दिल्लीमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय तसेच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात येऊ शकतो अशी चर्चा मागच्या दोन-चार दिवसांपासून जोरात सुरु आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

आपल्या टि्वटमधून अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाउन संबंधी सुरु असलेल्या चर्चांचे खंडन केले आहे. दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्याची कुठलीही योजना नाही. “दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सुरु आहे. असा लॉकडाउन करण्याची आमची कुठलीही योजना नाही” असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

अनलॉक १.० अंतर्गत निर्बंध शिथिल केल्यापासून दिल्लीमध्ये परिस्थिती बिघडत चालल्याच्या बातम्या सातत्याने माध्यमांमधून येत आहेत. दिल्लीमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये चांगले उपचार मिळत नसल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो, अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरु होती.