आगामी निवडणुकीपूर्वी ‘एनआरसी’ प्रक्रिया राबविण्याचा अमित शहा यांचा निर्धार

देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) अंमलबजावणीची प्रक्रिया २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या कालावधीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांना शोधून पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाबाहेर हुसकावून लावण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी  स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला ‘एनआरसी’ची किंमत मोजावी लागली, असे मत भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केले होते. विरोधी पक्षांनीही याबाबत आवाज उठविला असला तरी ‘एनआरसी’ची देशव्यापी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार शहा यांनी झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत केला.

‘‘पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी (२०२४) देशभरात ‘एनआरसी’ प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. घुसखोरांना हुसकावून लावू नका, ते कोठे जातील, काय खातील, असे प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. मात्र, २०२४ पूर्वी सर्व घुसखोरांना शोधून त्यांना देशातून हुसकावून लावण्यात येईल’’, असे शहा यांनी चक्रधरपूर आणि बहारोगोरा येथील जाहीर सभेत स्पष्ट केले.

दहशतवादाचा समूळ नायनाट, नक्षलवाद आणि अयोध्येत राममंदिराची उभारणी हे राष्ट्रीय प्रश्न झारखंडमधील विकासाइतकेच या निवडणुकीतही महत्त्वाचे आहेत, असे शहा म्हणाले. या वेळी शहा यांनी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीलाही लक्ष्य केले.

घुसखोरीबाबतच्या विधानावरून भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे घुसखोर आहेत, असे म्हणणारे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर सोमवारी भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले. मोदी आणि शहा यांचा अपमान सहन करणार नसून, चौधरी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत केली. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी मूळच्या परदेशी आहेत, हे या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.