चांगल्या योजनांमध्ये खोडा घालणे ही काँग्रेसची खोडच आहे अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. कर्नाटकातील बीदर-कलाबुर्गीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसने अनेक चांगल्या योजना जाणीवपूर्वक लांबवल्या असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांवरही त्यांनी टीका केली. गुजरातमध्ये पूर आला होता तेव्हा काँग्रेसचे आमदार बंगळुरूमध्ये बसले होते असेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसच्या काळात सुरू झालेले प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण व्हायला हवे होते.  मात्र ते लांबणीवर  टाकण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे या प्रकल्पांना २० वर्षे लागली. फक्त बीदरच नाही तर देशातील अनेक प्रकल्प फक्त काँग्रेसमुळे लांबणीवर पडले, असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सरकारी योजना लांबवणे, त्यामध्ये खोडा घालणे आणि त्या भरकटवणे याशिवाय काँग्रेसने काहीही केले नाही. आम्ही १ हजार दिवसात १८ हजार घरांमध्ये वीज पोहचवण्याची घोषणा केली होती. १ हजार दिवस पूर्ण व्हायचे आहेत आणि १८ पैकी १५ हजार घरांमध्ये वीज पोहचली आहे असाही दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जेव्हा आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली तेव्हा काँग्रेस निष्प्रभ झाली असेही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीचे कौतुक केले. कररचना बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. यासाठी आम्ही सगळ्या पक्षांचे मत विचारात घेतले होते असेही त्यांनी भाषणात सांगितले. आज दुपारीच झालेल्या भाषणात त्यांनी पी. चिदंबरम यांनी काश्मीर प्रश्नावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. त्यानंतर बीदरमधल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसने देशाच्या विकासात खोडा घातल्याचा आरोप केला.