पष्ट केले. नव्या नेत्याच्या निवडीचे सर्वाधिकार नितीशकुमार यांना देण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी नितीशकुमार यांनी मांझी यांना सोबत घेऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांकडे मांझी यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या सरकारसाठी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनाम्याचा फेरविचार करावा, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आल्यामुळे रविवारी त्यांनी विचार करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली होती. मात्र, राजीनाम्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले. संयुक्त जनता दलाच्या विधीमंडळ पक्षाची सोमवारी पाटण्यात बैठक झाली. या बैठकीत नेता निवडीचे सर्वाधिकार नितीशकुमार यांच्याकडे देण्यात आले होते.
शरद यादव म्हणाले, नितीशकुमार यांचा राजीनाम्याचा निर्णय अंतिम आहे. खूप विचार केल्यावर हा निर्णय घेण्यात आलेला असून, तो पक्षाच्या दृष्टीने योग्य आहे. खुद्द नितीशकुमार यांच्यासाठीही हा निर्णय उपयुक्त आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंध तोडण्याच्या आमच्या निर्णयाशीच हा निर्णयही जोडलेला असल्याचेही यादव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:39 am

Web Title: nitish kumars resignation is final
Next Stories
1 जेडीयूशी युती नाही – लालूप्रसाद यादव
2 पंतप्रधानांचे मौनच काँग्रेसला भोवले – कमलनाथ
3 राजधानीत ‘नमोस्तुते’
Just Now!
X